आळशी आहात? मग या सात वस्तू तुमच्यासाठीच बनल्या आहेत

आळशी लोकांसाठी आदर्श जीवन - लोळा आणि सिनेमा पाहा. Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा आळशी लोकांसाठी आदर्श जीवन - लोळा आणि सिनेमा पाहा.

जगात सर्वांत आरामाचं काम म्हणजे दिवसभर निवांत बसून, पॉपकॉर्न खात एखादा सिनेमा बघणं. पण जर या आरामाऐवजी त्यासाठी घाम गाळावा लागला तर?

आयरलॅंडमध्ये इंजिनीयरिंगचा एक विद्यार्थी आहे रोनन ब्रेन. त्यानं एक असं उपकरण तयार केलं आहे, ज्यावर खरंच मनोरंजनासाठी कसरत करावी लागते.

या उपकरणात एक सायकल आहे जी एका स्क्रीन आणि सिस्टमशी कनेक्टेड आहे. आणि यावर सिनेमा किंवा टीव्ही सिरियल चालू ठेवण्यासाठी तुम्हाला एका ठराविक गतीनं सायकलिंग करावी लागते. आणि गती कमी झाली की व्हीडिओ थांबतो.

Image copyright Roboro/You Tube

आहे ना मजेदारण! काही लोकांनी हे पटलं आहे, पण काहींच्या मते सिनेमा बघायला इतके कष्ट कशाला?

हे उपकरण सर्वांना आवडणारं नसलं तरी खाली या काही भन्नाट वस्तू आहेत, ज्या आरामाचं जीवन शोधणाऱ्यांसाठी खास तयार करण्यात आल्या आहेत.

1. पायांसाठी झोपाळा

आपण पिकनिकला जातो तेव्हा कसा दोन झाडांना एक झोपाळा बांधतो. अगदी तसाच लहान झोपाळा, किंवा हॅमॉक, आपण ऑफिसच्या टेबललाही बांधू शकतो.

पण काम काय? मस्त पाय त्यावर ठेऊन आरामात काम करायचं ना...!

आम्हाला माहिती आहे आठ ते दहा तास काम करणं फारच थकवणारं असतं. कदाचित याने थोडा आराम मिळेल.

2. स्वत:हून ढवळणारा ग्लास

ज्यांना आपल्या मनगटांना अजिबात त्रास द्यायचा नसेल, त्यांच्यासाठी आहे हा स्वत:हून ढवळणारा ग्लास.

चहा टाका, साखर टाका, आणि बसा आरामात. हा जादुई ग्लास बाकीचं काम करतो.

3. डुलकी मारण्यासाठीची उशी

कामाच्यामध्ये किंवा अभ्यास करतांना जर तुम्हाला डुलकी मारायची असेल तर ही उशी नक्कीच कामाची आहे.

Image copyright Hoodie Pillow Brands

सहजपणे डोक्यावरून ओढायची आणि डोळे मिटायचे. पटकन झोप लागेल.

4. झोपण्यासाठीची चादर

आणि जर एका डुलकीने काम होत नसेल तर या चादरीवर तुम्ही झोपू शकता.... अगदी कुठंही.

तुमच्या आसपास काय चाललं आहे, काही कळणारही नाही.

5. हेयर ड्रायर स्टॅंड

लांब केस वाळवायचं म्हटलं की सर्वांत जास्त ताण पडतो तो हातांवर? अहो ते हेयरड्रायर नाही का धरावं लागत, त्यानं!

पुरुषांना कदाचित असा त्रास दाढी करताना होत असावा.

Image copyright Youtube

म्हणूनच तर आहे हे आधुनिक स्टँड, जे हेअर ड्रायर चहूबाजूंनी फिरवतं. म्हणजे तुमचं सर्व लक्ष केस नीट करण्यात असतं, आणि तुमचे हातही दुखणार नाहीत.

6. घालायची खुर्ची

उभं राहून राहून कंटाळा आला असेल, तर बसा ना... अगदी जिथं उभे आहात, तिथंच!

सादर आहे ही घालता येईल अशी खुर्ची.

Image copyright Noonee/YouTube

आहे ना मस्त? म्हणूनच या खुर्चीचा वापर पश्चिमेत खूप वाढला आहे, इतका की, काही ऑफिसांमध्ये तर कर्मचाऱ्यांचं दांड्या मारणंही कमी झालं आहे.

7. बाळाचा झाडू मारणारा झगा

घरात बाळ म्हटलं की धमाल असते. पण त्याचाही सतत काही न काही कारभार सुरूच असतो आणि त्यातून पसारा होतो.

पण जर या समस्येतच समाधान दडलं असेल तर...?

Image copyright Betterthanpants.com

बघा हा ड्रेस. गंमत म्हणून तयार करण्यात आलेला हा ड्रेस आता खूप प्रचलित झाला आहे.

तुम्ही आपल्या बाळाला हा ड्रेस घाला, मग तर झाडू मारायची गरजंच नाही. जो कचरा करणार, तोच साफही करणार.... नाही का!

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)