आणखी कुणाचा जीव जाऊ नये म्हणून या ‘ट्रॅफिक हिरोईन’ची ही धडपड

गाझियाबाद Image copyright ANKIT SRINIVAS
प्रतिमा मथळा गाझियाबाद मधील 'त्या' सिग्नलवर डोरीस वाहतूकीचे स्वयं प्रेरणेनं नियंत्रण करतात.

दिल्लीजवळच्या गाझियाबादमध्ये एक महिला रस्त्यावर वाहतूक नियंत्रित करतांना दिसतात. त्या पोलीस कर्मचारी नाहीत तर गाझियाबादच्या 'ट्राफिक हिरोईन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोरीस फ्रान्सिस आहेत.

पण त्या असं का करतात?

2009 मध्ये याच ठिकाणी त्यांची मुलगी निक्की चा अपघात झाला होता. त्यात ती दगावली.

मनावर त्याचं कुठलंही दडपण न येऊ देता फ्रान्सिस तिथंच वाहतुकीचं नियोजन करतात. या ठिकाणी यापुढे कुठलाही अपघात होऊ नये आणि कुणाचा जीव जाऊ नये, म्हणून त्यांची ही फरपट.

"तिच्या बाबतीत काय घडलं आहे, हे मला माहित आहे. तिच्याएवढं धैर्य मी इतर कुणातही पाहिलं नाही. ज्या जागेवर तिनं आपली मुलगी गमावली, तिथं ती रोज नव्या आत्माविश्वासानं कशी काय येते? कुणास ठाऊक...", असं पोलीस हवालदार कुमारपाल सिंग यांनी बीबीसीला सांगितलं.

'ती गेली अन् मी वाचले'

त्या प्रवास करत असलेल्या रिक्षेला एका भरधाव कारनं धडक दिल्याचा प्रसंग फ्रान्सिस यांना आजही लख्ख आठवतो.

Image copyright ANKIT SRINVAS
प्रतिमा मथळा बेदरकार वाहन चालकांना डोरीस वेळप्रसंगी दंडुक्याचा धाक दाखवतात.

"अपघातात निक्की गेली मात्र मी वाचले, त्या दिवशी वाहतुकीचं नियोजन योग्य झालं असतं तर हा अपघातच नसता झाला," अशा भावना बीबीसीकडे व्यक्त करताना फ्रान्सिस यांना अश्रू अनावर झाले होते.

गाड्यांची सतत वर्दळ असलेल्या या ठिकाणी अनेकदा चालक बेदरकारपणे गाडी चालवत होते.

पण हल्ली फ्रान्सिस वाहतूकीचं नियोजन करत असल्यानं चालक वाहनं सावकाश चालवतात. मुजोर वाहन चालकांना त्या कधी-कधी दंडुक्याचा धाकही दाखवतात.

Image copyright ANKIT SRINVAS
प्रतिमा मथळा मुलगी निक्की हिच्या फोटोसोबत डोरीस.

"गेल्या सहा वर्षांपासून मी वाहतुकीचं नियोजन करत आहे. लोकांचे प्राण वाचवणं हेच माझं ध्येय आहे. कोणत्याच आईपासून तिचं मूल आणि पती अपघातानं हिरावू नये, अशी मी प्रार्थना करते. म्हणून जोवर शक्य आहे तोवर मी हे काम करत राहीन," असं फ्रान्सिस म्हणतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)