ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक अरुण साधू यांचं निधन

अरुण साधू
प्रतिमा मथळा ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधू ७५ वर्षांचे होते

ख्यातनाम साहित्यिक आणि साक्षेपी संपादक अरुण साधू यांचं सोमवारी पहाटे निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते.

व्यक्ती ते समाज यांच्या परस्परावलंबी तरीही विरोधाभासी नातेसंबाधांचं चित्रण आपल्या समर्थ लेखणीनं करणाऱ्या साधूंच्या निधनानं मराठी साहित्य आणि पत्रकारितेतला महत्त्वाचा दुवा निखळला आहे.

विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील परतवाडा हे त्यांचं जन्मस्थान. नागपूरमधून बी.एस्सी पदवी मिळवल्यावर ते पुण्यात आले. इथूनच त्यांच्या पत्रकारितेला सुरूवात झाली.

'केसरी'मध्ये काही काळ वृत्तांकन, तेव्हाच्या गाजलेल्या 'माणूस' साप्ताहिकात लेखन केल्यानंतर साधू यांनी इंग्रजी पत्रकारितेची वाट धरली.

अनेक भाषांमध्ये मोठं नाव

'इंडियन एक्सप्रेस', 'टाईम्स ऑफ इंडिया', 'स्टेट्समन' आदि वृत्तपत्रांमधून त्यांनी केलेलं वृत्तांकन गाजलं. मुंबईतल्या 'फ्री प्रेस जर्नल' या दैनिकाचं संपादनही त्यांनी काही काळ केलं.

प्रसिद्ध 'टाईम' मॅगझिनचे ते पश्चिम भारताचे प्रतिनिधी होते.

पत्रकार म्हणून नाम कमावतानाच अरुण सांधूंनी मराठी साहित्य क्षेत्रातही स्वतंत्र स्थान निर्माण केलं.

मुंबई आणि महाराष्ट्रातल्या सर्वस्तरीय राजकारण, कामगार चळवळ आणि गुन्हेगारीचं चित्रण करणाऱ्या 'मुंबई दिनांक' (१९७३), 'सिंहासन' (१९७७) या दोन कादंबऱ्यांनी अरुण साधूंना देशस्तरावर ओळख मिळवून दिली.

या कादंबऱ्यांवर आधारित जब्बार पटेल दिग्दर्शित 'सिंहासन' हा चित्रपट आजही मराठी सिनेसृष्टीतला महत्त्वाचा चित्रपट गणला जातो.

Image copyright Facebook
प्रतिमा मथळा फेसबुकवर मुख्यमंत्री फडणविस यांची प्रतिक्रिया

'बहिष्कृत' (१९७८), 'स्फोट' (१९७९), 'त्रिशंकू' (१९८०), 'शापित' (१९८०), 'शोधयात्रा' (१९८९), 'झिपऱ्या' (१९९०), 'तडजोड' (१९९१) आणि 'मुखवटा' (१९९९) याही साधूंच्या महत्त्वाच्या कादंबऱ्या होत.

'बिन पावसाचा दिवस', 'मुक्ती', 'मंत्रजागर', 'बेचका, 'नाटक', 'पडघम', 'ग्लानिर्भवती भारत', 'बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या इमारती' आदी कथांच्या माध्यमातून साधूंनी विविध प्रकारचे मानवी स्वभाव, समाजातली विषमता यांचं वेधक चित्रण केलं आहे.

अरुण साधूंच्या कारकिर्दीत जगात आणि भारतात समाजवादी, साम्यवादी विचारांचा प्रभाव होता. त्याची दखल साधू यांच्या साहित्यामध्येही आढळते. 'फिडेल, चे आणि क्रांती', 'तिसरी क्रांती', '...आणि ड्रॅगन जागा झाला', 'ड्रॅगन जागा झाल्यावर...' यात याचं प्रतिबिंब दिसतं.

तर 'सभापर्व', 'अक्षांश रेखांश', 'निश्चिततेच्या अंधारयुगाचा अस्त' या साहित्यकृतींच्या निमित्त साधूंनी ललित-वैचारिक लेखनही केलं.

Image copyright Facebook
प्रतिमा मथळा खासदार सुप्रिया सुळे यांनीही फेसबुकवर साधूंसोबतचा त्यांचा एक फोटो शेअर केला.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यावरील 'यशवंतराव चव्हाण - जडण घडण' या ग्रंथाचे संपादन आणि 'सहकारमहर्षी' विठठ्लराव विखे-पाटील यांचे 'सहकारधुरिण' हे चरित्रलेखनही साधूंच्या बहुपेडी लेखनाचा एक भाग होता.

त्यांच्या साहित्यकृतींचे अन्य भाषांत अनुवाद झाले. त्यामध्ये मुंबई दिनांक (हिंदी, रशियन, युक्रेनियन), सिंहासन (हिंदी, मलयाळम), विप्लवा (इंग्रजी), झिपऱ्या (हिंदी), स्फोट (हिंदी), शोधयात्रा (हिंदी) यांचा उल्लेख करावा लागेल.

त्यांनीही प्रसिद्ध लेखक विक्रम सेठ यांच्या 'अ सुटेबल बॉय' या कादंबरीचा 'शुभमंगल' हा मराठी अनुवाद केले आणि डॉ. जयसिंगराव पवार यांच्या 'छत्रपती राजर्षी शाहू महाराज' या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद साधूंनी केला.

दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' चित्रपटाच्या लेखकांमध्ये अरुण साधूंचा समावेश होता.

प्रतिमा मथळा ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

१९९५ ते २००१ या काळात अरुण साधू हे पुणे विद्यापीठाच्या (आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) जनसंज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख होते.

साधूंच्या देदीप्यमान साहित्यसेवेचा सन्मान नागपुरात पार पडलेल्या ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद या रूपानं झाला. आपल्या खंबीर भूमिकांसाठीही ओळखले जाणारे साधू यांनी त्या वेळीही राजकारणी आणि साहित्य संमेलनं यांच्या संबंधांवर मांडलेल्या त्यांच्या स्पष्ट भूमिकेचं सर्वत्र स्वागत झालं.

२०१४ मध्ये गदिमा प्रतिष्ठानचा 'गदिमा पुरस्कार', २०१५ मध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा 'जनस्थान पुरस्कार' आणि या वर्षी अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा 'जीवनगौरव' अशा महत्त्वाच्या पुरस्कारांनी साधूंचा आणि त्यांच्या साहित्याचा गौरव झाला.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)