प्रेस रिव्ह्यू : 'जयललितांविषयी आम्ही खोटं बोललो', तामीळनाडूच्या मंत्र्यांचा गौप्यस्फोट

जयललिता Image copyright Getty Images

आज वृत्तपत्रात आलेल्या मोठ्या बातम्यांनुसार शिवसेना आणि भाजप महाराष्ट्रात पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. तर जयललिता यांच्या मृत्यूबद्दल एक नवं प्रकरण समोर आलं आहे.

सविस्तर बातम्या खालीलप्रमाणे...

'आम्ही जयललितांविषयी खोटं बोललो'

जयललिता यांच्या आरोग्याविषयी आम्ही सर्वांनी खोटं सांगितलं, असं अण्णा द्रमुक पक्षाचे नेते व तामीळनाडूचे मंत्री सी. श्रीनिवासन म्हणाले. त्यांनी जनतेची माफीही मागितली आहे.

हिंदुस्थान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार मदुराई इथं एका कार्यक्रमात श्रीनिवासन म्हणाले, "जयललिता यांचे आरोग्य चांगले असून त्यांनी इडली खालली, चहाही प्यायला आणि त्या सर्वांना भेटत आहेत, असं आम्ही तेव्हा बोललो होतो. ते सर्व खोटं होतं."

"त्याकाळात त्यांना कोणीच भेटलं नाही. आम्ही सर्व हे शशिकला यांच्या भीतीखाली बोललो," असं ते पुढे म्हणाल्याचं.

जयललिता यांना मागच्या वर्षी 22 सप्टेंबरला चेन्नईमधल्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 5 डिसेंबरला रात्री त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

Image copyright Getty Images

शिवसेना-भाजप पुन्हा आमने-सामने

शिवसेनेनं शनिवारी मुंबईत १२ ठिकाणी महागाई आणि पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन केलं. शिवसेनेचे मंत्री आणि नेत्यांसोबत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे या आंदोलनात सहभागी झाले होते.

'एवढी गर्दी कशाला? मोदींच्या मयताला,' अशा घोषणा देण्यात आल्या.

भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तरात ट्वीट केलं - "खाल्ल्या ताटात घाण करणारे अशांनाच म्हणतात". तर "शेलार हे अनेकदा मातोश्रीचे पाय चाटत आले आहेत," असं सेनेचे प्रवक्ते अनिल परब यांनी म्हटलं.

"शिवसेना सरकारविरोधात आंदोलन करत असलं, तरी राज्य सरकारला अजिबात धोका नाही. भारतीय जनता पक्षाला शरद पवारांचं छुपं पाठबळ असल्यानं सत्तेला धोका नाही," असं सूचक वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अमरावती इथं केलं.

दमानियांना दाऊदचा फोन?

एकनाथ खडसे यांच्या विरोधातल्या तक्रारी मागे घे, अशा धमक्या आपल्याला थेट पाकिस्तानातून मिळत असल्याची तक्रार अंजली दमानिया यांनी केली आहे.

"अंजली तुमने खडसे के खिलाफ जो कम्प्लेंट दी है, वो सब वापस ले, वर्ना मै तेरा जीना हराम कर दूँगा," अशा शब्दांत संबंधित व्यक्तीनं धमक्या दिल्याचं त्या म्हणाल्या.

दमानिया आम आदमी पार्टीच्या माजी सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्या असून खडसे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आहेत.

दिव्य मराठीच्या वृत्तानुसार, हे फोन दाऊद इब्राहिमनंच केले असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. मुंबईच्या वाकोला पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)