प्रेस रिव्ह्यू : नरेंद्र मोंदीपेक्षा राहुल गांधी दुप्पट काळ परदेशात

राहूल गांधी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राहूल गांधी

कोण अधिक वेळ परदेशात - पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहूल गांधी; महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सामनामध्ये आलेला अग्रलेख, आणि यशवंत सिन्हा यांचा सरकारला नवा प्रश्न, या मुख्य बातम्या आजच्या वृत्तपत्रांमध्ये आल्या आहे.

कोण सर्वाधिक परदेशात?

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा दुप्पट काळ परदेशात व्यतीत केला आहे.

लोकसत्तानं दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान मोदी २१ दिवस, तर राहुल हे त्यांच्या दुप्पट, म्हणजे ४२ दिवस देशाबाहेर राहिले आहेत.

या २१ दिवसांमध्ये मोदींनी सहा दौरे करून १२ देशांना भेटी दिल्या, तर राहुल यांनी ४२ दिवसांमध्ये केवळ चारच देशांचे दौरे केले.

अमेरिका दौऱ्यात मिळालेल्या अनपेक्षित प्रतिसादानंतर गांधींनी रशिया आणि चीनच्या दौऱ्यावर जाण्याचं ठरवलं आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे. सुमारे दहा दिवसांचे हे दौर गुजरात निवडणुकीच्या तोंडावर असतील, असंही पुढे सांगण्यात आलं आहे.

Image copyright Getty Images

'राज्यकर्ते नालायक ठरले'

'सामना'मध्ये शुक्रवारी आलेल्या अग्रलेखातून महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली आहे. 'सामना' हे शिवसेनेचं मुखपत्र आहे.

शिवसेनेनं महागाई विरोधातलं आंदोलन असंख्य शेतकऱ्यांचे प्राण वाचविण्यासाठी आहे, असं यात म्हटलं आहे.

"वास्तविक ही जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. मात्र ती पार पाडण्यास राज्यकर्ते नालायक ठरल्यामुळेच शिवसेनेला रस्त्यावर उतरावे लागले आहे. जनतेचे आशीर्वाद आम्हांस आहेत, पण सरकारला ते पटत नसेल तर त्यांच्या डोक्याचा 'गांडो थयो छे!' बरोबर ना, चंद्रकांतदादा!," अशी टिका या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

"भावी मुख्यमंत्री" म्हणून पाटील यांना शुभेच्छा यात शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

"मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा बाळगणाऱ्या एकनाथ खडसे यांची सध्या काय अवस्था झाली आहे, याचा अभ्यासही चंद्रकांतदादांनी करायला हवा," असा सल्लाही सेनेनं या अग्रलेखातून दिला आहे.

Image copyright AFP

'वित्त मंत्रालयाचा पदभार का काढला?'

"मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला जर जयंत सिन्हा एवढे सक्षम होते तर त्यांना वित्त मंत्रालयातून का काढण्यात आलं?" असा प्रश्न माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी नरेंद्र मोदी सरकारवर केलेल्या टीकेला त्यांचेच पुत्र जयंत सिन्हा यांनी गुरुवारी द टाईम्स आफ इंडियामध्ये एका लेखातून उत्तर दिलं होतं.

केंद्र सरकारमध्ये नागरी हवाईवाहतूक राज्यमंत्री असलेले जयंत सिन्हा आधी वित्त राज्यमंत्री होते.

महाराष्ट्रात 125 बालकांचा मृत्यू

राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका 17 दिवसांपासून संपावर आहेत. या काळात लाखो बालकांना पोषण आहार मिळू शकलेला नाही. यामुळे गेल्या सतरा दिवसांत केवळ १६ आदिवासी जिल्ह्यांमध्ये १२५ बालकांचे मृत्यू झाले आहेत.

लोकसत्तानं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, सुमारे अडीच हजार कुपोषित बालकं आरोग्य विभागाच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहेत.

नवबौध्दांनाही मिळणार सर्व सुविधा

राज्यातील नवबौद्ध समुदायास बौद्ध समाजाप्रमाणे अल्पसंख्याक विकास विभागाच्या सर्व सुविधा तसेच योजनाचा लाभ यापुढे मिळणार आहे.

राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागानं याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. याचा लाभ राज्यातील सुमारे 50 लाख नवबौद्ध बांधवांना मिळणार आहे. असं सकाळच्या वृत्तात म्हटलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)