म्हातारपाखाडी : मुंबईतलं हरवत चाललेलं गाव

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
म्हातारपाखाडी : मुंबईतलं हरवत चाललेलं गाव

कौलारू रंगीबेरंगी घरं, मधूनच डोकावणारी झाडं, हिरव्यागर्द कुंपणावर उमललेली गुलाबी फुलं आणि पाखरांचा चिवचिवाट वगळता नीरव शांतता.. .

भर मुंबईत अशी एक जागा अजूनही टिकून आहे आणि वाढत्या शहरीकरणात आपली वेगळी ओळख जपण्यासाठी झगडते आहे.

हार्बर लाईननं रोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांच्या नजरेआडच ही वेगळी मुंबई लपली आहे.

माझगावात डॉकयार्ड रोड स्टेशनपासून अगदी काही मिनिटांवरच बॅरिस्टर नाथ पै मार्गावरचे दोन रस्ते म्हातारपाखाडीकडे जातात. गनपावडर रोड आणि म्हातारपाखाडी रोड.

गजबजलेल्या याच रस्त्यांवरून पुढे गेलं की छोट्या गल्ली-बोळांत लपलं आहे मुंबईतलं एक मूळचं गावठाण- म्हातारपाखाडी.

मुंबईच्या इतिहासाचे साक्षीदार

म्हात्रे कुटुंबीयांचं गाव, म्हातारीचं गाव किंवा माथ्यावरचं गाव- म्हातारपाखाडीच्या नावामागे अशा अनेक कथा असल्याचं तिथले रहिवासी स्टॅनिस्लास बाप्टिस्टा अभिमानानं सांगतात.

जवळपास तीनशे वर्षांपूर्वी पोर्तुगिजांच्या काळात माझगाव बंदर म्हणून विकसित होऊ लागलं, तेव्हा अगदी वसई-विरार परिसरातले लोक इथं स्थलांतरित झाले.

साहजिकच म्हातारपाखाडीवर आजही पोर्तुगीज संस्कृतीचा प्रभाव दिसतो आणि गोव्याचीच आठवण होते.

एकमेकांना जरा खेटून बांधलेली घरं, त्यांची 'कीपसेक', 'लायन्स डेन' अशी भन्नाट नावं. ओसरी, लाकडी जिने आणि खिडक्या, घरासमोरचे ख्रिसमस ट्रीज पाहून आपण खरंच मुंबईत आहोत का असा प्रश्न पडतो.

रस्त्यावर उभी वाहनं आणि गावाच्या वेशीलगतच्या नव्या उंच इमारती अशा मोजक्या खुणा सोडल्या तर आपण काही शतकं मागे गेल्याचाच भास व्हावा.

दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीपासून म्हातारपाखाडीचं रूप फारसं बदललेलं नाही. पाच-सात पिढ्या पाहिलेल्या या घरांत इतिहास जणू गोठून राहिला आहे.

विशेष म्हणजे म्हातारपाखाडीचे रहिवासी हा इतिहास जपून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत.

मुंबईच्या आठवणींचा खजिना

ज्येष्ठ पत्रकार, समीक्षक आणि मुंबईचे इतिहासकार रफिक बगदादी माझगावचे रहिवासी. म्हातारपाखाडीविषयी बोलताना तर ते आठवणींत रमून जातात.

"रविवारचा दिवस म्हणजे म्हातारपाखाडीत चर्चला जाणाऱ्यांची परेडच असायची. एरवी रस्त्यांवर शांतता असायची, पण ख्रिसमस आणि ईस्टरच्या दिवसांत मात्र जिम रीव्ह्ज, फ्रँक सिनात्रा यांच्या संगीताचे सूर कानावर पडायचे. एरवीही दुपारच्या वेळी घरांच्या उघड्या खिडक्यांतून मसाल्यांचा, खाद्यपदार्थांचा सुगंध दरवळायचा."

बोलता बोलता तो सुगंध आठवल्यासारखे रफीक एक क्षण श्वास घेण्यासाठी थांबले आणि आमच्या गप्पा पुढे सुरू राहिल्या.

"मुंबईच्या जडणघडणीत माझगावाचं आणि म्हातारपाखाडीचं मोठं योगदान आहे. लोकमान्य टिळकांचे सहकारी जोसेफ 'काका' बाप्टिस्टा, मुंबईचे महापौर डॉ. एम यू मास्करेन्हस म्हातारपाखाडीतच राहायचे."

1875 मध्ये उभारण्यात आलेला क्रॉस म्हातारपाखाडीची आणखी एक ओळख बनला आहे.

इथले बहुतांश रहिवासी ईस्ट इंडियन, कॅथलिक समाजाचे आहेत. पण अन्य धर्मांचे लोकही इथं गुण्यागोविंदानं राहिल्याचं डेनिस बाप्टिस्टा आवर्जून सांगतात.

"मुंबईत १९९२ साली दंगली झाल्या, तेव्हा आमचं गाव मात्र एकदम शांतच होतं. अँब्युलन्सचा भोंगा वाजला की, आम्ही टेरेसवर जायचो, आजूबाजूला दूर धूराचे लोट दिसायचे."

"इथं नेहमी सगळे मिळूनमिसळून राहायचे. आम्ही एकमेकांचे सणवार साजरे करायचो. म्हणून ही जागा अशीच राहावी असं आम्हाला वाटतं."

म्हातारपाखाडीचा अस्तित्वासाठी संघर्ष

माझगावातील म्हातारपाखाडी, गिरगावातील खोताची वाडी, वांद्रे येथील रांवर, चुईम, पाली अशा मुंबईच्या गावठाणांच्या जागी आता आधुनिक इमारती उभ्या राहतायत.

खरं तर मुंबईच्या हेरिटेज इमारतींचा अभ्यास आणि संवर्धन करण्यासाठी MMRDA अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने 1996 साली हेरिटेज कॉन्झर्वेशन सोसायटीची स्थापना केली होती.

1995च्या प्राथमिक अहवालानुसार मुंबईत 60 हेरिटेज प्रीसिंट (वारसा परिसर) होते. पण हेरिटेज इमारतींसंदर्भातले नियम तितके कडक नसल्यानं इमारतींचा पुनर्विकास रोखणं कठीण असल्याचं रफीक बगदादी नमूद करतात.

"म्हातारपाखाडीला हेरिटेज दर्जा देण्यात आला, पण हेरिटेज सोसायटीकडे फारसे अधिकार नाहीत. एखादा आपलं घर विकत असेल तर कुणी त्याला थांबवू शकत नाही. मुंबईत जमीन कुठे शिल्लक आहे? रि-डेव्हलपमेंट तर होतच राहणार."

खोताच्या वाडीत आता निम्म्याहून अधिक घरांची जागा इमारतींनी घेतली आहे. म्हातारपाखाडीत अजूनही 70-80 कौलारू घरं टिकून आहेत.

म्हातारपाखाडी अजून टिकून राहण्यामागचं कारण स्टॅनिस्लास नेमक्या शब्दांत सांगतात.

"अनेकजण घर विकून परदेशी स्थलांतरित झाले होते, पण आता काहीजण परतले आहेत. घराची डागडुजी सर्वांनाच परवडत नाही, पण आपलं गावही सोडवत नाही. पुढच्या पिढीचे लोकही हे सगळं टिकवण्याचा प्रयत्न करतायत."

"बेकायदा बांधकामं ही तर मोठी समस्या आहे. आम्हाला सरकारकडून पैशांची अपेक्षा नाही, पण ही जागा टूरिस्ट डेस्टिनेशन बनवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत."

हरवत चाललेली जुनी मुंबई पाहण्यासाठी आजकाल पर्यटक म्हातारपाखाडीला भेट देतात. कला, स्थापत्यशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थीही इथं अधूनमधून दिसतात.

लोकांना म्हातारपाखाडीविषयी आकर्षण का वाटू लागलं आहे? याचं उत्तर डेनिस बाप्टिस्टांकडे आहे:

"कितीही उंच इमारतींमध्ये गेलो तरी, पाय जमिनीवरच असावे लागतात. मातीची घरं हीच जाणीव करून देतात. टॉवरमध्ये राहूनही लोकांना नेरळ, अलिबागकडे सेकंड होम का हवं असतं? कारण ते घर मातीशी जोडतं."

"शेवटी आपण मातीतून आलो आहोत, मातीलाच मिळणार आहोत."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

या वृत्तावर अधिक