काश्मीरचं दुःख : चकमकींत घरं उद्ध्वस्त होतात तेव्हा...

  • माजिद जहांगीर
  • BBC News, Washington
काश्मीर.

फोटो स्रोत, Majid Jahangir

फोटो कॅप्शन,

पुलवामा जिल्ह्यातील मोहम्मद सुब्हान यांच्या याच घरात अबू दुजाना लपला होता.

भारतीय सेना आणि कट्टरवादी यांच्यातल्या चकमकी काश्मीरसाठी नव्या नाहीत. अशा चकमकींत काश्मीरमधल्या अनेकांची घरं कायमस्वरुपी उद्धवस्त झाली आहेत.

कट्टरवाद्यांनी आसरा घेतल्याने ही घरं शेवटी गोळ्या आणि ग्रेनेडचे लक्ष्य ठरतात. आयुष्यभराचा ठेवा असलेल्या या घरांची अवस्था चकमकीमुळे 'भिंत खचली, कलथून खांब गेला' अशीच झाली आहे.

एक ऑगस्टचा दिवस मोहम्मद सुब्हान कधीही विसरणार नाहीत. सुब्हान पुलवामा जिल्ह्यातल्या हाकरीपोरा गावात राहतात.

आयुष्यभराची पुंजी एकत्र करून सुब्हान यांनी घर बांधलं होतं. मात्र एक ऑगस्टच्या रात्री सुब्हान यांच्या घराचा ताबा कट्टरवाद्यांनी घेतला.

त्यानंतर भारतीय सैन्य आणि कट्टरवादी यांच्यात झालेल्या चकमकीत सुब्हान यांचं घर उद्ध्वस्त झालं.

फोटो स्रोत, Majid Jahangir

फोटो कॅप्शन,

आयुष्यभराची पुंजी घालून उभारेलं घर एका चकमकीत असं नेस्तनाबूत होतं.

'रात्रीचे साडेदहा वाजलेले. आमची झोपायची वेळ झालेली. तेवढ्यात दोन कट्टरवादी आमच्या घरात घुसले. तुम्ही आत कसे आलात असा प्रश्न माझ्या मुलाने त्यांना विचारला', मोहम्मद सुब्हान सांगत होते.

'कट्टरवाद्यांचा शोध घेण्यासाठी आमच्या घरांवर छापे पडत असल्याचंही आम्ही त्यांना सांगितलं. मात्र भारतीय सैन्य आमच्या मागावर आहे आणि आम्ही इथून जाणार नाही असं त्या घुसखोरानीही निक्षून सांगितलं.'

'त्यांच्यांकडे शस्त्रास्त्रं होती. त्यामुळे आम्हाला त्यांचं ऐकण्यावाचून पर्यायच नव्हता', मोहम्मद सुब्हान सांगतात.

आणि अबू दुजाना मारला गेला

सुब्हानना तो दिवस जसाच्या तसा आठवतो. ते वर्णन करतात, 'त्या दिवशी पुढच्या दोन तासात सैन्याने आमच्या घराला वेढा दिला. तुम्ही इथून निघून जा असा इशारा सैन्याने कट्टरवाद्यांना दिला.

मात्र त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे सकाळ होईपर्यंत कट्टरवाद्यांच्या बरोबरीने आम्हीही घरात बसून राहिलो,' मोहम्मद सुब्हान सांगत होते.

'सकाळी साडेसात वाजता सैन्याने माझ्या मुलाला फोन केला. कट्टरवाद्यांना समर्पण करण्याचा निरोप त्यांनी मुलाकरवी दिला. मात्र त्यांनी हा निरोपही जुमानला नाही.'

'आठ वाजता सैन्याने आमची सुटका केली. आम्ही घराबाहेर पडलो आणि शेजारच्या एका घरात आश्रय घेतला.'

'काही मिनिटांतच गोळ्यांच्या आवाजांनी परिसर निनादला. आमच्या घराच्या सर्व बाजूंनी धमाके होऊन धुरळा उडत होता. बघता बघता माझं घर नेस्तनाबूत झालं.'

'गोळ्या, ग्रेनेडच्या आवाजांत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं घर कोसळलं'

'गोळ्या, ग्रेनेड यांच्या आघातामुळे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे घर कोसळलं. आम्ही सर्वस्व गमावलं'... मोहम्मद सुब्हान यांनी सगळी कहाणी सांगितली.

सुब्हान यांच्या घरात झालेल्या चकमकीत लष्कर ए तय्यबाचा प्रमुख अबू दुजाना आणि त्याचा एक साथीदार मारला गेला.

'अशा परिस्थितीत एखाद्या सामान्य माणसाची जी अवस्था होते, तीच माझी झाली. मी हताशपणे सगळं पाहत होतो.' घराचा आधार गेल्याने सुब्हान यांचं आठजणांचं कुटुंब आता तात्पुरत्या शेडमध्ये राहतं आहे.

'या शेडमध्ये राहणं खरंच अवघड आहे. गावातल्या लोकांनी एकत्र येत ही शेड बांधली आहे.' सुब्हान यांच्याकडे आता घर नव्याने बांधण्यासाठी पैसे नाहीत.

'सरकारकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. ज्या दिवशी चकमक झाली त्याच दिवशी तहसीलदारांनी येऊन पाहणी केली. मात्र पुढे काहीच झालं नाही', असं मोहम्मद सुब्हान सांगतात.

'नाहीतर तंबूतच राहावं लागेल'

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

पुलवामातल्या बामनो गावातले अली मोहम्मद चोपान यांचं एकत्र कुटुंब असलेलं घर चकमकीचं शिकार ठरलं. 3 जुलैला सकाळी हा परिसर बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजांनी हादरला.

तब्बल 30 तास चाललेल्या चकमकीत तीन कट्टरवादी मारले गेले. चोपान आणि घरात राहणारी चार कुटुंबं आता गावापासून दूर त्यांच्या नातेवाईकांकडे राहतात.

चोपान यांनी त्या दुःखद आठवणींना उजाळा दिला. 'सकाळी साडेसातच्या सुमारास बकऱ्यांना चरण्यासाठी मी घेऊन जायला निघालो...'

'घराजवळच्या मशिदीजवळ पोहचलो. तीन कट्टरवादी माझ्या मागोमाग आले. मला काही कळायच्या आत चारही बाजूंना आपलं सैन्य होतं. माझ्या डोळ्यांसमोर एक कट्टरपंथी मारला गेला. उरलेले पळू लागले.'

'दुसऱ्या दिवशी चकमक संपल्यानंतर आम्ही घराकडे गेलो. घर शिल्लकच राहिलं नाही. आमच्या अंगावरचे कपडे एवढंच फक्त हाती राहिलं,' अली मोहम्मद चोपान सांगतात.

सरकारने काही मदत केली तर आमचं घर उभं राहू शकतं. नाहीतर आम्हाला तंबूतच राहावं लागेल. वडिलांनी पंधरा लाख रुपये खर्चून कष्टाने घर बांधलं होतं. आता एवढं रक्कम जमवणं कठीण आहे, असंही मोहम्मद चोपान म्हणतात.

'कट्टरपंथीयांना घरात घेतलं नाही तर त्यांच्याकडून मारलं जाण्याचा धोका आहे. त्यांना घरात घेतलं तरी धोका आहे. सरकारच्या वतीने काही अधिकारी आणि पोलीस उद्धवस्त घराची पाहणी करून गेले. मात्र कुठल्याही स्वरुपाची मदत मिळालेली नाही', अस दुःख ते बोलून दाखवतात.

'बशीर लष्करी माझ्या घरात मारला गेला'

चोपान यांच्या घराप्रमाणेच अवस्था आहे अनंतनाग जिल्ह्यातल्या ब्रिंटी गावातील बशीर अहमद गनाई यांची. एक जुलैला कट्टरपंथी आणि सैन्य यांच्यातील चकमकीत त्यांचं घर नाहीसं झालं.

बशीर अहमद यांच्या घरात सोळा माणसं आहेत. ही सगळी माणसं आता एका तात्पुरत्या शेडमध्ये राहत आहेत. त्यांच्या घरात झालेल्या चकमकीत लष्कर ए तय्यबाचा प्रमुख बशीर लष्करी मारला गेला.

पाच वर्षांपूर्वी जमीन विकून घर बांधलं होतं. आताही थोडी जमीन विकून घराचं काही काम सुरू होतं. गावातल्या लोकांनी दोन-तीन लाखांची मदत केली होती. मात्र आता काहीच शक्य नाही. माझ्याकडे पैसा नाही. सरकारकडून कोणतीही मदत नाही, बाकी कुठल्या संघटनेकडूनही मदत नाही.

फोटो स्रोत, Majid Jahangir

फोटो कॅप्शन,

चकमकीत घर गमावलेल्या काश्मिरींना तात्पुरत्या शेडमध्ये आसरा घ्यावा लागतो.

चकमक झालेल्या ठिकाणासंदर्भात कठोर धोरण असल्याने बहुतांशीजणांना आपल्या घरातल्या शिल्लक राहिलेल्या वस्तू गोळा करू शकत नाहीत.

पुलवामा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गुलाम नबी डार यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली.

'ना हरकत प्रमाणपत्र' मिळवणंही अवघड

कट्टरपंथीयांच्या हल्ल्यात गावकरी मारला गेल्यास किंवा त्याच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास सरकारतर्फे त्याला किंवा कुटुंबियांना नुकसान भरपाई दिली जाते.

मात्र कट्टरपंथीयांशी गावकऱ्यांचे साटंलोटं असल्याचं स्पष्ट झाल्यास कोणत्याही स्वरुपाची मदत सरकारकडून दिली जात नाही'.

नुकसान झालेल्या प्रत्येक व्यक्तीला पोलिसांकडून 'ना हरकत प्रमाणपत्र' मिळवणे अनिवार्य आहे. पोलीस किती वेळात हे प्रमाणपत्र देतात त्यानुसार खटला पुढे सरकतो. कट्टरपंथीयांशी संलग्न घटनांमध्ये तांत्रिक गोष्टींचा समावेश असल्याने प्रमाणपत्र तयार व्हायला बराचवेळ लागतो.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)