प्रेस रिव्ह्यू : NSCN(K) विरुद्ध भारताची म्यानमारजवळ ‘सर्जिकल स्ट्राइक’

भारतीय लष्कर Image copyright NArinder nanu/getty images
प्रतिमा मथळा प्रतिनिधिक छायाचित्र

भारतानं म्यानमार जवळ NSCN(K) या जहालमतवादी गटाविरुद्ध केलेली 'सर्जिकल स्ट्राइक', आणि पाकिस्ताननं दहशतवादासाठी अमेरिकेकडं दाखवलेले बोट, यांचा आजच्या प्रमुख बातम्यांमध्ये समावेश आहे.

भारताचं पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक

म्यानमार सीमेवर भारताच्या 'इस्टर्न कमांड' या तुकडीनं केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये NSCN(K) या जहालमतवादी गटाचे अनेक जण ठार झाल्याचं लष्करानं सांगितलं आहे.

बुधवारी सकाळी 4.45 वाजता ही कारवाई करण्यात आल्याचं लष्कराने आपल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे. भारताचे सर्व जवान सुखरूप आपल्या छावणीवर परतल्याचंही लष्कराने म्हटलं आहे.

सुट्टीवर असलेल्या जवानाची दहशतवाद्यांकडून हत्या

जम्मू काश्मिरच्या बंदिपुरा येथील रहिवाशी आणि सीमा सुरक्षा बलातील (बीएसएफ) जवान रमीझ पारे यांना अतिरेक्यांनी त्यांच्या राहत्या घरी कुटुंबियासमोर ठार केले.

या हल्ल्यात पारे यांच्या कुटुंबातील तिघं जण जखमी झाले आहेत.

रमीझ हे लष्कराच्या दहशतवादी शोध पथकात आहेत, असा संशय आल्याने अतिरेक्यांनी त्यांना त्यांच्या घरी ठार केले. रमीझ हे सुट्टीवर होते, असं वृत्त हिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे.

वाढत्या दहशतवादाची जबाबदारी अमेरिकेचीही- पाकिस्तान

दक्षिण आशियामध्ये दहशतवाद वाढण्यास अमेरिकासुद्धा कारणीभूत असल्याचं वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी न्यूयॉर्कमध्ये केलं आहे.

Image copyright lintao zhang
प्रतिमा मथळा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ

पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या दहशतवादाची जबाबदारी अमेरिकेनं देखील उचलावी, असं आसिफ यांनी म्हटले.

द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार ते पुढे म्हणाले, शीतयुद्धाच्या वेळी पाकिस्तानने अमेरिकेला सहकार्य केलं होतं. ही आमची चूक होती. त्याकाळात अमेरिकेनं आमचा वापर करून घेतला.

भाजप-शिव सेनेत पुन्हा खटके

शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असं शिवसेनेनं म्हटलं होतं.

Image copyright Indranil Mukherjee/Getty Images
प्रतिमा मथळा उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये सांगितलं की, "शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकारवर काहीच फरक पडत नाही."

लोकसत्तानं दिलेल्या वृत्तात ते म्हणाले, "शिवसेनेनं स्वतःच हसं करून घेतले असून ते आता बाहेर पडल्यामुळं काही फरक पडणार नाही."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)