पिगी बँक : वराहपालनातून या पंजाबी शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये
- सरबजीत धालिवाल
- बीबीसी पंजाबी
वराहपालनातून शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये.
पाच गुंठे इतक्या अल्पशा जमिनीत तुम्ही एक व्यवसाय करू शकता आणि त्यातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. काय वाचून आश्चर्य वाटलं ना?
पंजाबमधील एका शेतकऱ्यानं अत्यंत कमी जागा आणि कमी भांडवल वापरून एक यशस्वी व्यवसाय उभा केला आहे. त्यानं पंजाबी शेतकऱ्यांसमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे.
पंजाबला धान्याचं कोठार म्हटलं जातं. 70च्या दशकात याच ठिकाणाहून हरितक्रांतीला सुरुवात झाली होती.
पण गेल्या काही वर्षांपासून पंजाबमधील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे.
फोटो स्रोत, Getty Images
दलविंदर सिंग
अनेकांना शेती हा व्यवसाय सोडून शहरांकडे मोलमजुरीसाठी जावं लागलं. पण दलविंदर सिंग या शेतकऱ्यानं मात्र या सर्व परिस्थितींवर मात करून लाखो रुपये कमवले आहेत. इतर शेतकऱ्यांनी देखील हा मार्ग पत्करावा, असं ते सांगतात.
पंजाबमध्ये वराहपालन या व्यवसायाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे.
या व्यवसायामुळं आपण श्रीमंत झालो आहोत आणि तुम्ही देखील हा व्यवसाय करू शकता, असं दलविंदर सिंग यांचं म्हणणं आहे.
फोटो स्रोत, Getty Images
अगदी छोट्या स्वरुपात हा व्यवसाय सुरू केला तरी तुमचा घरखर्च भागू शकतो, असं दलविंदर सांगतात.
कमी जागेतही व्यवसाय शक्य
"केवळ चार ते पाच गुंठे इतक्या जागेत तुम्ही वर्षाला 28-30 लाख रुपये कमवू शकतात. शेतीतून इतके रूपये तुम्हाला कमवायचे असतील तर तुमच्याकडं किमान 40 एकर शेती असणं आवश्यक आहे." असं ते सांगतात.
"मग तुम्ही वराहपालन का करत नाहीत?" असा सवाल दलविंदर सिंग शेतकऱ्यांना करतात.
"जर एखाद्या गृहिणीनं एक डुक्कर पाळलं तर तिला तिच्या घरासाठी दरवर्षी एक नवी वस्तू विकत घेता येईल. पहिल्या वर्षी तुम्ही फ्रीज घेऊ शकाल तर दुसऱ्या वर्षी तुम्हाला वॉशिंग मशीनदेखील विकत घेता येईल. एवढा नफा या व्यवसायात आहे," असं दलविंदर सांगतात.
अत्यंत कमी खर्चात तुम्ही हा व्यवसाय करता येतो, असं त्यांचं मत आहे.
दलविंदर वर्षाला 1000 पेक्षा जास्त डुकरं विकतात. त्यांच्यापिग फार्ममध्ये सरासरी एका दिवसाला चार पिल्लं जन्मतात.
2007 मध्ये त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली. पंजाब सरकारकडून अनुदान घेऊन त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. तेव्हा त्यांच्याकडे 20 डुकरं होती.
फोटो स्रोत, Getty Images
दलविंदर यांचं पिग फार्म
सध्या हा व्यवसाय पंजाबात जोर धरू लागला आहे. पंजाबमध्ये 400 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी हा व्यवसाय सुरू केल्याचा राज्य सरकारचा अंदाज आहे.
येत्या काळात अनेक शेतकरी या व्यवसायाकडं वळतील असं राज्य सरकारचं म्हणणं आहे.
कमी श्रमात अधिक नफा
पिग फार्ममध्ये स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. जर स्वच्छता पाळली गेली नाही तर रोगराईचा धोका असतो. त्यामुळं दलविंदर डुकरांना नेहमी स्वच्छ ठेवतात.
तसंच जागेचं तापमान योग्य ठेवणं देखील महत्त्वाचं असल्याचं ते सांगतात.
आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही डुकरं 24 तासांपैकी 22 तास झोपतात. त्यामुळं त्यांच्याकडे फार लक्षही द्यावं लागत नाही, असंही दलविंदर सांगतात.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)