प्रेस रिव्ह्यू : डोनाल्ड ट्रंप नोव्हेंबरमध्ये आशिया दौऱ्यावर

डोनाल्ड ट्रंप Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा डोनाल्ड ट्रंप

डोनाल्ड ट्रंप यांचा नोव्हेंबरमध्ये आशियाच्या दौरा; ज्येष्ठ अभिनेते टॉम ऑल्टर यांचं निधन; शुक्रवारची चेंगराचेंगरी कशी टळली असती, तसंच दसऱ्यानिमित्त कुठे काय, या आजच्या वृत्तपत्रांमध्ये आलेल्या मुख्या बातम्या.

टॉम ऑल्टर यांचं निधन

आपल्या अनोख्या आंग्ल शैलीत हिंदी बोलून अनेक सिनेमांमध्ये छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते टॉम ऑल्टर यांचं निधन झालं. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित टॉम ऑल्टर 67 वर्षांचे होते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा टॉम ऑल्टर

द टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार अल्टर त्वचेच्या कॅन्सरने ग्रस्त असल्याचं नुकतंच कळलं होतं. कॅन्सरच्या चौथ्या टप्प्यांत त्यांता मृत्यू झाला.

अमेरिकन मूळचे ऑल्टर यांचा जन्म 1950 मध्ये मसूरीमध्ये झाला होता. त्यांनी जवळपास 60 चित्रपटांमध्ये काम केले, विशेषतः इंग्रज किंवा विदेशी व्यक्तीच्या भूमिकेत.

हिंदीशिवाय मराठी, गुजराती, मलयाळम, आसामी, बंगाली आणि कन्नड भाषांमध्येही त्यांनी काम केले. नाट्यक्षेत्रातही टॉम यांचं विशेष नाव होतं.

डोनाल्ड ट्रंप आशियाच्या दौऱ्यावर

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप हे नोव्हेंबर महिन्यात आशियाच्या दौऱ्यावर येणार आहेत. यात सध्यातरी भारताचा समावेश दिसत नाही.

3 ते 14 नोव्हेंबर दरम्यान या नियोजीत दौऱ्यामध्ये चीन, जपानसह पुर्व आशीयातील देशांचा समावेश आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांचा हा तीसराच परदेश दौरा असणार आहे.

भारताला चांगला मित्र माणणाऱ्या ट्रंप यंदा भारतात येणार नसले तरी त्यांची मुलगी इव्हांका नोव्हेंबर अखेर हैद्राबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी येण्याची शक्यता असल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

पाकीस्तानचा दावा भारतानं फेटाळला

अफगाणिस्तानातल्या एका जेलमध्ये कैद असलेल्या दहशतवाद्यासोबत कुलभूषण जाधव यांची अदलाबदली करण्याचा प्रस्ताव भारताकडून आला होता, असं विधान पाकीस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा मुहम्मद असीफ यांनी केलं होतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा फाईल फोटो

"हे पाकिस्तानचं आणखी एक काल्पनिक असत्य आहे," असं म्हणत भारतानं हे विधान धुडकावून लावलं आहे. याबाबतचं वृत्त द हिंदू, हिंदूस्तान टाइम्स तसंच इतर वर्तमानपत्रांनीही दिलं आहे.

लढाईचे रणशिंग फुंकूया!

"अच्छे दिन येतील व घराघरांत सुखसमृद्धी नांदेल, हे वचन तसे हवेतच विरले आहेत. रावणाची दहा तोंडे परवडली, पण आताचे एकतोंडी राक्षस शंभर बकासूरांना भारी पडत आहेत," अशी टीका सामनाच्या शनिवारच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

"बुलेट ट्रेनची मस्ती ही एल्फिन्स्टनच्या पुलावर २२ निरपराध्यांचा प्राण घेऊनही शांत झाली नसेल तर त्या बुलेट मस्तीची नशा उतरवण्याचा विडा उचलूया. आज नव्या लढाईचे रणशिंग फुंकूया!"

Image copyright Getty Images

बुलेट ट्रेन प्रकल्प म्हणजे एकप्रकारे फक्त झगमगाटाची 'छाः छूःगिरी' असल्याचं यात म्हटलं आहे.

शनिवारी होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनात आलेल्या अग्रलेखानं शिवसेनेची नेमकी भूमिका काय असेल, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रकल्प वेळेवर झाला असता तर..

मध्य रेल्वेनं परळ टर्मिनसच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानुसार, २०१५ मध्ये हे टर्मिनस सुरू करण्याचं नियोजित होतं. नंतर मात्र २०१९ची नवीन डेडलाइन देण्यात आली.

या टर्मिनससाठी केवळ ५१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. नियोजित वेळेत परळ टर्मिनस पूर्ण झालं असतं तर ही शुक्रवारची दुर्घटना टळली असती, असं महाराष्ट्र टाईम्सनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

मुंबई-अहमदाबाद मार्गावरील प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पाविरोधात प्रा. मोहन भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका केली आहे.

या प्रकल्पामुळे महाराष्ट्रावर चार लाख कोटी तर गुजरातवर सुमारे अडीच लाख कोटी रुपयांचे कर्ज होणार आहे, असं भिडे यांनी यात म्हटल्याचं वृत्त महाराष्ट्र टाईम्सनं दिलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)