खंडणीप्रकरणी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक

इक्बाल कासकर

फोटो स्रोत, SUPRIYA SOGALE

फोटो कॅप्शन,

इक्बाल कासकरला अटक करून घेत जाताना पोलिस

दाऊद इब्राहीमचा धाकटा भाऊ इक्बाल कासकरला ठाणे पोलीसांनी अटक केली आहे. एका खंडणी प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.

खंडणीविरोधी पथकाच्या पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, इक्बाल कासकरला खंडणीच्या प्रकरणात नागपाडा गार्डन हाऊस येथून अटक करण्यात आली.

इक्बाल कासकरवर एका बिल्डरला फोनवरून खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

खंडणी विरोधी पथकाच्या पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं, "इक्बाल कासकरनं चार महिन्यांआधी एका बिल्डरकडून ठाण्यात खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला. संबधित बिल्डरानं पोलिसांकडे याची तक्रार केली होती. तपासात खंडणीसाठी आलेल्या फोनचा नंबर कासकर असल्याचं स्पष्ट झालं."

या तक्रारीवरूनच एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी ही अटक केली. याप्रकरणात आणखी काहीजणांना अटक केलं जाऊ शकते.

फोटो स्रोत, SUPRIYA SOGALE

ठाण्याचे खंडणीविरोधी पथकाचे अधिकारी कासकरची कसून चौकशी करत आहेत.

पीटीआय या वृत्त संस्थेच्या म्हणण्यानुसार याच महिन्याच्या सुरूवातीला कासकरला मुंबईमधील दोन मोडकळीस आलेल्या इमारती रिकाम्या करण्याचे आदेश देण्यात आले होते. पोलिसांच्या मते कासकरनं त्यावर ताबा केला होता.

भेंडी बाजारमधील पकमोडिया स्ट्रीटवरील दमरवाला बिल्डींग आणि जे जे मार्ग परिसरातील शबनम गेस्ट हाऊस रिकामं करण्याचे आदेश कासकरला दिले होते.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)