मध्य रेल्वेसाठी वाशी खाडी बनते आहे डम्पिंग ग्राउंड

  • रोहन टिल्लू
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
RAILWAY, WASTE

फोटो स्रोत, BBC/Rohan Tillu

फोटो कॅप्शन,

मध्य रेल्वेमार्गावर दर दिवशी पडणारा भरमसाठ कचरा उचलण्यासाठी रेल्वेची खास कचरा गाडी असते.

मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबली की, महापालिका रेल्वेकडे बोट दाखवते आणि रेल्वे महापालिकेकडे. प्रश्न साफसफाईचा पण आहे आणि डम्पिंग ग्राउंडचासुद्धा.

समुद्र आणि जमीन यांच्यातली बफर जागा म्हणून काम करणाऱ्या खाडीत दर आठवड्याला हजारो टन कचरा टाकला जात आहे.

हा कचरा राजरोसपणे खारफुटींवर पडत असून, तो टाकण्याचं काम मध्य रेल्वेच करत आहे.

मध्य रेल्वेमार्गावर पडणारा कचरा प्लॅस्टिकच्या गोणींमध्ये भरून दर आठवड्याला वाशीच्या खाडीकिनारी असलेल्या खारफुटींवर टाकला जात आहे.

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, खाडीच्या पाण्यानं रुळांभोवतीची जमीन खचू नये, यासाठीचा हा उपाय आहे.

नेमकी समस्या काय?

मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील ४३ लाख प्रवाशांकडून दर दिवशी रुळांवर भरमसाठ कचरा टाकला जातो.

या कचऱ्यात भाज्यांची टरफलं, फुलं, फळं या बायो-डिग्रेडेबल कचऱ्याबरोबरच प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या, चपला, काचेचे तुकडे अशा अनेक विघटन होऊ न शकणाऱ्या गोष्टींचाही समावेश असतो.

हा कचरा तसंच रुळांखाली असलेल्या खडीची झीज होऊन तयार होणारा चिखल या गोष्टी रेल्वेच्या वाहतुकीसाठी धोकादायक आहेत.

या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं आव्हान रेल्वेसमोर असतं. त्यासाठी रेल्वेकडे स्वत:चं डम्पिंग ग्राउंड नाही. तसंच पालिका रेल्वेच्या हद्दीतला कचरा उचलायला नकार देते, असं रेल्वेचे अधिकारी सांगतात.

फोटो स्रोत, BBC/Rohan Tillu

फोटो कॅप्शन,

दररोज हजारो टन कचरा रेल्वेतून नेला जातो.

हा कचरा उचलण्यासाठी मध्य रेल्वेनं कंत्राटदार नेमले असून या कंत्राटदाराची माणसं दिवसा हा कचरा गोळा करतात.

रुळांवरच्या कचऱ्याचं काय होतं?

मध्य रेल्वेकडून त्यासाठी ठरावीक सेक्शनमध्ये वेगमर्यादा लावली जाते. कंत्राटदाराची माणसं हा कचरा प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये गोळा करून तो रुळांच्या बाजूला ठेवतात.

हा कचरा उचलण्यासाठी रेल्वेची विशेष कचरा गाडी दर रात्री उपनगरीय वाहतूक थांबल्यावर रेल्वेमार्गावर फिरते. कंत्राटदाराची माणसं या गाडीबरोबर कचरा उचलण्याच्या ठिकाणी जातात. दर दिवशी तब्बल दीड ते अडीच हजार गोणी कचरा ही गाडी उचलते.

आठवडाभर हा कचरा गोळा करून आठवड्यातील एका रात्री ही गाडी तब्बल एक ते दीड टन कचऱ्यासह मानखुर्द-वाशी यांदरम्यान वाशीच्या खाडीजवळ थांबते. गाडीतले मजूर या गोणी एक एक करून रेल्वेमार्गाच्या बाजूला फेकतात.

रेल्वेकडे जमा होणारा कचरा

  • दर दिवशी गोळा होणारा कचरा - १५०० ते २००० गोणी
  • आठवड्याभरात जमा होणारा कचरा - १२ ते १५ हजार गोणी
  • दर आठवड्याला खाडीत पडणारा कचरा - १ ते १.५ टन
  • मध्य रेल्वेकडे असलेल्या कचरागाड्या - ०६

पर्यावरणावर काय परिणाम?

वाशी खाडीच्या आसपास खारफुटीचं जंगल आहे. या जंगलामुळे आणि दलदलीमुळे समुद्राचं पाणी थेट जमिनीपर्यंत येणं टळतं. त्यामुळे किनाऱ्यावरील जमीन सुरक्षित राहते.

दर आठवड्याला एक ते दीड टन कचरा या दलदलीवर पडत असल्याने पर्यावरणातील हा महत्त्वाचा घटक कमी होत चालला आहे.

समुद्राचं पाणी आत शिरल्यावर रेल्वेकडून टाकला जाणारा कचरा या खाडीच्या भागात अडकून पडणार आहे. त्यामुळे या परिसरातील खाडीच्या पर्यावरणाला धोका आहे.

या गोणी आम्ही भराव म्हणून टाकतो!

रेल्वेचं मात्र याबाबत वेगळंच म्हणणं आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन सांगतात, "या कचऱ्यात प्लॅस्टिक किंवा विघटन होणार नाहीत, असे घटक नसतात."

"रुळांखाली जमलेला चिखल, झिजलेली खडी अशाच गोष्टी रुळांवरून गोळा केल्या जातात. पर्यावरणाला धोका निर्माण करणारा हा कचरा नसतो", असंही जैन म्हणाले.

फोटो स्रोत, BBC/Rohan Tillu

फोटो कॅप्शन,

हा कचरा आठवड्यातील एका रात्री वाशी खाडीजवळच्या खारफुटींवर टाकला जातो. त्यासाठी कंत्राटदार नेमण्यात आले आहेत.

"तसंच हा कचरा ज्या गोणींमध्ये भरला जातो त्या गोणी प्लॅस्टिकच्या असल्या, तरी त्यांचं विघटन होणं सहज शक्य आहे. रुळांबाजूच्या जमिनीची धूप होऊन रुळ खचू नयेत, म्हणून या गोणी आम्ही भराव म्हणून टाकतो", असं एस. के. जैन म्हणाले.

ही तर बचावात्मक भूमिका

पर्यावरण तज्ज्ञांना मध्य रेल्वेचं हे म्हणणं मान्य नाही. पर्यावरण तज्ज्ञ रिषी अग्रवाल यांनी बीबीसी मराठीशी बोलताना काही नियम आणि शक्यता सांगितल्या.

"२०१६ मधल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या निर्देशांनुसार खाडीत कोणत्याही प्रकारचा कचरा, कुणीही टाकणं निषिद्ध आहे. रेल्वे, पालिका आदींनी आपापल्या कचऱ्याची विल्हेवाट लावायला हवी", अग्रवाल म्हणाले.

"रुळांमधून गोळा झालेला कचरा रेल्वेनं आपल्या स्टेशनांबाहेर आणून ठेवला, तर पालिका तो नक्कीच गोळा करून नेऊ शकते. पण त्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे. खाडीत किंवा दलदलीत कचरा टाकल्याने पर्यावरणाची न भरून येणारी हानी होत आहे", असं ते म्हणाले.

आधी पत्र, मग कारवाई!

"रेल्वेकडील कचरा वाशीच्या खाडीजवळील खारफुटींवर टाकला जात असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. याबाबत रेल्वेला पत्र पाठवणार आहोत," असं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या मुंबई विभागाचे विभागीय अधिकारी लाड यांनी सांगितलं.

याबाबत मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही काहीच उत्तर मिळाले नाही.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)