तुमच्या आरोग्यासाठी जीव धोक्यात घालणारी माणसं

  • विनीत खरे
  • बीबीसी हिंदी प्रतिनिधी
व्हीडिओ कॅप्शन,

नालेसफाई कामगारांची व्यथा : 'गाय मेली तर बोभाटा होतो, आमचं काय?'

पुरेशा सुरक्षाव्यवस्थेअभावी भारतात अनेक सफाई कर्मचारी श्वास गुदमरून जीव गमावतात, पण त्यांचं दु:ख कोणी लक्षात घेत नाही.

दिल्लीतील हिरन कुदना भागातून वाहणाऱ्या नाल्यात आजूबाजूच्या घरातील मलमूत्र, कचरा विविध प्रकारची रसायनं वाहत आलेली असतात. त्याच भागात नीतू आणि अजित कामाला आले होते.

जवळच्या रस्त्यावर रिकाम्या जागेत कचरा साठलेला होता. चहूबाजूला पसरलेल्या दुर्गंधीमुळे श्वास घेणंसुद्धा कठीण झालं होतं. नीतू आणि अजित त्या नाल्यात गळ्यापर्यंत अडकले होते. ते घाण पाणी नाकापर्यंत जात होतं. म्हणून त्यांनी आपलं तोंड बंद करून ठेवलं होतं.

त्यांच्या एका हातात दांडा होता. दुसऱ्या हातात एक लोखंडाचा काटा होता, ज्याच्या मदतीने ते नाल्याच्या तळाशी अडकलेला कचरा खणत होते.

काटा हलवचताच मातकट पाणी वर आलं आणि त्या पाण्यानं त्यांना घेरलं.

नीतूने इशारा केला, "काळं पाणी हे गॅसचं पाणी असतं. हाच गॅस लोकांचा जीव घेतो."

"आम्ही लोखंडी दांडा मारून बघतो, बुडबुडे आले आणि काळं पाणी वर आलं की कळतं की तिथे गॅस आहे की नाही. मगच आम्ही आत घुसतो. जेव्हा हे न तपासता लोक आत जातात तेव्हा ते आपला जीव गमावतात," नीतूनं सांगितलं.

दिवसाच्या शेवटी हातावर पडणाऱ्या 300 रुपयांसाठी नाल्यातले साप, कीटक, बेडूक आणि ही सगळी घाण त्यांना सहन करावी लागते.

नाल्यातून बाहेर पडल्यावर फक्त अंडरवेअरवर असलेला नीतू जेव्हा थोडा वेळ उन्हात उभा राहिला, तेव्हा त्याच्या शरीरावरचा घाम, ते सांडपाणी आणि चिखल यांचा एक विचित्र वास वातावरणात पसरला होता.

गटारात एखादी काच किंवा काँक्रिटचा तुकडा किंवा गंजलेल्या लोखंडाच्या तुकडयांनी त्याचा पाय कापला गेला होता.

फोटो कॅप्शन,

दिवसाच्या शेवटी मिळणाऱ्या 300 रुपयांसाठी सांडपाण्याच्या सान्निध्यात जीवघेणं काम करणारे अजित आणि नीतू

काळ्या चिखलाने माखलेल्या त्याच्या पायावरची जखम अजून ताजी होती, कारण ती भरून निघण्यासारखी परिस्थिती नव्हती.

नीतूने हे काम 16व्या वर्षी सुरू केलं. दिल्लीत आल्यापासून तो त्याच्या बहिणीचा नवरा दर्शन सिंह यांच्या फास्ट फुडच्या दुकानात राहतो.

दुकानापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला निमुळत्या बोळातल्या अनेक झोपडपटट्या पार कराव्या लागतात. या झोपड्यांमध्ये अनेक सफाई कर्मचारी राहतात.

आम्ही जेव्हा या गल्लीत शिरलो तेव्हा गल्लीच्या दोन्ही बाजूला काही स्त्रिया स्वयंपाक करत होत्या. काही दुकानदार भाज्यांबरोबरच चिकनचे तुकडे विकायला ठेवून ग्राहकांची आतुरतेने वाट बघत होते.

आजूबाजूला इतके लोक होते की, श्वास घेणंसुद्धा कठीण झालं होतं.

तिथे असलेला कचरा ओलांडून आम्ही दर्शन सिंहच्या ढाब्यावर पोचलो.

दर्शन सिंह यांनी 12 वर्षं नालेसफाईचं हे काम केलं पण बाजूच्या इमारतीत त्याच्या दोन साथीदारांचा मृत्यू झाला आणि त्यानं हे काम थांबवलं.

ते सांगतात, "एका अपार्टमेंटमधलं गटार बरेच दिवस बंद होतं. त्यात खूप गॅस होता. आमच्या झोपडीत राहणाऱ्या दोन लोकांनी हे काम घेतलं. त्याचे 2000 रुपये त्यांना मिळणार होते. पण गटारात उतरताच पहिला माणूस मेला. तिथे खूप गॅस होता. आत गेलेल्या माणसाच्या मुलानं त्याला हाक मारली. खालून काही प्रतिसाद आला नाही. वडिलांना शोधायला तो पण तिथे घुसला, पण कधीच परतला नाही. दोघांचाही आतच मृत्यू झाला. ते सगळं बघून त्या दिवसापासून मी हे काम बंद केलं.''

उघड्या शरीरानं काम

कायदा सांगतो की, गटार स्वच्छ करतांना अगदी अपवादात्मक परिस्थितीत हातानं काम करावं. तसंच त्यासाठी कर्मचाऱ्यांना सुरक्षा उपकरणंसुद्धा द्यावीत. पण प्रत्यक्षात बहुतेक कर्मचारी उपकरणं सोडाच, उघड्या देहानंच काम करतात.

अशा घटनांमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये देण्याचं प्रयोजन आहे, पण अखिल भारतीय दलित महापंचायतीचे मोर सिंह यांच्या म्हणण्यानुसार, मदत मिळवण्यासाठी इतके कागदी घोडे नाचवावे लागतात, प्रत्येक गरजू व्यक्तीला मदत मिळू शकतच नाही.

फोटो कॅप्शन,

'सुरक्षेचं कोणतंच साधन बाबा वापरायचे नाहीत', मृत ऋषी पालची मुलगी ज्योती सांगते.

अशाच एका घटनेत दिल्लीतील लोक जननायक इस्पितळातील गटार साफ करताना 45 वर्षांच्या ऋषी पाल यांचा मृत्यू झाला.

रविवारचा दिवस होता. ऋषी पाल यांची मुलगी ज्योती हिला एक फोन आला. ज्योतीला तातडीने हॉस्पिटलमध्ये बोलवण्यात आलं. ऋषी पाल यांची पत्नी आणि तीन मुलं तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथे गेल्यावर त्यांना कळलं की ऋषी पाल यांचा मृत्यू झाला होता.

त्यांचं शव एका स्ट्रेचरवर ठेवलं होतं. त्याच्या कपड्यावरी गटाराची घाण अजूनही गेलेली नव्हती.

ज्योतीनी हळूच सांगितलं, "इथे येऊन आम्हाला कळलं की बाबा कोणतंच सुरक्षा उपकरण वापरायचे नाहीत."

बाजूच्या एका चादरीवर बसलेली ज्योतीची आई अजूनही या धक्क्यातून सावरली नव्हती.

त्यांच्या सोबतचे सफाई कर्मचारी संतापलेले होते. ज्या गटारात ऋषी मरण पावला त्या गटारापर्यंत ते मला घेऊन गेले.

जवळच उभ्या असलेल्या सुमितने ऋषीला वाचवण्याचा प्रयत्न केला होता, पण तो स्वत:च मरता मरता वाचला.

फोटो कॅप्शन,

नालासफाई करणारे मजूर उघड्या अंगानेच अशा दुर्गंधीयु्क्त पाण्यात गळ्यापर्यंत उतरतात.

सुमितनं मला सांगितलं, "ऋषी पाल एक दोरी बांधून गटारात उतरला. मी त्यांना खाली पोहोचलास का असं विचारलं सुद्धा. त्यानी हात उचलला आणि तिथेच पडला. मला वाटलं चिखलामुळे त्यांचा पाय घसरला असेल. मी खाली जाण्यासाठी मी शिडीवर पाय ठेवला. पण तितक्यात माझ्यापण नाकात गॅस गेला. कशीतरी हिंमत करून मी बाहेर आलो आणि जवळच पडून राहिलो. त्यानंतर काय झालं मला काहीच आठवत नाही."

जबाबदार कोण?

हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक JC पासी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला, पण त्यांनी जबाबदारी घेण्यास नकार दिला. ते म्हणाले की, "हॉस्पिटल मधल्या गटाराची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. त्यांना सुरक्षा उपकरणं दिली नाहीत तर ही माझी जबाबदारी नाही."

दिल्ली पाणी पुरवठा विभागाच्या संचालिका (महसूल) निधी श्रीवास्तव यांनी मृत्यूची जबाबदारी घेतली आणि कडक कारवाईचं आश्वासन दिलं. पण या आश्वासनांवर किती विश्वास ठेवायचा?

'सफाई कर्मचारी आंदोलना'चे बेजवाडा विल्सन म्हणतात, "जर एका महिन्यात दिल्लीत 10 गाई मेल्या तर हंगामा होईल आणि लोक रस्त्यावर उतरतील. याच शहरात 10 दलित सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर हू का चू झाले नाही. ही शांतता भयाण आहे."

ते सांगतात, "कोणालाच दुसऱ्याचं मलमूत्र साफ करण्याची इच्छा नसते. पण प्रस्थापित सामाजिक व्यवस्थेमुळे दलितांना हे काम करावं लागतं. आपल्या देशात मंगळावर जाण्याच्या गोष्टी केल्या जातात. पण या समस्येचा कुणीही विचार करत नाही.

विल्सन यांच्या मते सरकार लाखो नवीन शौचालयं बनवण्याच्या चर्चा करतात, पण या शौचालयासाठी तयार होणारे खड्डे स्वच्छ करण्याचा कोणीही विचार करत नाही.

दर्शन सिंह सांगतात, "आम्ही अशिक्षित आहोत. आमच्याकडे काही काम नाही. घर चालवण्यासाठी आम्हाला हे काम करावं लागतं. आम्ही जर बंद गटाराबद्दल विचारलं तर अधिकारी सांगतात की, तुम्ही घुसा आणि काम करा. पोटासाठी आम्हाला काम करावं लागतं"

"अनेकदा आम्ही आमच्या मुलांना सांगतो की हे किती वाईट काम आहे. मी सांगतो की, आम्ही मजुरी करतो. आम्हांला वाटतं की, त्यांना खरं सांगितलं तर ते आमचा द्वेष करतील. पण आमचा नाईलाज आहे. डोळे मिटून काम करतो मी."

"लोक आम्हांला दुरून पाणी देतात. तिथे ठेवलं आहे घ्या, असं तुच्छतेनं सांगतात. ते आमची हेटाळणी करतात. कारण आम्ही गटार स्वच्छ करण्याचं काम करतो. आम्ही जर असाच लोकांचा द्वेष केला तर आमचं घर कसं चालेल आणि मुख्य म्हणजे गटार कोण स्वच्छ करेल?

वाढते मृत्यू

  • प्रॅक्सिस या स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या एका अहवालानुसार दरवर्षी 100 पेक्षा अधिक मृत्यू होतात.
  • 2017 साली जुलै-ऑगस्ट मध्ये 35 दिवसांत 10 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
  • सफाई कर्मचारी आंदोलनाच्या आकडेवारीनुसार 1993 पर्यंत 1500 मृत्यूंची नोंद कागदोपत्री असली तरी ही संख्या खूप जास्त असल्याचे सांगण्यात येते.
  • लाखो लोक आजही हेच काम करतात. हे काम करणारे जास्तीत जास्त लोक दलित आहेत.
  • गटारात होणारे मृत्यू हायड्रोजन सल्फाईडमुळे होतात.
  • गटारात काम करणाऱ्या लोकांना त्वचाविकार, पोटाचे आजार आणि श्वसनविकारांसारख्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

तु्म्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)