2050 पर्यंत जगात हे 10 मोठे बदल संभवतात

human Image copyright Getty Images

बीबीसी फ्युचर नाऊनं 21 व्या शतकातील दहा मोठ्या आणि अतिमहत्त्वाचा समस्यांचा वेध घेतला आहे. मानवी जीवनाशी संबंधीत वेगवगेळे मुद्दे यासाठी विचारात घेण्यात आले आहेत.

मानवी शरिरातील जनुकीय बदल

मानवी डीएनएमध्ये बदल करण्याच्या मुद्यावर वैज्ञानिकांमध्ये वाद आहेत. त्याला क्रिस्पर असं म्हंटलं जातं. कर्करोगासारख्या आजारावर मात करण्यासाठी लोकांच्या डीएनएमध्ये बदल करणे असा त्याचा अर्थ आहे.

अद्भुत कल्पना वाटत आहे ना? पण, या तंत्रज्ञानाचा गैरवापर झाला तर? अत्युच्च बौद्धिक क्षमता किंवा विशिष्ट प्रकारचे शारीरिक गुणधर्म असणाऱ्या बाळांना जन्म देण्याची प्रवृत्ती बळावली तर काय होईल याचा आपण विचार केला आहे का?

या बाबीकडे सध्या आव्हान म्हणून पाहिलं जात नाही. पण, भविष्यत हा प्रश्न आपल्याला भेडसावू शकतो. त्यासाठी आपल्याला तयार राहावं लागलं.

यासाठीच वेगवेगळ्या प्रयोगशाळा, विद्यापीठ आणि संशोधन संस्थांवर नीतीशास्त्राच्या अभ्यासकांची नियुक्ती करणं अनिवार्य राहील.

जर संशोधक नीतीमत्तेच्या कक्षेबाहेर जाऊन काही निर्णय घेत असतील तर हे नीतीशास्त्र तज्ज्ञ त्यांना मार्गदर्शन करू शकतील.

जेव्हा नवीन तंत्रज्ञान आपलं दार ठोठावत असतं. तेव्हा आपण नीतीमत्तेच्या प्रश्नांना बगल देऊन चालणार नाही. या प्रश्नांवर विचार करण्याची सर्वाधिक गरज याच काळात आहे.

एक माणूस म्हणून आपलं अस्तित्व काय आहे याचा सर्वांगानं विचार करण्याची ही वेळ आहे. आपल्या कोणत्या गुणांचं संवर्धन करणं आपल्याला आवश्यक वाटतं याचं आपण चिंतन करणे गरजेचं आहे असं व्हिक्टोरिया विद्यापीठातील नीतीशास्त्राचे प्राध्यापक निकोलस अगार म्हणतात.

Image copyright Getty Images

वृद्धांची वाढती संख्या

2050 पर्यंत आपल्यासमोर केवळ लोकसंख्या वाढ हाच प्रश्न राहणार नाही. तर वृद्धांची संख्याही त्यावेळी वाढलेली असणार आहे. ही बाब चिंताजनक असेल.

म्हणजेच सध्या जे लोक ऐन तारुण्यात आहेत ते 2050 पर्यंत वृद्धापकाळाकडे झुकलेले असतील. त्यांची काळजी कशी घ्यावी हा प्रश्नही निर्माण होईल.

2050 पर्यंत 75 वर्षे पूर्ण केलेल्या वृद्धांची संख्या 50 पट वाढेल.युके, जपान आणि चीन या देशांमध्ये 65 वर्ष ओलांडलेल्या व्यक्तींची संख्या अधिक असेल.

या वृद्धांची काळजी घेण्यासाठी रोबोचा वापर करण्याचा विचार जपान करत आहे. तसंच, वृद्धांची सेवा करणाऱ्यांना देशात नोकरी करण्यास प्राधान्य देणं, जन्मदर आटोक्यात ठेवणं या सारखे उपाय देखील अवलंबले जातील.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अनेक शहरांना पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे.

बदलती शहरं

हवामान बदलामुळे अनेक शहरं पाण्यात बुडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मायामीसारख्या शहरांना हा धोका अधिक असल्याचं म्हटलं जातं.

हवामान बदलामुळे नव्या इमारतींच्या रचनेत बदल होताना दिसत आहे. पण, 2050 नंतर पूर किंवा भरतीची स्थिती निर्माण झाली तर या इमारतींची अवस्था सुद्धा भयावह होईल.

बांगलादेशाला याचा मोठा फटका बसेल असं संशोधक म्हणतात. याचे गंभीर आर्थिक परिणामही मानवतेला भोगावे लागतील. तसंच जगभरात निर्वासितांची संख्या वाढेल.

समाज माध्यमांचा प्रभाव

समाज माध्यमांनी संवादाची प्रक्रीया गुंतागुंतीची करून ठेवली आहे. विशेष म्हणजे त्याचा प्रभाव असाच राहण्याची शक्यता आहे.

अनेकांना आज त्यातून बातम्या कळतात. येत्या 30 वर्षांमध्ये समाज माध्यमं कशी असतील? तोपर्यंत त्याचे धोके काय असतील? खाजगी आयुष्याची परिव्याख्या बदलेली असेल. तसंच सायबर बुलींगची समस्या आहेचंच.

इंटरनेट ट्रोल्सच्या विरोधात आता काही संस्था मैदानात उतरल्या आहेत. पण, प्रश्न असा आहे की, कायदा किंवा समाज माध्यम चालविणाऱ्या संस्था यावर तोडगा काढू शकतील की हे चित्र आणखी विदारक होईल?

खोट्या बातम्यांसंदर्भातील परिस्थिती अशीच राहीली तर लोक जगाकडे कसे बघतील. समाज माध्यमांचं जग फार झपाट्यानं विस्तारलं आहे.

या समस्येचं लवकरच निराकरण होईल असं कदाचीत आशावादी म्हणू शकतात. पण, सध्या ज्या समस्यांचा आपण सामना करत आहोत, त्यापेक्षा आगामी तीस वर्षात कदाचीत समस्या वेगळ्याच असतील.

Image copyright Getty Images

भू-राजकीय तणाव

गेल्या काही वर्षांपासून भूराजकीय संतुलन कमालीचं बिघडलं आहे. पुढील दोन दशकांतील जागतिक स्थैर्यावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहेत.

हजारो निर्वासित जिवाच्या भितीनं देशांच्या सीमा ओलांडत आहेत. हॅकर्स इतर देशांच्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करीत आहेत. राष्ट्रवादी भावना कट्टरपणे जोपासली जात आहे.

2016 किंवा 2017 मधील आतापर्यंतचे मथळे बघीतले तर त्यावर कधी न संपणाऱ्या राजकीय नाट्यमय घडामोडींचाच जास्त प्रभाव दिसतो.

सुरक्षित कार प्रवास

झपाट्यानं होणारं शहरीकरण, बुलेट ट्रेन्सची चर्चा आणि हायपरलूप सारखं तंत्रज्ञान आलं तरी चारचाकी वाहनं त्यांच अस्तीत्व टिकवून राहतील. किंबहूना आगामी दोन दशकात त्यात वाढच होणार आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा वाढत्या शहरीकरणाचा परिणाम सुरक्षित प्रवासावरही दिसून येतो.

चालकविरहीत वाहनं चालविण्याच्या तंत्रज्ञानावर मोठ्याप्रमाणावर संशोधन सुरू आहे. अशी वाहनं तयार करण्याच्यादृष्टीनं प्रमुख तंत्रज्ञान कंपनी आणि वाहननिर्माते अग्रशील आहेत.

चीनसारख्या देशामध्ये मध्यमवर्गीयांची संख्या वाढत आहे. पर्यावरणपुरक वातावरण आणि पायाभूत सुविधांची वाढती मागणी ही मोठी समस्या उभी राहीली आहे.

अशावेळी सुरक्षेचं भान कसं ठेवणार? प्रदुषणाशी लढा कसा देणार आणि सर्वात महत्वाचं चालकविरहीत वाहनांचा रस्त्यावर कुठलाही धोका नाही. याची खात्री करावी लागेल.

नैसर्गिक साधानसंपत्तीची घट

एकविसाव्या शतकातील नवीन तंत्रज्ञान आणि उपकरणांमध्ये भूगर्भीय धातूंचा वापर केला जात आहे. स्मार्टफोनचेच उदाहरण घ्या. त्यात तब्बल साठ प्रकारचे धातू वापरले जातात.

याचा ताण भूगर्भीय धातूंच्या मर्यादीत उपलब्धतेवर होत आहे. जगातील 90 टक्के दुर्मिळ धातू जीनमध्ये आढळून येतात.

आगामी दोन दशकांमध्ये हा मर्यादीत साठा संपण्याची भीती आहे. आणि त्याला नजीकच्या काळात पर्यायी धातू शोधणं त्याहून अवघड आहे.

नव्या जगाचा शोध

अंतराळ पर्यटन कंपन्यांची कार्य सुरक्षित असल्याची खात्री आपण देऊ शकतो का? मंगळावर किंवा इतर ग्रहावर मनुष्य पाठविण्यासाठीचा मार्ग कसा शोधू शकतो?

स्टीफन हॅकीन्स यांच्या आवाहनाप्रमाणे तिथं वास्तव्य करण्याचा मार्ग आपण शोधू शकू का? अंतराळ प्रवास हा सध्यातरी श्रीमंतांच्या अवाक्यातील बाब आहे.

मात्र जशी ही सुविधा सर्वसामान्यांच्या अवाक्यात येईल, तेव्हा त्यातून नवीन समस्यांचं आगार उभं राहील.

कृत्रिम बुध्दीमत्ता वाढ

बुध्दीची क्षमता वाढवण्यासाठी वेगवगेळ्या पदार्थांचं सेवन करण्याचा प्रघात प्रचलीत आहे. आता तर विकसीत देशांमध्ये बाह्य बुध्दीमत्ता म्हणून स्मार्टफोनवर अवलंबून राहण्याचं प्रमाण वाढलं आहे.

कल्पना करा फार्मा कंपन्यांनी मानवी बुध्दीची क्षमता वाढवणारी औषधं तयार केली आहेत. असं तंत्रज्ञान विकसीत झालं आहे, जे तुमची सध्याची विचार क्षमता कैकपटीनं वाढविण्यास मदत करीत आहेत.

अशा संशोधनांवर सध्या जगातील विविध प्रयोगशाळांमध्ये अभ्यास सुरू आहे. प्रश्न असा निर्माण होतो की, त्यांच काय होईल, ज्यांना अशा सुविधा परवडू शकणार नाहीत? अशानं असमानता वाढीस लागेल? श्रीमंत आणखी श्रीमंत होत जातील?

मग, अशावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत जातील. परिक्षेला बसण्यापूर्वी कॉफी पिणे चालू शकते. मात्र स्मार्ट औषधी वापरणे चालू शकेल का? बुध्दीमत्ता वृध्दीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या या झपाट्यानं पुढे येत आहेत.

Image copyright Getty Images

आर्टीफिशियल इंटेलिजन्स

फ्युचरीस्ट रे क्रुझविल यांनी काही भाकीतं व्यक्त केली आहेत. त्यातील काही प्रेरणादायी तर काही भीतीदायक आहेत.

त्यांच्यामते आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक दिवस मानवी बुद्धीमत्तेवर वरचढ ठरले. शिवाय ते अधिक बलशाली असेल. सायफाय सिनेमांसारखं हे भकीत आहे.

अर्थात बरेच संशोधक हे मत मान्य करणार नाहीत, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रबळ ठरणार आहे, हे मात्र सर्वजण मान्य करतात.

पण, या क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांनी नैतिक आणि समाजिक परिणामांचा विचार केला पाहिजे. जीवनातील अनेक घटकांवर आर्टिफिशियल इंटेलिजन्साचा प्रभाव असणार आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सची निर्मिती करणाऱ्याच्या नियंत्रणाबाहेर जर ते गेलं तर मात्र मोठं मानवी संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.