कलावती देवी : उत्तराखंडच्या खेड्यात वीज आणणारी बाई

  • सलमान रावी
  • बीबीसी प्रतिनिधी
उत्तराखंड, भारत
फोटो कॅप्शन,

कलावती देवी कधीही शाळेची पायरी चढलेल्या नाहीत.

ही गोष्ट ऐंशीच्या दशकातली आहे, जेव्हा कलावती देवींचं लग्न होऊन त्या नुकत्याच उत्तराखंडमधील बाछेर या छोट्याशा खेड्यात आल्या होत्या.

त्यांच्या गावात त्यावेळी फक्त अंधाराचं साम्राज्य असायचं; कारण तोपर्यंत गावात वीज आलेली नव्हती. त्यांनी गावात वीज तर आणलीच, पण जंगल संरक्षणाचंही काम त्या करत आहेत.

कलावती देवींच्या कामाची सुरुवात झाली एका अनोख्या आंदोलनानं. गावात वीज यावी यासाठी गावातल्या सगळ्या स्त्रियांना घेऊन गोपेश्वर जिल्हा मुख्यालयात गेल्या.

तिथल्या अधिकाऱ्यासमोर या स्त्रियांनी आपल्या गावात वीज उपलब्ध करून द्यावी अशी रितसर विनंती केली.

अधिकाऱ्यांनी मात्र त्यांच्या या विनंतीला धुडकावून लावलं. निराश होऊन घराकडे परतताना या स्त्रियांना रस्त्यातच काही वीजेचे खांब आणि तारा दिसल्या.

ही सामग्री सरकारी कार्यक्रमांना वीज पुरवण्यासाठी वापरण्यात येणार होती.

पहिला विजय

त्या तारा पाहूनच कलावती देवींना आंदोलनाची कल्पना सुचली. त्यांच्यासोबत आलेल्या महिलांना त्यांनी हे खांब आणि तारा आपल्या गावी न्यायला उद्युक्त केलं.

त्या सगळ्या स्त्रियांनी मिळून ते जड खांब ५०० मीटर उंचीवर असण्याऱ्या आपल्या गावी वाहून नेले. या घटनेनं अर्थातच सरकारी अधिकारी खवळले.

त्यांनी या महिलांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. असं असेल तर आम्हालाही अटक करा, असं म्हणत गावातल्या इतर महिलाही कलावती देवींच्या समर्थनार्थ पुढे आल्या.

गावातल्या स्त्रियांच्या या पवित्र्याने अधिकारी वरमले आणि त्यांनी गावाला वीज उपलब्ध करून दिली. हा कलावती देवींचा पहिला विजय होता.

फोटो कॅप्शन,

कलावती देवींच्या अथक प्रयत्नांनी त्यांच्या गावात वीज आली.

मात्र एवढ्यावरचं कलावती देवी थांबल्या नाहीत. गेल्या तीन दशकांपासून त्यांनी लाकूड माफियांच्या विरोधात आणि दारूबंदीसाठी लढा उभारला आहे.

"या दोन गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत...'' कलावती देवी सांगतात. 'बीबीसी'शी बोलताना त्यांनी हा संबंध समजावून सांगितला.

चिपको आंदोलनातून प्रेरणा

'' आमच्या आणि आसपासच्या बऱ्याच गावातले पुरूष दारूडे होते. याच कारणामुळे लाकूड माफिया त्यांचं शोषण करत होते'', कलावती देवी सांगतात त्यानंतर आम्ही त्याविषयी काही करण्याचा निर्णय घेतला.

''एके दिवशी मी गावातल्या इतर बायकांसोबत चारा गोळा करायला जंगलात गेले आणि मला खूप साऱ्या झाडांवर खडूने काहीतरी खूण केलेली दिसली.''

ही सारी झाडं नंतर तोडली जाणार होती, असं त्यांना समजलं. ''तेव्हाच मला वाटलं की, आता आपण काहीतरी करायलाचं हवं. ही झाडं आणि हे 'तंत्री' जंगल आमच्या उपजीविकेचं साधन होतं", त्या सांगतात.

फोटो कॅप्शन,

गावातल्या स्त्रियांचे गट नियमितपणे जंगलात गस्त घालतात.

कलावती देवींनी गावातल्या बायकांना पुन्हा एकत्र केलं आणि १९७० च्या चिपको आंदोलनातून प्रेरणा घेत आपल्या उपजीविकेचं साधन अर्थात झाडं वाचवायचं आवाहन केलं.

झाडं कापली जाऊ नयेत म्हणून त्या खुणा केलेल्या झाडांना स्त्रियांनी घट्ट मिठी मारली.

"लाकूड तस्करांनी सुरुवातीला आम्हाला लाच द्यायचा प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले. मग त्यांनी आम्हाला धमक्या द्यायला सुरुवात केली.''

''आम्हीसुद्धा जिल्हा मुख्यालयात तक्रार केली, अधिकाऱ्यांसमोर धरणं धरलं आणि अधिकाऱ्यांना झाडं न कापण्याचा हुकूम द्यायला लावला," कलावतीदेवी सांगतात.

फोटो कॅप्शन,

गावातल्या स्त्रियांचे गट नियमितपणे जंगलात गस्त घालतात.

या घटनेनंतर लवकरच कलावती देवींनी गावातल्या महिलांना घेऊन त्यांचे लहान लहान गट बनवले आणि त्या गटांना महिला मंगल दल असं नाव दिलं.

या गटातल्या महिला लाकूड तस्करांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जंगलात गस्त घालायच्या.

या गटांनी काही अनधिकृत हातभट्ट्यादेखील उद्ध्वस्त केल्या. एवढंच नाही तर जंगलाच्या संरक्षणासाठी या महिलांनी पंचायतीच्या निवडणुकाही लढण्याचं ठरवलं.

"हे अर्थातच सोप नव्हतंच. आम्हा बायकांना समाजातून तसंच प्रशासकीय पातळीवरून खूप विरोध झाला. बायकांनी फक्त घरात बसावं आणि घरकाम करावं एवढंच लोकांना अपेक्षित असतं.'' त्या सांगतात.

कलावती देवींना सुरुवातीला घरूनही विरोधच झाला होता. ''माझ्या पतीकडूनसुद्धा खूप विरोध झाला. एकदा त्याने मला विचारलं की, मी हे सगळं का करतेय. मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, मी हे आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी करतेय.''

कलावती देवींच्या समजावण्याचा उपयोग झाला नाही. ''काय करणार.... शेवटी आम्ही वेगळे झालो'', कलावती देवींनी सांगितलं.

फोटो कॅप्शन,

खेड्यातल्या कित्येक पुरुषांनाही कलावती देवींबद्दल आदर वाटतो. विनोद कापरवान त्यापैकीच एक.

एका बाजूला कलावती देवींचे जंगल वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते आणि तेव्हाच महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने महिलांना पंचायतींमधे आरक्षण देण्याचा कायदा केला.

कलावती देवींना त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी १९८६ मधे इंदिरा प्रियदर्शिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

आजवर त्यांना बरेच पुरस्कार मिळाले आहेत. पण त्यांच्या गावकऱ्यांकडून मिळणारा मान-सन्मान हा कलावती देवींसाठी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे.

पुरुषांनाही आदर वाटतो

"आता आम्ही जे निर्णय घेतो ते सगळ्यांना मान्य असतात," ग्रामपंचायत सदस्य राधा देवी सांगतात. "आम्ही गावात दारूबंदी करण्यात यशस्वी झालो आहोत आणि बऱ्याच कुटुंबांना दारूच्या दुष्टचक्रातून सोडवलं आहे. ''

''आता कोणीही झाडं तोडत नाही आणि जंगलात राहणाऱ्या लोकांचा जंगलातून मिळणाऱ्या मसाले, फळं आणि कंदमुळं अशा सगळ्या गोष्टींवर हक्क आहे", कलावती देवींबाबत या शब्दात आदर व्यक्त केला जातो.

फोटो कॅप्शन,

कलावती देवींना त्यांच्या महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांसाठी १९८६ मधे इंदिरा प्रियदर्शिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

कधीही शाळेत न गेलेल्या कलावती देवी आज त्यांच्या खेड्यामधल्या कित्येक स्त्रियांच्या आदर्श ठरल्या आहेत. त्यांच्या खेड्यातल्या कित्येक पुरुषांनाही त्यांच्याबद्दल आदर आहे.

"जंगलातल्या उत्पादनांचा आम्हाला फायदाच होतो आहे. गावातल्या बऱ्याच जणांची उपजीविका त्यावर अवलंबून आहे," असं कलावतींचे गाववाले गौतम पनवार सांगतात.

याच गावात राहणारे विनोद कापरवान म्हणतात, "कलावती देवी नसत्या तर नाहीशी झालेली जंगलं आणि दारूच्या आहारी गेलेले पुरूष याशिवाय आमच्या खेड्यात काहीचं उरलं नसतं," विनोद कापरवान सांगतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्ट्रागाम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)