एका परीक्षेसाठी त्यांनी आयुष्य संपवलं...

गोष्ट त्या मुलांची ज्यांनी सामाजिक दबावामुळे स्वतःचा जीव दिला

अनामिका यादव, 16

ती तिच्या आजीसोबत हैदराबादला राहायची. ती NCC कॅडेट होती. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये तिची निवड होईल, अशी तिला आशा होती.

“बाबा, मी सैन्यात अधिकारी होईन आणि तुमची काळजी घेईन.”

अतिशय संतप्त स्वरात उदया म्हणते, “माझ्या बहिणीच्या मृत्यूला इंटरमीडिएट परीक्षा मंडळ जबाबदार आहे. तिचे मार्क मोजायला ते विसरू कसे शकतात? आम्ही मंडळाविरोधात तक्रार दाखल करू.”

तिच्या कुटुंबीयांना भेटलो तेव्हा उदया शांत वाटत होती आणि आपली बहीण या जगात नाही, हे कटू सत्य स्वीकारण्याचा प्रयत्न करत होती. पण आता ती संतप्त वाटतेय आणि आपल्या बहिणीच्या मृत्यूबाबत न्याय मिळवण्याची तिची इच्छा आहे.

इंटरमीडिएट परीक्षा मंडळाची पुनर्पडताळणी प्रक्रिया पार पाडल्यावर अनामिका पास झाल्याचं पुढे आलं. या प्रक्रियेत तिला आधीपेक्षा 28 गुण अधिक मिळाले.

अनामिकाची आजी उमा सांगते, “पुलवामामध्ये हल्ला झाला, तेव्हा अनामिकाने संपूर्ण दिवस टीव्हीसमोर बसून काढला. ती रडत होती. मी विचारलं, 'अगं का रडतेस?' तर ती म्हणाली, "हुतात्मा सैनिकांच्या मागे राहिलेल्या कुटुंबांविषयी विचार करून तिला वाईट वाटतंय.”

हैदराबादच्या दोन खोल्यांच्या एका घरात आजीसोबत अनामिका लहानाची मोठी झाली. कपाटांमधल्या पुरस्कारांकडे उमा बोट दाखवत उमा सांगतात की त्यांच्या नातीला अभ्यासक्रमाबाहेरच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला आवडायचं. “ती म्हणायची, ‘अम्मा, फक्त अभ्यास करून माझं काहीच होणार नाही. मला अभ्यास करायचा असेल तेव्हा मी करेन.’ पण कॉलेजात जाणं ती एकही दिवस चुकवत नव्हती. रात्री स्वयंपाकघरात बसून अभ्यास करायची,” उमा सांगतात.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी एनसीसी कॅडेट म्हणून अनामिका दिल्लीला जाणार होती.

घरातमध्ये बाहेरच्या बाजूला एक अरुंद खोली आहे. त्यात एका कपाटात अनामिकाचे NCCच्या गणवेशातले फोटो आणि तिने मिळवलेले अनेक पुरस्कार आहेत. सोबत इतर फॅमिली फोटोजही आहे. हैदराबादमधल्या विविध कार्यक्रमांत अनामिका NCC स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हायची.

अनामिकाचे आईवडील अदिलाबादला राहातात. तिचे वडील, गणेश यांचा अदिलाबादला लहानसा व्यवसाय आहे. “अनामिका ही सर्वांत चांगली मुलगी होती. मला शारीरिक व्यंग आहे, तर ती म्हणायची, ‘बाबा, मी सैन्यात अधिकारी होईन आणि तुमची काळजी घेईन.’ खोडकरही होती ती. सुट्ट्यांमध्ये घरी यायची तेव्हा घरभर धावायची आणि तिच्या खोड्यांनी सगळ्यांचं डोकं उठवायची,” गणेश डोळ्यांतलं पाणी आवरत, हसण्याचा प्रयत्न करत सांगतात.

अनामिका कॉलेज संपल्यानंतर दर एक-दिवसाआड तिच्या शाळेत थ्रो-बॉल, कबड्डी आणि बास्केटबॉल असे खेळ शिकवायला जायची.

अनामिकाने तिच्याच आधीच्या शाळेत शारीरिक प्रशिक्षण द्यायला सुरुवात केल्याचं उमा सांगतात. “तिच्या शिक्षकांना ती खूप आवडायची. ते शोक व्यक्त करायला आम्हाला भेटायला येत असतात. एक दिवसाआड दिवशी कॉलेज संपल्यानंतर अनामिका शाळेत थ्रो-बॉल, कबड्डी व बास्केट-बॉल असे खेळ शिकवायला जायची.”

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी NCC कॅडेट म्हणून अनामिका दिल्लीला जाणार होती. निवडप्रक्रियेच्या निकालाची ती वाट बघत होती. “अनामिका मला चिडवताना ‘तरुण पोरी’ असं म्हणायची. खूप समजूतदार मुलगी होती ती. तिला चिकन फ्राय आवडायचं. पण काही वेळा आमच्याकडे पैसे नसले, तर ती भाजीही चालेल, असं म्हणायची. शिन चॅन आणि डोरेमॉन, अशा तिच्या आवडत्या कार्टून्सचे आवाजही ती काढायची,” तिची आजी सांगते.

काही वर्षांपूर्वी एका शेजारच्या मुलीने वडील ओरडले म्हणून आत्महत्या केली होती, तो प्रसंग उमा यांना चांगलाच आठवतो. तो प्रसंग उमा यांना चांगलाच आठवतो. उमा म्हणतात, "अनामिकाला वाटायचं की कुणीतरी रागावलं, फक्त एवढ्याच कारणावरून त्या मुलीने हे पाऊल उचलणं चुकीचं आहे."

त्या दिवशी आजीचे नातेवाईक भेटायला येणार होते. त्याच गल्लीत दोन घरं सोडून राहाणाऱ्या मावशीकडे अनामिका गेली होती. “तिचा निकाल जाहीर झाल्याचं मला माहीत नव्हतं. मला वाटलं, ती तिथे झोपायला गेली आहे कारण इथे तेवढी जागा तशीही नव्हतीच. त्या दिवशी संध्याकाळी मी तिला चहासाठी बोलवायला गेले. थोड्याच वेळात येते, ती म्हणाली. पण ती कधीच आली नाही,” उमा सांगतात.

अनामिका यादव

सीलिंग फॅनला लटकलेली आढळली

थोटा वेन्नेला, १८

गाडी चालवायची बेसिक माहिती मी तिला दिली होती आणि ती माझ्या मागे बसून आम्ही गाडीवर फिरवाचो. एके दिवशी सकाळी ती बाबांची बाईक घेऊन फिरायला गेली. त्या वेळी मी झोपलो होतो.

पाणावलेल्या डोळ्यांनी पण चेहऱ्यावर हसू टिकवत व्यंकटेश सांगतो की त्याने तिला गाडी चालवणं शिकवलं होतं. त्याने तिला मोटरबाईक चालवायला शिकवलं. गाडी चालवायची बेसिक माहिती मी तिला दिली होती आणि ती माझ्या मागे बसून आम्ही गाडीवर फिरवायचो. एके दिवशी सकाळी ती बाबांची बाईक घेऊन फिरायला गेली. त्या वेळी मी झोपलो होतो."

"तिने मला गाडी फिरवून आल्याचं सांगितलं. माझा विश्वास बसला नाही म्हणून मग मी मी मागच्या सीटवर बसलो आणि तिला पुन्हा गाडी फिरवायला सांगितलं. ती अगदी सहजपणे बाईक चालवत होती, ते बघून मला भारी वाटलं.

"पण ती सुरक्षित आहे ना, याची खातरजमा करायला कधीकधी मी तिला न सांगता तिच्या पाठी जायचो. आमच्या गावाच्या बाहेर शेतांमधे ती गाडी घेऊन जायची. एकदा एका मैत्रिणीच्या लग्नाला बाइक घेऊन जायची तिची इच्छा होती. त्यासाठी आमच्या वडिलांकडून परवानगी घेण्यासाठी मी तिला पाठिंबा दिला होता.”

तिच्या लग्नासाठी मी पैसे साठवले होते. पण ते पैसे मी तिच्या शिक्षणावर खर्च करावेत, अशी तिची इच्छा होती.

वेन्नेलाहून एक वर्षाने मोठा असलेला व्यंकटेश गेल्या वर्षी कॉमर्स आणि नागरिक शास्त्राच्या पेपरमध्ये नापास झाला. “या वर्षी माझ्या बहिणीने आणि मी सोबतच अभ्यास केला होता. काही वेळा तिच्या वर्गातली मुलं शंका विचारण्यासाठी यायची. अवघड संकल्पना लक्षात ठेवायला ती आम्हाला सोप्या युक्ती शिकवायची.”

वेन्नेलाला पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. तिचे वडील टी. गोपालकृष्ण निझामाबादमधील ग्राहक न्यायालयात अटेंडरची नोकरी करतात.

“तिच्या लग्नाचा विषय आम्ही काढला की ती मला खडसावायची. लग्न करण्याशिवायही आयुष्यात बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत, असं म्हणायची. डिग्री मिळाली तर समाजात तिला मान मिळेल, असं ती म्हणायची. वेन्नेलाचा जन्म झाला तेव्हा मी दारू सोडली. तिच्या लग्नासाठी मी पैसे साठवले होते. पण ते पैसे मी तिच्या शिक्षणावरी खर्च करावेत, अशी तिची इच्छा होती,” ते सांगतात.

तिला पाणीपुरी खूप आवडायची. आता मला कधी पाणीपुरी खाता येईल की नाही, माहीत नाही.

व्यंकटेश त्याचं पाकीट उघडतो आणि बहिणीचा फोटो दाखवता. तो कायम हा फोटो सोबत घेऊन जातो. “आम्ही भांडायचो. काही वेळा मला त्रास द्यायला ती खोड्या काढायची. बाइकवरून जाण्याबद्दलही ती माझ्याशी भांडायची. मी कधी शहरात गेलो असेन, तर ती काहीतरी बाहेरचं खायला आणायला सांगायची. तिला पाणीपुरी खूप आवडायची. आता मला कधी पाणीपुरी खाता येईल की नाही, माहीत नाही.”

वेन्नेलाची चुलत बहीण अमूल्या आत्ताच दहावीची परीक्षा पास झाली. निकाल जाहीर झाले तेव्हा ती वेन्नेलासोबतच होती. “इंटरमीडिएटसाठी मी गणित घ्यावं, असा सल्ला ताईने मला दिला होता. माझं गणित चांगलं असल्यामुळे पुढे चांगले मार्क मिळवायला मला ते उपयोगी पडेल, असं ती म्हणाली. ती जेव्हा केव्हा आमच्या घरी यायची तेव्हा आमच्या आवडीचे पदार्थ बनवायची. आम्ही कॉमेडी शो बघायचो. आसपासच्या सगळ्यांना ती जोक सांगून खूप हसवायची.”

निकाल जाहीर झाला त्या दिवशी वेन्नेला नेहमीच्या दिनक्रमाला लागली होती. संध्याकाळी तिने वडिलांच्या मोबाईलवर निकाल बघितला. निकाल बघितल्यावर तिचा त्यावर विश्वास बसत नव्हता, असं तिची आई सांगते.

“ती सारखं तेच बोलत होती, 'मी नापास कशी काय होईन?' आम्ही तिला समजावलं. झालं ते ठीक आहे, तू आता गुणांच्या फेरतपासणीसाठी अर्ज करू शकते, पुन्हा परीक्षा देऊ शकते, असं आम्ही तिला सांगत होतो. नंतर ती जेवण करायला स्वयंपाकघरात गेली. पुढच्याच मिनिटाला ती वॉशरूममधून रडत बाहेर आली नि मला म्हणाली की तिने उंदराचं विष खाल्लंय. आता परीक्षेत नापास झाल्याबद्दल तिला मरू द्यावं!"

"हॉस्पिटलमध्येही ती तेच बोलत होती, ‘मी पास व्हायला हवं होतं’. तिला चांगल्या येणाऱ्या विषयांमध्येच ती नापास झाली, याने ती निराश झाली होती,” वेन्नेलाची आई सांगते.

थोटा वेन्नेला

बाथरूममध्ये जाऊन तिने उंदराचं विष खाल्लं

मोदेम भानू किरण, १८

"आम्हाला एथिकल हॅकर व्हायचं होतं. युट्यूबवर आम्ही त्यासंबंधीचे ट्युटोरियल बघायचो आणि तसे प्रयत्न करायचो," असं वर्गमित्र आणि चुलतभाऊ असलेला युगेश सांगतो.

“आमच्या वयात थोड्या दिवसांचंच अंतर होतं, त्यामुळे बालवाडीपासून आम्ही एकाच वर्गात होतो. खोड्या काढण्यात आम्ही एकत्र असायचो, तो माझा बेस्ट फ्रेंड होता. आम्ही कॉलेजात एकत्र जायचो. आम्हाला दोघांनाही गणित आवडायचं. कम्प्युटर लँग्वेजमध्ये त्याचा हातखंडा होता. त्याच्यामुळेच मला त्यात रस वाटायला लागला,” युगेश सांगतो.

किरणचे वडील सारंगपाणी हे भाजीविक्रेते आहेत. त्यांच्या दोन खोल्यांच्या घरात एका कोपऱ्यात पॅक करून ठेवलेल्या गिटारकडे ते बोट दाखवतात. त्यांच्या मुलाला म्युझिक आवडायचं, असंही ते सांगतात. गिटारसोबत किरणच्या छायाचित्राची एक फ्रेम घरात ठेवलेली आहे.

“काही व्हिडिओ बघूनच तो गिटार वाजवायला शिकला होता. शाळेत आणि कॉलेजच्या कार्यक्रमांमध्ये तो वाजवायचा. तेलुगू सिनेमांमधली पाच-सहा गाणी त्याला वाजवता यायची.”

किरणच्या मृत्यूच्या धक्क्यातून त्याची आई अजूनही सावरलेली नाही. किरण एकुलता एक मुलगा होता. सौम्यभाषी आणि सद्वर्तनी मुलगा म्हणून त्याची ओळख होती. “स्वतःचे फोटो काढायलाही त्याला खूप आवडायचं. वेगवेगळ्या पोजमधे तो स्वतःचे फोटो काढायचा. आता आमच्याकडे फक्त हे फोटो उरलेत,” किरणचे वडील अश्रू आवरत थरथरत्या स्वरात सांगतात.

युगेश आणि किरणला तेलुगू चित्रपट पाहायला आवडायचं. “अल्लू अर्जुन हा आमचा फेव्हरेट अभिनेता होता. वेळ मिळेल तेव्हा आम्ही त्याचे पिक्चर बघायचो,” युगेश म्हणतो.

निकाल जाहीर झाला तेव्हा युगेश आणि किरण एकाच खोलीत झोपलेले होते. किरण अस्वस्थ होता, पण जेवणाच्या वेळी त्याचं वागणं नेहमीसारखंच होतं. “तो कधी उठला आणि बाहेर पडला ते कळलंच नाही. निकालांविषयी तो त्या दिवशी संध्याकाळी फारसं बोलला नाही.”

किरणचं छिन्नविछिन्न झालेलं शरीर रेल्वे रुळांवर सापडलं. मध्यरात्री घराबाहेर पडल्यावर त्याने धावत्या ट्रेनसमोर उडी मारल्याचं मानलं गेलं.

मोदेम भानू किरण

त्याचं छिन्नविछिन्न झालेलं शरीर रेल्वे रुळांवर सापडलं.

धर्मा राम पतुरू, १८

गेम ऑफ थ्रोन्सचा आठवा सीझन एकत्र बघायचं आम्ही ठरवलेलं. जॉन स्नो हे त्याचं सर्वांत लाडकं पात्र होतं.

“खरं तर आम्ही अव्हेन्जर्स एन्डगेमही एकत्र पाहायचं ठरवलं होतं. दिपू मार्व्हलचा खूप मोठा फॅन होता,” धर्म रामची शेजारी आणि जिवलग मैत्रीण निवेदिता सांगते.

त्याची पाच वर्षांनी मोठी बहीण महिता हिने त्याचं टोपण नाव दीपू असं ठेवलं होतं. “आमच्या आईपेक्षाही मी त्याच्यासाठी आईसारखी होते. मी त्याला दीपू म्हणायचे म्हणून त्याला तेच नाव आवडायचं. तो कायम सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरायचा. सहा वर्षांपासून ते सत्तर वर्षांपर्यंतचे लोक त्याचे मित्र होते. माझ्या मित्रमैत्रिणींसोबतही त्याचं चांगलं जमायचं, तो आमच्यापेक्षा लहान आहे असं त्यांना वाटायचंही नाही. खूप प्रगल्भ होता तो,” महथी सांगते.

कोणताही प्रश्न शांतपणे सोडवायचं आपल्या धाकट्या भावाचं कसब बघून ती अवाक् होऊन जायची, असं ती सांगते. कॉलेजात दीपूच्या खोड्या सुरू असायच्या, पण अभ्यासाच्या वेळेत त्याचं पूर्ण लक्ष अभ्यासातच असायचं, असं त्याचे कॉलेजातले मित्र सांगतात. “आम्ही एकाच शाळेत होतो. पण कॉलेजात आल्यावर आमची खरी मैत्री झाली. शिक्षकांशी त्याचं पटायचं नाही, पण सीमारेषा कुठे आहे एवढं तो समजून असायचा,” दीपूची वर्गमैत्रीण हर्षिनी सांगते.

दीपूला KFC चिकन आवडायचं. KFCमध्ये तो मित्रमंडळींसोबत जायचा. “दीपू कायम मौजमजेच्याच मूडमध्ये असायचा असं नाही. इंजीनियरिंगमधे कोणता कोर्स निवडावा, यासाठी त्याने माझा सल्ला मागितला होता. त्याला फिजिक्स आवडायचं. त्या विषयात त्याला खूप रस होता,” दीपूच्या वरच्या वर्गातला अभिराम सांगतो.

संयुक्त प्रवेश परीक्षेमध्ये दीपूने 84 टक्के मिळवले. “एव्हिएशनशी संबंधित कशामध्येही माझ्या भावाला रस होता. त्यामुळे एव्हिएशनला धरून एखादा इंजीनियरिंग कोर्स करायचं त्याच्या मनात होतं. भारतीय हवाई दलात वैमानिक बनायची त्याची इच्छा होती, म्हणून तो नॅशनल डिफेन्स अकॅडमीत प्रवेशाची तयारी करत होता,” असं महिथा सांगते. विविध परीक्षांची वेळापत्रकं आणि अभ्यासाची वेळापत्रकं लावलेली दीपूची खोली दाखवत ती त्याच्याविषयी बोलते.

महिथा आणि तिची आई यांनी दीपूशी संवाद साधला, त्याला समजावलंही. सगळं ठीक होईल, असं सांगितलं. “ट्यूशनला कधीपासून येऊ, असं त्याने शिक्षकांना फोन करून विचारलंही होतं. आम्ही सगळे आपापल्या कामात गुंतलो. दीपू बाथरूममध्ये गेला. त्याला त्याची-त्याची स्पेस मिळावी, असं आम्हालाही वाटलं. पण थोड्याच वेळात आम्हाला धाड आवाज आला. दीपू बाथरूममध्ये गेलाय, असं आम्हाला वाटत होतं, पण त्याने बाल्कनीतून खाली उडी मारली होती,” महिथा सांगते.

धर्मा रम्पा तुरू

बाल्कनीतून खाली उडी मारली.

वोडनाली शिवानी, १६

तिला इंजिनियर व्हायचं होतं .

घटना घडल्यावर जवळपास 15 दिवसांनी आम्ही शिवानीच्या पालकांना भेटायला गेलो. त्यांच्या रस्त्याकडे आम्ही वळलो तेव्हा तिच्या आईच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता.

तेलंगणातील एका गावात गल्ल्यागल्ल्यांमधल्या एकमजली घरांच्या मधेच शाकारलेल्या छपराच्या एका घरात आम्ही गेलो. या घरात गेली आठ वर्षं हे कुटुंब भाड्याने राहातं. शिवानीची आई लावण्याच्या हातात एक लॅमिनेटेड पोस्टर होतं. त्यात शिवानीचं छायाचित्र होतं आणि ‘मला इंजिनियर व्हायचंय’ असं त्याखाली लिहिलेलं होतं.

शिवानीचे वडील भूमा रेड्डी त्यांच्या पत्नीजवळ बसून आमचं बोलणं समजून घ्यायचा प्रयत्न करत होते. त्यांना ऐकू येत नाही. आम्ही त्यांच्या मुलीविषयी बोलतोय, हे कळल्यावर ते म्हणाले, “माझी मुलगी खूप हुशार होती.”

शिवानी तल्लख विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती. तिच्या मैत्रिणी स्वतःच्या शंका घेऊन तिच्याकडे यायच्या. “मैत्रिणींच्या घरी जायला तिला आवडायचं नाही. त्यामुळे आम्हीच अभ्यासासाठी तिच्या घरी जायचो,” शिवानीची मैत्रीण अनिता सांगते. स्वयंपाकघरात शिवानी आणि तिची धाकटी बहीण तयार व्हायच्या. शिवानीच्या फोनवरचे फोटो तिची बहीण आम्हाला दाखवते.

“अक्काला बांगड्या खूप आवडायच्या. वेगवेगळ्या रंगांच्या बांगड्या ती विकत घ्यायची, घालायची आणि फोटो काढायची,” शिवानीहून तीन वर्षांनी लहान असलेली अनुषा सांगते. बेडरूममधल्या भिंतीवर शिवानीच्या अभ्यासाचं वेळापत्रक लावलेलं आहे आणि सोबत परीक्षेच्या तारखाही लिहिलेल्या आहेत. दररोज पहाटे चार वाजता उठायची वेळ शिवानीने ठरवली होती, असं वेळापत्रकावरून दिसतं.

शिवानीला खूप अभ्यास करून इंजीनियर व्हायचं होतं. “गुरं हाकायचं सोडून द्यावं, असं ती तिच्या बाबांना सांगायची. त्यांना शारीरिक अपंगत्व असल्यामुळे त्यांनी काम थांबवावं, असं तिला वाटायचं. ती म्हणायची, ‘पाच वर्षं थांबा, मग आपलं जगणं बदलून जाईल’,” लावण्या सांगते. तेव्हाच आणखी काही शेेजारी तिथे येतात. शिवानी भिडस्त आणि सद्वर्तनी मुलगी होती, असं सगळ्या शेजाऱ्यांचं म्हणणं होतं.

निकाल जाहीर झाले त्या रात्री शिवानीने मोबाईल तिच्या बहिणीकडे- अनुषाकडे दिला आणि तिचा फोन अनलॉक करण्यासाठीचा पासवर्डही सांगितला. “अक्का कधीच मला फोन द्यायची नाही. मी शिक्षणावर लक्ष केंद्रित करावं, मोबाइल फोनमधे वेळ घालवू नये, असं ती म्हणायची. पण त्या दिवशी ती म्हणाली, आजपासून मीही फोन वापरू शकेन.”
दुसऱ्या दिवशी पहाटे शिवानीला छपराला लटकलेल्या अवस्थेत अनुषानेच पहिल्यांदा बघितलं. “अजूनही मला रात्री झोप लागत नाही,” अनुषा म्हणाली.

वोडनाली शिवानी

छपराला गळफास घेऊन आत्महत्या

देवसोथू नीरजा, 17

मी आणि तिचे बाबा कामासाठी लवकर घराबाहेर पडायचो, भावाला तयार होण्यासाठी ती मदत करायची, कधीकधी जेवणही बनवायचं काम तीच करायची आणि मग कॉलेजला जायची.

“रात्र-रात्र ती अभ्यास करत बसायची,” नीरजाची आई फंगी सांगते. नीरजाला जास्त मित्रमैत्रिणी नव्हत्या. घरातल्या मातीच्या जमिनीवर तिचे वडील रुपाल सिंग बसलेले असतात आणि आपल्या मुलीची दहावीची गुणपत्रिका बाहेर काढतात.

“सगळ्या परीक्षा ती पहिल्या प्रयत्नात पास झालेली आहे. डॉक्टर व्हायचंय, असं ती म्हणायची. त्यामुळे शक्य असेल ते सर्व काही आम्ही तिच्यासाठी करायला हवं, असं आम्हाला वाटायचं.”

नीरजाने नेहमीप्रमाणे त्या दिवशीही सकाळी आईवडिलांसाठी जेवण तयार केलं. ते दोघे कामासाठी बाहेर पडल्यावर ती थोडा वेळ भावंडांसोबत खेळली. त्यांना जेवण भरवलं. जेवण झाल्यावर तिने भावंडांना खोलीच्या मागच्या बाजूला झोपायला सांगितलं, तो भाग पडद्याने वेगळा केलेला आहे.

संध्याकाळी भाऊ हाका मारत असतानाही तिचा प्रतिसाद आला नाही, म्हणून भावंडांनी पडदा बाजूला केला, तर नीरजा दुपट्ट्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत सिलिंग फॅनला लटकत होती.

देवसोथू नीरजा

सीलिंग फॅनला लटकत्या अवस्थेत आढळली

उस्के रुचिता, १८

रुचिकाचे खूप लाड केले जायचे आणि कुटुंबातल्या व परिसरातल्या सर्वांची ती खूप लाडकी होती.

गावातलं रुचिकाचं घर शोधणं अजिबात अवघड नव्हतं. आम्ही तिच्या घरी पोचलो तेव्हा तिची आई, वहिनी आणि आजी लग्नाच्या अल्बममधले फोटो पाहत होत्या. “हा आमच्या मुलाच्या लग्नाचा अल्बम आहे. रुचिताची आमच्याकडची सगळी चांगली छायाचित्रं एवढीच आहेत,” रुचिकाची आई रडत सांगते. तिचे आजोबा, बेगाय्या आले आणि बसले. रुचिताचे खूप लाड केले जायचे आणि कुटुंबातल्या व परिसरातल्या सर्वांची ती खूप लाडकी होती, असे ते म्हणाले.

“तिला दिसायला अडचण यायची. त्यामुळे तिचे बरेच लाड होत असत. इंटरमीडिएट परीक्षेतून पुढे जाऊन तिने एकदा का पदवी घेतली, की मग नोकरी मिळायची संधी वाढेल, असं तिच्या बाबांना वाटत होतं. म्हणजे ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकली असती,” असं रुचिताचे आजोबा डोळे पुसत सांगतात.

परीक्षा पास होऊ, असा रुचिताला आत्मविश्वास असल्याचं चंद्राया म्हणाल्या. “परीक्षा झाल्यावर ती म्हणाली, सर्व विषयांमध्ये ती पास होईल आणि पदवीसाठी कॉलेजात जायची तयारी ती सुरू करेल.”

आम्ही तिथे असताना सहा ते आठ वर्षांची काही मुलं तिथे आली. रुचिता अक्का ही त्यांची मैत्रीण होती आणि त्यांना न सांगता ती कुठे गेली हे काही कळत नाही, असं ती मुलं म्हणाली. निकाल झाला त्या दिवशी रुचिता तिच्याशी खेळणाऱ्या चार मुलांचा पापा घेण्यासाठी आली होती, असं तिचे आजोबा बेगय्या सांगतात. “मी तिला तेव्हाच शेवटचं पाहिलं.”

उस्के रुचिता

गळफास घेतला

दोंत्रवेणी प्रशांत, १८

आमच्या ग्रुपमधला सर्वांत चांगला दिसणारा पोरगा तोच होता.

आम्ही प्रशांतच्या गावी पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. गावाच्या मध्यवर्ती भागात त्याच्या मित्रांनी प्रशांतला आदरांजली वाहणारा फलक लावलेला आहे. तेच आम्हाला प्रशांतच्या घरी घेऊन गेले. त्याचा फोटो दाखवण्यासाठी अनिल नावाच्या एका मित्राने त्याचा फोन बाहेर काढला.

“आमच्या ग्रुपमधला तो सर्वांत चांगला दिसणारा पोरगा होता. आमच्यासोबत तो भटकायचा. आम्ही आमच्या आईवडिलांची काळजी घ्यायला हवी, असं सांगायचा,” अनिल म्हणतो.

आपला एकमेव मुलगा गमावल्याच्या दुःखाखाली प्रशांतचं कुटुंब दबून गेलंय. “माझा मुलगा खूप हुशार नव्हता. पहिल्या वर्षाची परीक्षा पास होण्यासाठीही त्याला खूप कष्ट करावे लागले. पण आणखी कष्ट करण्याची त्याची तयारी होती. डिग्री मिळवण्यासाठी केवळ परीक्षा पास होण्याचं त्याचं उद्दिष्ट होतं,” त्याचे वडील कोमुरय्या सांगतात.

स्थानिक ग्रामदेवतेच्या उत्सवाची ती रात्र होती. साधारणतः ती रात्र प्रशांत व त्याचे मित्र देवळात घालवत असत, त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी तो परत येईल, अशी प्रशांतच्या कुटुंबीयांची अपेक्षा होती. पण रात्री उशिरा प्रशांतने त्याच्या मित्राला फोन केला. “दुसऱ्या वर्षीच्या परीक्षेतही नापास झाल्यामुळे तो खूप नाराज होता. मी त्याला थोडं उत्साही करायचा प्रयत्न केला. पण त्याने सॉरी म्हणून फोन ठेवून दिला,” प्रशांतचा एक मित्र सांगतो.

दोंत्रवेणी प्रशांत

गळफास लावून आत्महत्या

आमच्या मुलांना कोणी मारलं?

तेलंगणात इंटरमीजिएटच्या परीक्षेनंतर तेलुगू भाषेच्या पेपरमध्ये नापास झाल्यामुळे अनामिका ही आपली मुलगी अरुतला गणेश यांनी गमावली. पुनर्पडताळणी प्रक्रियेविषयी साशंकता असल्याचं ते म्हणतात. नव्या मार्कांचा दाखला देऊन ते सांगतात की, तिला आधी तेलुगूमध्ये शून्य मार्क मिळाले होते, पण पुनर्पडताळणीनंतर तिला 99 मार्ग मिळाले.

“अशा प्रकारांमुळे आपल्या मनात शंका निर्माण होते. पण मूल गमावलेल्या माझ्यासारख्या पालकांना या कशातच अर्थ कसा वाटेल.”

वेन्नेलाचे वडील गोपाळकृष्ण यांना मध्यवर्ती मंडळाविरोधात याचिका दाखल करायची आहे. “आपण अपयशी आहोत हे स्वीकारण्याची माझ्या मुलीची तयारी होती. तिला इतक्या टोकापर्यंत कोणी ढकललं याची उत्तरं मला हवीत. माझ्या मुलीच्या मृत्यूला कोण कारणीभूत आहे.”

धर्मा रामची आई विजयालक्ष्मी संताप व्यक्त करते. “गरोदर असताना मी खूप त्रास सहन केला. आता मी माझा मुलगा गमावलाय. त्याच्यावर सर्वांचं प्रेम होतं. आपण कशात अपयशी होऊ शकतो ही वस्तुस्थिती त्याला स्वीकारता आली नाही.”

समाजाच्या विद्यार्थ्याकडून खूप अपेक्षा असतात, असं त्याचा मित्र अभिराम म्हणतो. “आम्हाला चांगले मार्क मिळायला लागले की चांगल्या भविष्याविषयी आम्हाला आशा वाटायला लागते. पण शेवटी सगळं चांगलं होईल, हे कोणीच आम्हाला सांगत नाही.”

परीक्षा मंडळाच्या अधिकाऱ्यांवर चुकांसंबंधीचे आरोप

तेवीस विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यानंतर झालेल्या निदर्शनांची दखल घेत न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने हस्तक्षेप करून इंटरमीडिएट परीक्षा मंडळाला पेपरांची पुनर्पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत.

एकूण 9.74 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यातील 3.28 लाख नापास झाले. म्हणजे इंटरमीडिएटच्या पहिल्या वर्षामध्ये 60.5 टक्के विद्यार्थी पास झाले आणि दुसऱ्या वर्षामध्ये 64.8 टक्के विद्यार्थी पास झाले. परंतु, 2018 मध्ये पहिल्या वर्षातील पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण 62.73 टक्के होतं, तर दुसऱ्या वर्षामधील पास विद्यार्थ्यांचं प्रमाण 67.06 टक्के होतं. 2017 साली इंटरमीडिएटमधील पहिल्या आणि दुसऱ्या वर्षांमधील पास विद्यार्थ्यांचं प्रमाण अनुक्रमे 57.3 टक्के आणि 67 टक्के असं होतं.

18 एप्रिलला निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी व पालकांनी आरोप केले की, पुनर्पडताळणीमध्ये व गुणांकन प्रक्रियेमध्ये त्रुटी आहेत. वेणुगोपाल रेड्डी 19 एप्रिलपासून रोज मध्यवर्ती मंडळाकडे फेऱ्या मारत आहेत. त्यांचा मुलगा गणित, पदार्थशास्त्र व रसायनशास्त्र शाखेत शिकत होता. “माझ्या मुलाला पहिल्या वर्षी गणितामध्ये 75 पैकी 75 गुण मिळाले, पदार्थशास्त्रात 60 पैकी 60 मिळाले आणि रसायनशास्त्रातही पैकीच्या पैकी गुण मिळाले. पण या वर्षी या वर्षी त्याला गणिताच्या पेपरमध्ये प्रत्येकी एक गुण मिळाला आहे आणि पदार्थशास्त्रात शून्य गुण मिळाले. हे कसं शक्य आहे?"

"माझा मुलगा इतर स्पर्धापरीक्षांची तयारी करतोय. पण हा निकाल बघून त्याला नैराश्य आलं. त्याने अभ्यास करायचं सोडून दिलंय, खाणंपिणंही सोडून दिलंय, आणि तो घराबाहेर पडायचंही टाळतो. त्याच्या मानसिक आरोग्याची मला चिंता वाटतेय,” वेणुगोपाल रेड्डी डोळे पुसत सांगतात.

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा आढावा घेतला असून कोणतंही वाढीव शुल्क न घेता पेपरांची पुनर्पडताळणी करावी, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पेपरांची पुनर्पडताळणी प्राधान्याने करण्याचं काम मंडळाने हाती घेतलं आहे. या संदर्भातील निवेदनात अधिकारी म्हणतात, “आत्महत्यांविषयी मंडळाला अतीव दुःख होतं आणि पालकांची न भरून निघणारी हानी झाल्याचीही आम्हाला कल्पना आहे. परंतु तांत्रिक व निकाल प्रक्रियांमधील त्रुटींमुळे होणाऱ्या चुकांशी या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा काहीही संबंध नाही, हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो.”

अपयश की कलंक?

विनाअनुदानित खासगी कनिष्ठ महाविद्यालयांच्या विरोधातील आरोपांबाबत चौकशी करण्यासाठी मध्यवर्ती मंडळाने एक समिती स्थापन केली. या समितीच्या अहवालात म्हटले होते की, “एखाद्या व्यक्तीने आत्महत्या करणं ही व्यक्तिगत, सामाजिक व नैतिक शोकांतिका असते. ही व्यक्ती तरुण असते आणि जगण्याला नुकतीच सुरुवात करू पाहणारी असते, तेव्हा ही शोकांतिका आणखी गंभीर बनते. समाजाची आर्थिक, सामाजिक व नैतिक वीण कशी आहे, यासंबंधीचे प्रश्न या शोकांतिकेतून उपस्थित होतात.”

“समितीच्या मते, वर्षानुवर्षं व्यवस्थापकीय मंडळांनी, पालकांनी व अधिकारीसंस्थांनी या समस्येला खतपाणी घातलं आहे. व्यवस्थापकीय मंडळांचे व्यावसायिक उद्देश, पालकांच्या अवास्तव महत्त्वाकांक्षा आणि मध्यवर्ती मंडळाची अपरिणामकारक अंमलबजावणी यंत्रणा, हे सर्व घटक या समस्येमधील समान भागीदार आहेत,” असेही या अहवालात म्हटले होते. हा अहवाल २००१ साली मध्यवर्ती मंडळाला व सरकारला सादर करण्यात आला. खाजगी महाविद्यालयांमधील प्रवेश मर्यादित करणं, व्यावसायिक समुपदेशकांना सेवेत घेणं, खेळ अनिवार्य करणं, पालकांना व विद्यार्थ्यांनी कारकीर्दीविषयी समुपदेशन पुरवणं, अशा काही शिफारसी त्यात करण्यात आल्या आहेत. परंतु, या अहवालातील शिफारसींची अंमलबजावणी झालेली नाही.

दरम्यान, विद्यमान शिक्षणव्यवस्थेचा विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीवर सखोल परिणाम होतो, असे मानसशास्त्रज्ञांना वाटतं. “परीक्षा ही संकल्पनाच तणावाने ग्रासलेली आहे. केवळ विद्यार्थीच नव्हे तर कुटुंबं आणि व्यापक समाजही यासंबंधी भावनोत्कट होत असतो. संस्था विद्यार्थ्यांवर खूप दबाव आणतात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत क्षमता भिन्न असतात. प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षेत पास व्हावं ही अपेक्षा वास्तवाला धरून नाही. मुलांचं नियमितपणे समुपदेशन व्हायला हवं. विद्यार्थ्यांममध्ये व पालकांमध्ये जागरूकता निर्माण करायला हवी. त्यांनी या क्रमिक अभ्यासक्रमापलीकडे पाहण्याची मुभा मिळायला हवी,” असे सल्लागार मानसशास्त्रज्ञ वसुप्रधा कार्तिक म्हणाल्या.

रिपोर्टर : दीप्ती बत्तिनी

फोटो: नवीन कुमार

रेखाटन: पुनीत बरनाला

शॉर्टहँड: शादाब नझमी