हे आहे 10 सेकंदात कॅंसरची गाठ शोधणारं मास-स्पेक पेन

cancer, medicine, science

दहा सेकंदात कॅंसरच्या पेशी शोधून काढेल असं एक पेन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलाय.

मासस्पेक या पेनामुळे शस्त्रक्रियेदरम्यान कॅंसरची नेमकी गाठ लवकर आणि सुरक्षितपणे काढता येईल, तसंच शस्त्रक्रियेनंतर कॅंसर मुळापासून काढता येईल.

'सायंस ट्रांस्लेशनल मेडिसीन' या मासिकानुसार पेशींच्या विशिष्ट पचनाच्या गुणधर्मावर काम करणारं हे उपकरण 96% अचूक आहे.

कॅंसरच्या उती अवाढव्य वाढत राहिल्या तर त्यांचे आंतरिक गुणधर्म इतर सामान्य उतींपेक्षा खूपच वेगळे होतात. पण, अजूनही सामान्य उती आणि कॅंसरच्या उती यातील फरक करणं डॉक्टरांसमोर एक मोठे आव्हानच आहे. काही केसेसमध्ये हे अगदी सोपं आहे, पण काहींमध्ये सामान्य उती आणि बाधीत उतींमधील फरक ओळखणं अवघड आहे.

दरम्यान, या पेनामूळे कॅंसर मुळापासून काढता येऊ शकतो.

अगदी थोड्या उती काढल्या तर कॅंसरच्या गाठी परत वाढण्याची भीती असते आणि जास्त उती काढून घेतल्या तर धोका निर्माण होऊ शकतो, विशेषत: मेंदुमध्ये.

"या तंत्रज्ञानामूळे अशी वैदकीय गरज भरून काढण्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तसेच वापरावयास सोपा असलेला हा पेन लवकरच डॉक्टरांकडे उपलब्ध होणार आहे," असं युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या सहायक प्राध्यापक डॉ. लिवीया एबरलीन यांनी सांगीतलं.

चाचण्या

या तंत्रज्ञानाने आतावर तब्बल 253 नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. पुढच्या वर्षी हा पेन डॉक्टरांना उपचारासाठी उपलब्ध होणार आहे.

सध्या हा पेन 1.5 एमएम आकाराच्या उतींवर निरीक्षण करतो पण संशोधकांनी यापेक्षाही छोट्या, म्हणजे 0.6 एमएम आकाराच्या उतींवरही विश्लेषण करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

हा पेन तर स्वस्त आहे, पण यासोबत लागणारं मास स्पेक्ट्रोमीटर हे उपकरण महाग आणी खूपच मोठं आहे. "त्यामूळे मास स्पेक्ट्रोमीटरच कँसरच्या सर्जरी स्वस्त करण्यात मूख्य अडथळा आहे. ते स्पेक्ट्रोमीटर किफायतशीर आणि थोडंसं लहान, चाकं लावून ने-आण करू शकतो असं बनवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत," असं डॉ. एबरलीन म्हणतात.

बेलर कॉलेज ऑफ मेडिसीनमधील एंडोक्राइन सर्जरी विभागाचे प्रमूख डॉ. जेम्स सुलीबर्क संशोधक म्हणतात, "पेशंटला कोणत्याही क्षणी, ताबडतोब आणि सुरक्षित कसं करता येईल यावर आमचा भर आहे. आणि या तंत्रज्ञानामुळे वरील तीनही गोष्टी शक्य होणार आहे."

मॅकस्पेक पेन सर्जरी अचूक करण्याचा अगदी अलिकडचा प्रयत्न आहे.

इंपिरीयल कॉलेज ऑफ लंडनच्या टीमने एक चाकु विकसीत केला आहे जो नेमक्या कॅंसरच्या उतींचा वास घेऊन त्या काढण्यासाठी मदत करतो. तसेच, हार्वर्ड युनीव्हर्सिटीची टीम लेझरचा वापर करून मेंदुतील कॅंसरबाधीत पेशी कितीप्रमाणात काढायच्या याचा अंदाज घेते.

कॅंसर रिसर्च युकेच्या डॉ. ऑन्या मॅकार्थी यांच्या मते, "अशा संशोधनामूळे डॉक्टरांना कॅंसरच्या गाठीची खात्री ताबडतोब करण्यास मदत होईल, तसंच त्याच्या गुणधर्मांचा अभ्यास करता येईल. अशी महत्त्वाची माहीती गोळा झाली तर डॉक्टर पेशंटवर सर्वोत्तम उपचार करू शकतील."