प्रेस रिव्ह्यू : रेल्वेनं घटवली प्रवाशांच्या झोपेची वेळ

भारतीय रेल्वे प्रवासी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

रेल्वे प्रवासादरम्यान झोपेचे अधिकृत वेळ कमी करण्यात आली आहे.

रेल्वे प्रवासादरम्यान झोपेची वेळ एक तासानं कमी करण्यात आली आहे. स्लीपर कोचमध्ये रात्री 9 ते सकाळी 6 ही झोपेची वेळ असते.

आता ही वेळ रात्री 10 ते सकाळी 6 अशी करण्यात आली आहे. इतर वेळी खालच्या बर्थवर प्रवाशांना बसता यावे म्हणून या वेळेव्यतिरिक्त मधला बर्थ वापरू नये असा आदेश रेल्वे मंत्रालयाने दिला असल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे.

73 लाख बालकांचे आरोग्य धोक्यात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

अंगणवाडी सेविकांच्या संपामुळं राज्यातील 73 लाख बालकं कुपोषणाच्या मार्गावर आहेत.

गेल्या सात दिवसांपासून अंगणवाडी सेविका संपावर गेल्यामुळं महाराष्ट्रातील 73 लाख बालकं कुपोषणाच्या मार्गावर असल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

राज्यातील 97 हजार अंगणवाड्यांमध्ये दोन लाख सेविका काम करतात. त्या संपावर गेल्यामुळं राज्यातील बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पत्नीला त्रास देणाऱ्या एनआरआयचा पासपोर्ट होऊ शकतो रद्द

फोटो कॅप्शन,

पत्नीला त्रास देणाऱ्या एनआरआयचा पासपोर्ट रद्द व्हावा ही शिफारस करण्यात आली आहे.

आपल्या पत्नीला त्रास देणारे किंवा एकटं सोडून जाणाऱ्या अनिवासी भारतीयांचा पासपोर्ट रद्द करण्याची शिफारस एका समितीनं परराष्ट्र मंत्रालयाला केली आहे.

पती आपल्याला सोडून परदेशात गेल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर केंद्रीय समितीनं हा प्रस्ताव ठेवला आहे असं वृत्त हिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे.

मल्ल्यांचे 100 कोटी रुपयांचे शेअर्स केंद्रा सरकारकडे हस्तांतरित

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

विजय मल्ल्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

विजय मल्ल्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. युनायटेड ब्रेवरीज कंपनीचे त्यांच्या मालकीचे 100 कोटी रुपयांचे शेअर केंद्र सरकारकडे हस्तातंरित करण्यात आले आहेत.

स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन लिमिटेडनं मल्ल्यांच्या नावे असलेले शेअर्सची मालकी केंद्राकडे सोपवली असल्याचं वृत्त फायनांशिएल एक्सप्रेसनं दिलं आहे.

गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपानावर बंदीचा विचार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपानावर येत्या महिन्यापासून बंदी घालण्यात येणार आहे.

मद्यपींच्या उच्छादाला आळा घालण्यासाठी गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपानाला बंदी घालण्यात येईल असं मुखमंत्री मनोहर पार्रिकर यांनी सांगितलं आहे.

पुढील महिन्यात उत्पादन शुल्क कायद्यात बदल करून ही बंदी अंमलात आणली जाईल असं पार्रिकर यांनी म्हटल्यांचं वृत्त इकॉनॉमिक टाइम्सनं दिलं आहे.

देशात 49 कॅन्सर केंद्र उभारण्याचा सरकारचा विचार

इकॉनॉमिक टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, देशभरात पुढील तीन वर्षांमध्ये 49 कॅन्सर केंद्र उभारण्याचा सरकारचा विचार आहे.

याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी पंतप्रधान कार्यालयाला एक प्रस्ताव पाठवला आहे. यासाठी एकूण 3,495 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)