का गोळा केले जात आहेत भारतात वापरलेले सॅनिटरी पॅड्स?

सॅनिटरी पॅड्स

फोटो स्रोत, DR ATUL BUDUKH/TMC HOSPITAL

फोटो कॅप्शन,

या अभ्यासासाठी ग्रामीण भागातील महिलांनी मासिक पाळीच्या काळात वापरलेले सॅनिटरी पॅड्स गोळा करण्यात आले.

मासिक पाळीविषयी बोलणं आजही आपल्या देशात निषिद्ध मानलं जातं. तेव्हा महिलांनी मासिक पाळीत वापरलेले सॅनिटरी पॅड्स गोळा करणं ही तर एक अकल्पनीय बाबच.

भारताच्या काही राज्यांमध्ये आरोग्यसेविका गावागावात जाऊन महिलांनी पाळीत वापरलेले सॅनिटरी पॅड्स गोळा करत आहेत. यामागचा त्यांचा उद्देश जितका अनोखा आहे तितकाच महत्त्वपूर्णही. सर्व्हायकल कॅन्सरचं निदान प्रत्यक्षात आणण्याकरिता त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

सर्व्हायकल कॅन्सरचे जगातील एक चतुर्थांश रूग्ण एकट्या भारतात आढळतात. तरी देशातील कित्येक महिला सर्व्हायकल कॅन्सरसाठीची चाचणी करत नाहीत. कारण ग्रामीण भागात सोयीसुविधा अपुऱ्या आहेत, शिवाय उपचारासाठी प्रचंड खर्च येतो.

"एकतर ग्रामीण भागातील महिला लाजतात, या चाचणीस त्या घाबरतात. तसंच ही चाचणी त्यांना अनावश्यक वाटते," असं 'युरोपियन जर्नल ऑफ कॅन्सर प्रिव्हेंशन' मध्ये लिहिणारे संशोधक सांगतात. आजही भारतातील 90 टक्क्याहून अधिक ग्रामीण महिला मासिक पाळी दरम्यान कापडच वापरतात.

टाटा मेमोरिअल सेंटर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टीव हेल्थ इन इंडिया यांच्या मते वापरलेल्या पॅड्सच्या परीक्षणानंतर त्यामधील ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं (HPV) अस्तित्व ओळखता येतं. "हा व्हायरस सर्व्हायकल कॅन्सरसाठी कारणीभूत ठरतो. सर्व्हायकल कॅन्सर ओळखण्याचा हा एकदम सोपा आणि सोयीस्कर मार्ग आहे," असं टाटा मेमोरिअल सेंटरचे संशोधक डॉ. अतुल बुडुख यांनी बीबीसीला सांगितलं.

लॅब

फोटो स्रोत, DR ATUL BUDUKH/TMC HOSPITAL

फोटो कॅप्शन,

गोळा करण्यात आलेल्या पॅड्सची लॅबमध्ये तपासणी करण्यात आली.

ग्रामीण महिलांमध्ये सर्व्हायकल कॅन्सरच्या चाचणीबाबत जागरूकता निर्माण करणं खूप मोठं आव्हान असल्याचं ते सांगतात.

"निदान झालेल्यांतले अनेक रूग्ण एकतर या कॅन्सरने धोकादायक पातळी गाठल्यावर दवाखान्यात येतात, किंवा दुसऱ्या एखाद्या आजाराचं निदान करण्यासाठी दवाखान्यात आलेले असताना या कॅन्सरचे निदान होते आणि त्यांना धक्का बसतो."

डीप फ्री़ज डीएनए

या शोधासाठी 30 ते 50 वर्षं वयाच्या एकूण 500 महिलांच्या पॅड्सचा दोन वर्षं अभ्यास करण्यात आला. या सर्व महिला तंदुरूस्त होत्या. तसंच नियमितपणे मासिक पाळी येत होती.

संशोधनादरम्यान महिलांना मासिक पाळीच्या वेळी त्या वापरत असलेले कापड साध्या चेनच्या पिशवीत ठेवायला सांगितले. नंतर ती पिशवी महिलांकडून आरोग्यसेविकांना देण्यात आली. गोळा करण्यात आलेले सर्व कापड -20 सेल्सियस तापमानात ठेवण्यात आले आणि HPV च्या चाचणीसाठी पाठवण्यात आले.

त्यानंतर या कापडांना लागलेल्या रक्तापासून जेनोमिक डीएनए वेगळा करण्यात आला आणि त्याचा अभ्यास पॉलिमर चेन रिअॅक्शन प्रक्रियेद्वारा करण्यात आला. एकूण 24 महिलांमध्ये HPV असल्याचे निदान झालं आणि पुढील तपासणीसाठी त्यांना ग्राह्य धरण्यात आलं. यामध्ये 'कॉल्पोस्कोपी'सारख्या टेस्टचा समावेश होतो, ज्यात गर्भाशयाचे निरीक्षण करून त्यातील पेशी सामान्य आहेत का, त्यांना काही उपचाराची गरज आहे का, याचे निदान करता येते.

संशोधकांनी या अभ्यासादरम्यान महिलांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीची, शौचालय आणि इतर स्वच्छताविषयक सुविधांचीही माहिती जमा केली आहे.

जननेंद्रियांची स्वच्छता महत्त्वाची

जननेंद्रियांच्या स्वच्छतेबद्दल जागरूकतेची आज नितांत गरज आहे, हा या अभ्यासातला एक स्पष्ट निष्कर्ष होता. 2011 सालच्या जनगणनेनुसार देशातल्या 41 टक्के घरांमध्ये बाथरूम नाही. आणि ज्यांच्याकडे आहे, त्यातील 16 टक्के बाथरूमवर छप्पर नाही.

सॅनिटरी नॅपकीन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

ग्रामीण महिलांचं सॅनिटरी नॅपकीन वापरण्याचं प्रमाण खूप कमी आहे.

अस्वच्छ जननेंद्रियांमुळे डिस्प्लेसियाची वाढ होते आणि सर्व्हायकल कॅन्सर बळकट होतो. मासिक पाळी दरम्यान वापरण्यात येणाऱ्या कापडांचा सारखा-सारखा पुनर्वापर हा धोका आणखी वाढवत असल्याचं अनेक अभ्यासांमधून स्पष्ट झालं आहे.

समज,गैरसमज आणि अंधश्रद्धा

आरोग्य सेविकांसाठी सायंकाळी पॅड्स गोळा करणं खूपच अवघड होतं. कारण मासिक पाळीबद्दल आजही अनेक भागात बरेच समज-गैरसमज आहेत.

उदाहरणार्थ, मासिक पाळीत स्त्रीला स्वयंपाकघरात प्रवेश नसतो किंवा धार्मिक विधींमध्ये तिचा सहभाग नसतो. मासिक पाळीत असलेली स्त्री सूर्यास्तानंतर घराबाहेर पडली की काहीतरी वाईट घडणार, अशीसुद्धा अंधश्रद्धा आहे.

या अभ्यासादरम्यान सहभागी झालेल्या महिलांच्या कुटुंबियांसाठी, स्थानिक नेत्यांसाठी तसंच समाजसेवकांसाठी सर्व्हायकल कॅन्सर विषयी जाणीव-जागरूकता निर्माण करणारे कार्यक्रम आयोजित केले होते.

पण या अभ्यासाला काही मर्यादा होत्या. पॅड्सचे नमुने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणं खूपच खर्चिक होतं. फ्रीजर स्टोरेज ऐवजी हे सॅंपल मेलद्वारे पाठवता आलं तर ते जास्त सोयीस्कर ठरेल, असं संशोधकांचं म्हणणं आहे. शिवाय मासिक पाळी चालू असणाऱ्या महिलांसाठीच ही पद्धत फायद्याची असल्याचंही ते नमूद करतात.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)