स्पेन फुटीच्या उंबरठ्यावर? कॅटलोनिया सार्वमत केंद्रांना पोलिसांनी ठोकलं टाळं

स्पेन Image copyright Reuters
प्रतिमा मथळा पोलिंग बुथवर कब्जा करून बसलेले नागरिक

स्पेनच्या पोलिसांनी 2315 पैकी 1300 मतदान केंद्रांना टाळं ठोकलं आहे. स्पेन सरकार रविवारी होणारी जनमत चाचणी थांबवण्याचा प्रयत्न करत आहे.

तसंच पोलिसांनी स्थानिक सरकारच्या संपर्क यंत्रणेचा सुद्धा ताबा घेतला आहे.

कॅटलोनियाच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या प्रतिबंधित सार्वमत चाचणीनिमित्त बार्सिलोनामध्ये आयोजित शेवटच्या मेळाव्यात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते.

शाळा आणि सरकारी इमारतींचा वापर मतदान केंद्रासाठी न करू देण्याचा स्पेन सरकारचा प्रयत्न आहे. सील करण्यात आलेली बहुतांश केंद्रं ही शाळांमधील आहेत.

सार्वमतासाठी समर्थकांकडून रविवारी मतदान केलं जाणार आहे.

गुगलनंही मतदारांना मतदान केंद्रांची माहिती देणारं एक अॅप आपल्या स्टोअरमधून हटवलं आहे. सध्या हे अॅप डाऊनलोडसाठी उपलब्ध नसलं, तरी ज्यांनी या आधी डाऊनलोड केलं असेल त्यांना मात्र त्याचा वापर करता येत आहे.

स्थानिक सरकारचं म्हणणं आहे की, ते न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत आहेत.

Image copyright Getty Images

कॅटलोनिया हा ईशान्य स्पेनमधला एक सधन प्रदेश आहे. या प्रदेशाची लोकसंख्या 75 लाख आहे. या प्रदेशाची स्वतःची भाषा आणि संस्कृती तसेच उच्च दर्जाची स्वायत्तता आहे. पण स्पॅनिश घटनेनुसार त्याला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता नाही.

सार्वमतावर स्वमतदान करण्यावरून गेल्या पाच वर्षांत दबाव वाढला. 2015 च्या स्थानिक निवडणुकीत स्वतंत्र राष्ट्राला पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या युतीचा विजय झाला. असं असलं, तरी स्पेनशी निष्ठा राखणाऱ्या पक्षाला 40 टक्के मतं मिळाली.

कॅटलोनिया एका दृष्टिक्षेपात

  • स्पेनची 16 टक्के लोकसंख्या या प्रदेशात राहते
  • स्पेनतर्फे होणारी 25.6 टक्के निर्यात ही कॅटलोनियातून होते
  • स्पेनच्या जीडीपीमध्ये या प्रदेशाचा वाटा 19 टक्के आहे
  • स्पेनमधील 20.7 टक्के परदेशी गुंतवणूक या प्रदेशात आहे

खरंच मतदान होईल का?

कॅटलोनियातील सार्वजनिक इमारतींचा वापर कुठल्याही परिस्थितीत मतदान केंद्र म्हणून होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे.

अलिकडच्या काही आठवड्यांत पोलिसांनी सार्वमत चाचणीशी संबंधित सामग्री जप्त केली. या मोहिमेत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांवर खटले भरले आहेत.

असं असलं तरी कॅटलान सरकारनं दोन हजारांहून अधिक मतदान केंद्रांचं नियोजन करण्यात आल्याचं शुक्रवारी सांगितलं.

Image copyright Getty Images

कॅटलानचे अध्यक्ष कॅलस पुजडिमाँ यांनी रॉयटर्स न्यूज एजन्सीला सांगितलं की, मतदान पेट्या, मतपत्रिका आणि लोकांना त्यांचं मत मांडण्यासाठी जे काही आवश्यक असेल ते सर्व दिलं जाईल.

बार्सलोनातील मेळाव्याला संबोधित करण्यासाठी संध्याकाळी उशिरा ते आणि त्यांचे सहकारी आर्थर मास तिथं पोहोचले.

'सार्वमत ही लोकशाही आहे' अशी मोठी अक्षरं लिहिलेलं भव्य व्यासपीठ इथं उभारण्यात आलं होतं.

स्पॅनिश पंतप्रधान मैरिएनो राजॉय यांनी 2014 मध्ये घेण्यात आलेल्या प्रायोगिक सार्वमत चाचणीत कॅटलानच्या फुटीरवाद्यांना तंबी दिली होती.

त्यानंतर 2017 मध्ये होणारी सार्वमत प्रक्रिया ही असंवैधानिक असल्याचं म्हणत त्यांनी ही प्रक्रिया हाणून पाडण्याचा निश्चय केला आहे.

इतर प्रदेशांच्या तुलनेत कॅटलोनिया प्रदेशाला आधीच विविध स्वायतत्ता आणि सुविधा जास्तीच्या मिळाल्या आहेत, असा दावा स्पेनमधील अखंड देशाच्या बाजून असलेले नागरिक करतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)