मुघल बादशहा औरंगजेबाच्या अधुऱ्या प्रेमाची कथा

  • रेहान फजल
  • बीबीसी प्रतिनिधी
फोटो कॅप्शन,

औरंगजेब

भारतीयांच्या मनांत आपली जागा निर्माण करण्यात अपयशी ठरलेल्या मुघल सम्राटांपैकी एक राजा म्हणजे आलमगीर औरंगजेब. औरंगजेबाची प्रतिमा हिंदूद्वेष्टा, धर्मांध आणि कट्टरपंथी राजा अशी आहे.

औरंगजेबानं आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षांसाठी स्वतःचा भाऊ दारा शुकोह याचा खून केला; स्वतःच्या वृद्ध पित्याला अखेरच्या साडेसात वर्षात आग्र्याच्या किल्ल्यात कैदी बनवून ठेवलं.

पाकिस्तानातील नाटककार शाहीद नदीम यांनी भारताच्या फाळणीची बीजं औरंगजेबानं दारा शुकोहचा खून केला त्यावेळीच रोवली गेली, असं म्हटलं आहे.

दिवंगत पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्यांच्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया'मध्ये औरंगजेबाला धर्मांध राजा म्हटलं आहे.

पण, अमेरिकेतील इतिहासकार ऑड्री ट्रस्चके यांचं मत वेगळं आहे. त्यांचं 'औरंगजेब-द मॅन अँड द मिथ' हे पुस्तक नुकतंच बाजारात आलं आहे. त्यात त्यांनी औरंगजेब हिंदूंचा तिरस्कार करत होता, म्हणून त्यानं मंदिरं पाडली हा तर्क चुकीचा आहे, असं म्हटलं आहे.

ट्रस्चके या रूटजर्स विद्यापीठात दक्षिण आशियाचा इतिहास शिकवतात.

औरंगजेबाच्या प्रतिमेला इंग्रज जबाबदार

त्या म्हणतात, "औरंगजेबाच्या प्रतिमेला इंग्रज इतिहासकार जबाबदार आहेत. इंग्रजांनी 'फोडा आणि राज्य करा' हे धोरण स्वीकारलं होतं. या धोरणानुसार हिंदू आणि मुस्लीम यांच्यात वैमनस्य निर्माण व्हावं यासाठी इंग्रज इतिहासकार प्रोत्साहनच देत होते."

"जर औरंगजेबचा कालखंड आणखी 20 वर्षं मागे असता तर आधुनिक इतिहासकारांनी औरंगजेबाचं चित्रण वेगळं केलं गेलं असतं," असंही ऑड्री ट्रस्चके म्हणतात.

49 वर्ष भारतावर राज्य

औरंगजेबानं भारतीय उपखंडातल्या 15 कोटी लोकसंख्येवर 49 वर्षं राज्य केलं. औरंगजेबाच्या काळात मुघल साम्राज्यानं जवळपास संपूर्ण भारतीय उपखंड व्यापला होता.

फोटो कॅप्शन,

औरंगजेब

ट्रस्चके लिहितात, औरंगजेबाचं दफन महाराष्ट्रातील खुल्ताबादमध्ये एका कच्च्या कबरीत झालं. या उलट हुमायूनचं दफन दिल्लीत लाल दगडांच्या भव्य मकबऱ्यात तर शाहजहाँचं दफन आग्र्यात अतिभव्य शुभ्र ताजमहालमध्ये झालं.

ऑडरी ट्रस्चके यांच्या मते, औरंगजेबानं हजारो मंदिरं पाडली हा गैरसमज आहे. या उलट फार कमी मंदिरं औरंगजेबाच्या आदेशानं पाडण्यात आली, असं त्या म्हणतात. औरंगजेबाच्या काळात हिंदूंचा नरसंहार झाला, अशी कोणतीही घटना नोंद झालेली नाही.

या उलट त्याच्या काळात हिंदूंची नेमणूक महत्त्वाच्या पदांवर झाली होती.

साहित्यप्रेमी राजा

औरंगजेबाचा जन्म 3 नोव्हेंबर 1618 रोजी दोहादमध्ये जहांगीराच्या शासन काळात झाला. औरंगजेब शाहजहाँचा तिसरा मुलगा होता.

शहाजहाँची चारही मुलं मुमताज महलपासून झाली होती. औरंगजेबाला इस्लामिक धार्मिक साहित्य तसंच तुर्की साहित्यात रुची होती.

इतर मुघल राजांप्रमाणे औरंगजेबाला उत्तम हिंदी बोलता येत होतं. तसंच त्याने सुलेखनशास्त्रात प्रावीण्य मिळवलं होतं.

फोटो कॅप्शन,

औरंगजेब

शाहजहाँच्या चारही मुलांना कमी वयातच सिंहासन मिळवण्याची ओढ लागली होती. त्याकाळात मध्य आशियातल्या पद्धतीनुसार सर्व भावांचा सत्तेवर समान हक्क असायचा.

मुघल शासकसुद्धा या परंपरेचं पालन करत होते. दारा शुकोह उत्तराधिकारी व्हावा, अशी शाहजहाँनची इच्छा होती. तर औरंगजेबाच्या मते मुघल साम्राज्याचा योग्य वारस तो स्वतः होता.

दाराशी शत्रुत्व

ऑड्री ट्रस्चके यांनी एका घटनेचा उल्लेख केला आहे. दारा शुकोहच्या लग्नानंतर शाहजहाँनने सुधाकर आणि श्यामसुंदर या दोन हत्तींची झुंज लावली होती.

यावेळी सुधाकर हत्ती घोड्यावर स्वार असलेल्या औरंगजेबाच्या दिशेनं धावला. औरंगजेबानं सुधाकरच्या डोक्यात भाला मारला. जखमी सुधाकरनं औरंगजेब स्वार असलेल्या घोड्याला जोरात धडक मारल्यानं औरंगजेब खाली पडला.

यावेळी भाऊ शुजा, राजा जयसिंह आणि अन्य काही औरंगजेबाला वाचवण्यासाठी धावले. याचवेळी दुसरा हत्ती श्यामसुंदरनं सुधाकरचं लक्ष स्वतः कडे वेधलं. या घटनेचा उल्लेख शाहजहाँचे दरबारी कवी अबू तालिब खाँ याच्या कवितेतही आहे.

इतिहासकार अक़िल खाँ रजी यानं 'वकीयत-ए-आलमगीरी'मध्ये या घटनेवेळी दारा शुकोह मागे थांबला, त्यानं औरंगजेबला वाचवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत, असं म्हटलं आहे.

शाहजहाँच्या दरबारातील इतिहासकारांनी या घटनेचा उल्लेख केला असून या घटनेची तुलना 1610 मधील शाहजहाँनं जहाँगीरासमोर एका चवताळलेल्या वाघाला काबूत केल्याच्या घटनेशी केली आहे.

फोटो कॅप्शन,

औरगंजेब

इतिहासकार कॅथरीन ब्राउन यांनी 'डिड औरंगज़ेब बॅन म्युझिक?' मध्ये औरंगजेबाच्या बऱ्हाणपूर भेटीचा उल्लेख आहे. औरंगजेब तिथं त्याच्या मावशीला भेटण्यासाठी गेला होता.

औरंगजेब प्रेमात होता?

त्यावेळी तो बऱ्हाणपूरच्या हिराबाई जैनाबादी हिच्या प्रेमात पडला. हिराबाई एक गायिका आणि नर्तकी होती. हिराबाई झाडावरील आंबे तोडत होती, त्यावेळी औरंगजेबानं तिला पाहिलं आणि तिच्या प्रेमात पडला.

औरंगजेब तिच्या इतक्या प्रेमात होता की कधीही दारू न पिण्याची शपथ मोडण्यासाठी तो तयार झाला होता. औरंगजेब दारूचा घोट घेणारच होता पण त्याला हिराबाईनंच रोखलं. या हिराबाईचं एका वर्षातच निधन झालं आणि ही प्रेम कहाणी संपली. हिराबाईचं दफन औरंगाबादमध्येच झालं.

भारतीय इतिहासात एक मोठा 'किंतु' आहे. तो म्हणजे कट्टरपंथी औरंगजेबाच्या जागी उदार विचारांचा दारा शुकोह मुघल सम्राट बनला असता तर?

ऑड्री ट्रस्च्के यांच्या मते, "दारा शिकोहकडे मुघल साम्राज्य सांभाळण्याची क्षमता नव्हती. वडिलांचे पाठबळ असतानाही दाराला औरंगबेजच्या राजकारणाचा आणि चातुर्याचा सामना करता आला नाही."

फोटो कॅप्शन,

'औरंगजेब-द मॅन अँड द मिथ' च्या लेखिका ऑडरी ट्रस्चके

1658 ला औरंगजेब आणि लहान भाऊ मुराद यानं आग्र्याच्या किल्ल्याला घेरलं होतं. त्यावेळी शाहजहाँ किल्ल्याच्या आतच होता. औरंगजेबानं किल्ल्याचा पाणीपुरवठा तोडला. काही दिवसांतच शाहजहाँनं किल्ल्याचे दरवाजे उघडले आणि स्वतःला औरंगजेबाकडे सोपवलं.

यावेळी साम्राज्याची 5 भागांत विभाजन करण्याचा प्रस्ताव शाहजहाँनं ठेवला. चार भावांना चार हिस्से आणि एक हिस्सा औरंगजेबाचा मोठा मुलगा मोहम्मद सुलतान याला देण्याचा प्रस्ताव होता. तो औरंगजेबानं धुडकावला.

1659 ला औरंगजेबानं दारा शुकोहला पकडून दिल्लीला आणलं. नंतर दारा आणि त्याचा 14 वर्षांचा मुलगा सिफीर शुकोह यांना खरूज झालेल्या हत्तीच्या पाठीवर बांधून दिल्लीच्या रस्त्यावरून फिरवलं.

इटालियन इतिहासकार निकोलाई मानुचीने 'स्टोरिया दो मोगोर' मध्ये लिहिलं आहे की औरंगजेबानं दाराला विचारले होतं, तुझं मत बदललं तर काय करशील? यावर दारानं उपहासपूर्वक उत्तर दिले होतं, की मी तुझ्या शरीराचे चार तुकडे करून दिल्लीच्या चार प्रवेशद्वारांवर लटकवेन.

फोटो कॅप्शन,

दिल्लीतील लाल किल्ला

दाराचं शव हुमायूनच्या मकबऱ्यात दफन करण्यात आलं. पण, याच औरंगजेबनं नंतर स्वतःची मुलगी जब्दातुन्निसाचं लग्न दाराचा मुलगा सिफीरशी करून दिलं.

उत्तरेत परतला नाही औरंगजेब

औरंगजेबानं शाहजहाँला आग्र्याच्या किल्ल्यात कैदेत ठेवलं होतं. यावेळी औरंगजेबाची बहीण जहाँआरा शाहजहाँची साथ देत होती. बापाला कैदेत ठेवण्याचा फार मोठा फटका औरंगजेबाला बसला.

मक्केच्या शरीफांनी औरंगजेबाला भारताचा कायदेशीर शासक मानण्यास नकार दिला. तसंच पुढे अनेक वर्षं औरंगजेबानं पाठवलेल्या भेटी मक्केत नाकारल्या जात होत्या. औरंगजेब 1679 ला दिल्ली सोडून दक्षिणेत आला. तो नंतर उत्तर भारतात परत आला नाही.

शहजादा अकबर सोडून त्याचं सारं कुटूंब या काफिल्यात होतं. औरंगजेबाच्या गैरहजेरीत दिल्लीची रयाच गेली होती.

लाल किल्ल्यातील खोल्या धुळीनं माखल्या होत्या. परिस्थिती अशी होती की विदेशी पाहुण्यांना लाल किल्ला दाखवायचंही टाळलं जात होतं.

फोटो कॅप्शन,

दिल्लीतील हुमायूंनचा मकबरा

औरंगजेबाच्या 'रुकात-ए-आलमगीरी' या ग्रंथांचा अनुवाद जमशीद बिलिमोरिया यानं केला आहे. त्यात मुघल सम्राटांचं आंब्यावर असलेल्या प्रेमाचा उल्लेख आहे. ट्रस्चके यांनी औरंगजेब दक्षिणेत असताना दरबारींना आंबे पाठवण्याचे आदेश दिले असल्याचं म्हटलं आहे.

काही आंब्यांना सुधारस आणि रसनाबिलास अशी हिंदी नावंही होती.

फोटो कॅप्शन,

औरंगजेबचा मकबरा

1700 साली औरंगजेबानं शहजादा आजमला एक पत्र लिहिलं. त्यात औरंगबजेबानं आजमच्या बालपणाची आठवण सांगितली आहे. नगाऱ्याच्या आवाजावरून आजम औरंगबजेला 'बाबाजी धून धून' म्हणत असल्याचा संदर्भ या पत्रात आहे.

अखेरच्या दिवसात औरंगजेबासोबत त्याचा सर्वांत लहान मुलगा कामबख्शची आई उदयपुरी होती. मृत्युशय्येवर औरंगजेबानं कामबख्शला पत्र लिहिलं आहे.

त्यात औरंगजेबानं उदयपुरी मरणानंतरही माझ्यासोबत राहील, असं म्हटलं आहे. औरंगजेबच्या मृत्यूनंतर काही महिन्यानंतर 1707च्या उन्हाळ्यात उदयपुरीचं निधन झालं.

हेही वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)