म्यानमार : रोहिंग्यांपाठोपाठ हिंदूंचं स्थलांतर का?

Image copyright Getty Images

म्यानमारच्या राखीन प्रांतात सतत होत असलेल्या हिंसेमुळे हजारो लोक घर सोडून पळ काढतायेत. अल्पसंख्याक रोहिंग्या मुस्लीमांपाठोपाठ आता हिंदू कुटुंबांना सुद्धा बांग्लादेश सीमेकडे स्थलांतर करण्यास भाग पडतलं जात आहे.

बौद्ध बहुल म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांवर अनेक प्रकारचे निर्बंध घालण्यात आले आहेत. रोहिंग्या आणि बौद्धांमध्ये अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे.

तब्बल दहा हजारांवर रोहिंग्या मुस्लीम बांग्लादेशात स्थलांतरीत झाले आहेत.म्यानमार सरकार वांशिक हिंसा घडवत असल्याचा आरोप रोहिंग्या मुस्लीम करत आहेत.

याच हिंसेला बळी पडून 400 पेक्षा जास्त हिंदुंनी घरं सोडली आहेत. यामध्ये महिला आणि बालकांची संख्या सर्वात जास्त आहे. काही हिंदुंची हत्या करण्यात आली तर काहींच्या घरांना आग लावण्यात आली.

Image copyright Getty Images

हिंदू शरणार्थींसाठी शिबिरं

कॉक्स बाजार भागातील हिंदू- बुद्धिस्ट-ख्रिश्चन युनिटी काउंसिलचे नेते स्वपन शर्मा म्हणतात, "उखीयामधील कुटुप्लोंग शरणार्थी शिबिरातून निघून 412 हिंदुनी मंदिरात आणि जवळच्या परिसरात आश्रय घेतला आहे.

कॉक्स बाजारच्या जिल्हा प्रशासनानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Image copyright EPA

लष्कराकडून अत्याचार

रमा कर्मकार आपल्या दोन मुलांना घेऊन राखाईन प्रातांतील रिक्ता गावात राहायला आली होती. म्यानमारच्या लष्करानं तिच्या पती सहित अनेकांची हत्या केली.

लष्करानं त्यांची घरं जाळून महिला आणि मुलांवर अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे असहाय्य हिंदू कुटुंबांना बांगलादेशकडे पळ काढावा लागत आहे.

रिक्ता व्यतिरिक्त चिआंगछारी आणि फकीराबाजार या गावातील हिंदू देखील घरं सोडून बांग्लादेशमध्ये पळत आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)