गुन्हेगारीत कुठे आहे महाराष्ट्र? जाणून घ्या या 7 गोष्टी

गुन्हेगार Image copyright Getty Images

देशभरातल्या गुन्हेगारीचा लेखाजोखा केंद्रीय गृहमंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो अर्थात राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाकडून प्रत्येक वर्षी देशभरातील गुन्ह्यांचा आढावा घेतला जातो.

कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ किंवा घट झाली आहे? कोणत्या राज्यात गुन्ह्यांची काय स्थिती आहे? याची माहिती या अहवालात प्रसिद्ध केली जाते.

या अहवालात महाराष्ट्रासाठी महत्वाच्या या सात गोष्टी....

1. देशभरात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

2016 मध्ये देशात सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात नोंदवले गेले. त्यानंतर क्रमांक लागतो मध्य प्रदेशचा. तर तिसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र.

देशभरात नोंदवलेल्या एकूण गुन्ह्यांपैकी 8.8 टक्के गुन्हे महाराष्ट्रात नोंदवले गेले आहेत.

आकड्यांमध्ये पाहिले तर महाराष्ट्रात 2016 मध्ये आयपीसीनुसार 2 लाख 61 हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

2. हत्यांमध्ये बिहारनंतर महाराष्ट्र

देशभरात 2016 मध्ये सर्वाधिक हत्या उत्तर प्रदेशात झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात एकूण 4 हजार 889 हत्या झाल्या आहेत. दुसरा क्रमांक बिहारचा आहे.

तर तिसरा क्रमांक आहे महाराष्ट्राचा. महाराष्ट्रात 2016 मध्ये 2 हजार 299 हत्यांची नोंद झाली आहे. देशाच्या तुलनेत ही टक्केवारी 7.6 टक्के आहे.

3. अपहरणात महाराष्ट्र बिहारच्या पुढे

देशभरात अपहरणाच्या गुन्ह्यांची सर्वाधिक नोंद उत्तर प्रदेशात झाली आहे. तर महाराष्ट्र अपहरणांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात अपहरणाच्या 9 हजार 333 घटनांची नोंद झाली आहे.

देशाच्या तुलनेत ही संख्या 10.6 टक्के आहे. महाराष्ट्रानंतर बिहारचा क्रमांक आहे.

4. अल्पवयीन व्यक्तींकडून गुन्ह्यात दुसरा क्रमांक

अल्पवयीन व्यक्तींकडून होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा आहे. महाराष्ट्रात 6 हजार 606 अशाप्रकारच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून देशाच्या तुलनेत हे प्रमाण 18.4 टक्के आहे.

अल्पवयीन व्यक्तींवर होणाऱ्या सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद मध्य प्रदेशात झाली आहे.

5. सायबर गुन्ह्यांमध्ये दुसरा क्रमांक

ऑनलाईन फ्रॉडचा ज्यामध्ये प्रामुख्यानं समावेश होतो त्या सायबर गुन्ह्यांमध्ये उत्तर प्रदेशचा क्रमांक पहिला तर महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा आहे. महाराष्ट्रात 3 हजार 280 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

Image copyright Sean Gallup/getty

देशभराच्या आकडेवारीनुसार हे प्रमाण 19.3 टक्के आहे. महाराष्ट्रानंतर दिल्लीमध्ये सर्वाधिक सायबर गुन्हे नोंदवले गेले आहेत.

6. भ्रष्टाचाऱ्यांवरील गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल

शासकीय कर्माचारी-अधिकाऱ्यांविरोधात लाच घेतल्याप्रकरणी देशभरात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे .

महाराष्ट्रात 2016 मध्ये एकूण 1 हजार 16 प्रकरणांची नोंद झाली असून टक्केवारीनुसार हे प्रमाण 22.9 टक्के आहे. 2015 मध्ये महाराष्ट्रात 1 हजार 279 प्रकरणांची नोंद झाली होती. 

7. अॅट्रॉसिटीच्या नोंदवलेल्या गुन्ह्यात घट

अॅट्रॉसिटी अर्थात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार नोंद होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्रात घट झाली आहे.

2015 मध्ये महाराष्ट्रात अशा प्रकारच्या 1804 गुन्ह्यांची नोंद झाली होती. तर 2016 मध्ये ही संख्या घटून 1750 झाली आहे.

देशभरात या कायद्यानुसार नोंदवल्या जाणाऱ्या गुन्ह्यांची आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्र 12 व्या क्रमांकावर आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)