नोकरीच्या पहिल्या दहा दिवसात काय कराल? काय टाळाल?

नोकरी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा आपल्याला सर्व काही समजतं अशा भ्रमात वावरू नका असं तज्ज्ञ सांगतात.

आपण नवीन नोकरीवर रुजू झालो नेमकं काय करावं, काय करू नये, असे अनेक प्रश्न मनात येतात. नव्याचे नऊ दिवस म्हणून बरेचदा आव्हानात्मक कामं सुरुवातीलाच आपण हाती घेत नाही. बराच वेळ तर आपली जबाबदारी काय, हेच समजून घेण्यात जातो.

कामावर रुजू झाल्यानंतरचे 10 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या पहिल्या दहा दिवसात तुम्ही मेहनत घेतली तर तुमच्या करिअरच्या दृष्टीने ते अतिशय फायदेशीर ठरू शकेल.

कामाला लागलो की उमेदवारांवर स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करुन दाखवण्याचा दबाव असतो. आपल्या सहकाऱ्यांना आणि बॉसला हे आपल्याला पटवून द्यायचं असतं की या नोकरीसाठी आपणंच योग्य आहोत. पण यामुळे आपण अनेक चुका करतो आणि आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतो.

सुरुवातीच्या काळात काय करावं आणि काय करू नये, याबाबत तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ते वाचा.

स्वतःला सर्वज्ञ समजू नका

सुरुवातीच्या काळात आपण नवीन काम समजून घेतलं पाहिजे. आणि आजूबाजूची परिस्थिती काय आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे. सुरुवातीच्या बैठकांमध्ये बोलणं कमी आणि स्मितहास्य जास्त करा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

आपण सर्वज्ञ आहोत, असा आव आणू नका. सर्वांच्या नजरा तुमच्यावर असतात आणि तुमचे वरिष्ठ सहकारी मनातल्या मनात तुमचं मूल्यमापन करतात. कुणालाही अनावश्यक बोलणारे लोक आवडत नाहीत. म्हणून जास्त बोलणं टाळा.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कंपनीच्या कामकाजाची काय पद्धत आहे हे आधी समजून घ्या.

कंपनीतील कामकाजाची पद्धत आपल्याला माहिती नसते. प्रत्यक्षात काम करताना काय अडचणी येतात, याबद्दल आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे सुरुवातीलाच मोठ्या-मोठ्या योजना सादर करू नका. कंपनीच्या कामात आमूलाग्र बदल होईल अशा योजना मांडू नका. जोपर्यंत तुम्ही सर्वांचा विश्वास जिंकत नाही, तोपर्यंत कंपनीवर टीका करू नका.

सुरुवातीच्या काळात आपली जबाबदारी समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे, असं हार्वर्ड बिझनेस स्कूलचे प्राध्यापक गौतम मुकुंद सांगतात. "सुरुवातीच्या काळात मोठे दावे करण्याचा मोह सर्वांनाच होतो. पण त्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवता आलं पाहिजे."

"अतिउत्साह आत्मघातकी ठरू शकतो. म्हणून सुरुवातीच्या काळात मोठ-मोठे दावे करू नका. ते पूर्ण करू शकला नाही तर तुमची विश्वासार्हता तुम्हीच गमवाल," अशी ताकीद मुकुंद देतात.

आपलं स्थान काय आहे

"सुरुवातीच्या दहा दिवसांमध्ये कंपनीमध्ये कोण प्रभावशाली आहे, हे ओळखा. त्यांच्या तुलनेत आपलं स्थान आणि जबाबदारी काय आहे, याचा अंदाज घ्या. त्यानंतरच पुढची योजना आखा," असं 'युअर बेस्ट जस्ट गॉट बेटर' चे लेखक जेसन वॉमिक सांगतात.

"सुरुवातीच्या काळात एकदम मोठं लक्ष्य ठेऊ नका," असा सल्ला ऑटोपायलट या सॉफ्टवेअर मार्केटिंग कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मायकल शार्के देतात. ते पुढे सांगतात, "गाठता येतील अशीच उद्दिष्टं डोळ्यासमोर ठेवा. सुरुवातीला सोपं लक्ष्य ठेवा. ते काम करत असताना तुमच्या सहकाऱ्यांचा विश्वास जिंका. नंतर तुम्हाला मोठी जबाबदारी देखील मिळेल."

नातेसंबंध वाढवा

प्रतिमा मथळा वेळोवेळी वरिष्ठांचं मार्गदर्शन घेत राहणं हे फायदेशीर ठरू शकतं.

अशा लोकांशी नातं वाढवा जे तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील, तुम्हाला सल्ला देऊ शकतील. त्यांना प्रश्न विचारा पण त्यांना त्रास होईल इतका त्यांचा वेळ खाऊ नका. काम करण्याची योग्य पद्धत काय, हे त्यांच्याकडून समजून घ्या. तुम्ही वेळोवेळी मार्गदर्शन घेतलं तर तुमचे आणि तुमच्या वरिष्ठांचे संबंध वाढतील, असं मुकुंद म्हणतात.

त्यांनी त्यांची एक आठवण सांगितली : "2002 साली मी मॅकेन्झी अॅंड कंपनीमध्ये जॉइन झालो होतो. प्रत्येक बैठकीमध्ये मी नव्या संकल्पना मांडत होतो. रोज नवी प्रपोजल ठेवत होतो. मला वाटलं की मी अतिशय योग्य पद्धतीने काम करत आहे पण पहिल्याच रिव्ह्यूच्या वेळी मला माझे मॅनेजर म्हणाले की तू सर्वांत ज्युनिअर आहेस पण मीटिंगमध्ये सर्वाधिक तूच बोलतोस."

"माझ्या इनपुटची कंपनीला आवश्यकता नव्हती, असं नाही. पण मी वरिष्ठांचं बोलणं जास्त ऐकावं, असं त्यांना वाटत होतं. सुरुवातीच्या काळात आपली जबाबदारी समजून घेणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. ते करताना काय अडचणी येतात, याकडे लक्ष ठेवणं. आणि वेळोवेळी वरिष्ठांचं मार्गदर्शन घेणं. सुरुवातीला जर या गोष्टींकडे लक्ष दिलं तर वरिष्ठांना वाटेल की, तुम्ही खरोखरच नोकरीबाबत गंभीर आहात," असं मुकुंद सांगतात.

या काळाकडं गुंतवणूक म्हणून पाहा आणि योग्य पावलं उचला. करिअरच्या दृष्टीने ते अतिशय फायदेशीर ठरेल.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)