लैंगिक शिक्षणाची कमतरता का आहे समाजासाठी धोकादायक?

केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांना लैंगिक शिक्षण देणे अनिवार्य नाही. Image copyright Thinkstock
प्रतिमा मथळा केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांना लैंगिक शिक्षण देणे अनिवार्य नाही.

भारताच्या शाळांमध्ये लैंगिक शिक्षण नावापुरतंच मर्यादित राहिलं आहे. पण आता ब्रिटनमध्ये सुद्धा लैंगिक शिक्षणाबद्द्ल चिंता वाढत आहे. जाणकारांच्या मते लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे निर्माण होणारी परिस्थिती ही टाइम बॉम्ब इतकी धोकादायक असणार आहे.

ब्रिटनच्या बहुसंख्य शाळांमध्ये लैंगिक शिक्षण अनिवार्य असूनसुद्धा अशी परिस्थिती उद्भवली आहे. इंग्लंडमधील स्थानिक सरकारी संस्था लोकल गव्हर्नमेंट असोसिएशनच्या (LGA) मते सर्व सरकारी माध्यमिक शाळांमध्ये लैंगिक शिक्षण अनिवार्य असायला हवं. वयात येण्याच्या काळात मुलांना लैंगिक शिक्षण मिळत नसल्याने ती लैंगिक आजारांना / गुप्तरोगांना बळी पडतात, असं या संस्थेचं म्हणणं आहे.

एलजीएच्या मते मुलं योग्य वयात असतानाच त्यांच्या शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश करायला हवा. पण सध्या मुलांची पालक मंडळी त्यांना यापासून दूर ठेवत आहेत.

सरकारी आकडेवारीनुसार 2015 साली इंग्लंडमध्ये 15 ते 19 वयोगटातील 78,066 मुलं लैंगिक आजारांना बळी पडली. पण 20 ते 24 वयोगटातील मुलांची संख्या मात्र 1,41,260 इतकी प्रचंड होती.

सार्वजनिक आपोग्याची जबाबदारी असणाऱ्या स्थानिक प्रशासनाच्या मते, दरवर्षी 60 करोड पौंड लैंगिक आरोग्यावर खर्च केल्या जातात.

युवकांमध्ये लैंगिक शिक्षणाबद्दल नाराजी

"आमच्यातले अनेक जण आता सोळाव्या वर्षात पदार्पण करणार आहेत, आणि सेक्स करण्यासाठी हे वय (ब्रिटनमध्ये) कायदेशीरही मानल्या जातं. तेव्हा शारीरिक संबंध ठेवताना काय योग्य आणि काय अयोग्य, हे आम्हाला समजायला हवं," असं एका 15 वर्षाच्या मुलीने सांगितले.

तर 15 वर्षाच्या एका मुलानुसार, "सेक्स आजही वर्जित मानल्या जाणारी एक गोष्ट आहे, आणि शिक्षक सहजासहजी याबद्दल बोलत नाही. सेक्ससंबंधीच्या अभ्यासक्रमात कोणत्याही प्रकारच्या शरीर संबंधांची माहिती दिली जात नाही. कसाही करून हा विषय संपवण्याचा तेवढा प्रयत्न केला जातो."

एका 16 वर्षीय मुलीने तिच्यासोबत झालेला एक वाईट प्रसंग सांगितला. "माझं लैंगिक शोषण झालं पण कुणी मला सांगितलं सुद्धा नाही की माझ्यासोबत जे काही झालं ते चूक होतं. ज्यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं ते माझे आजोबा होते. नक्कीच मला ते आवडलं नाही, पण तेव्हा मला कळत नव्हतं की ते चुकीचं आहे."

"मला लाज वाटायची. असं वाटायचं की माझीच चूक आहे. जर मला माहिती असतं की ते चुकीचं होतं, तर मी याविषयी कुणालातरी नक्कीच सांगितलं असतं. मला जर कुणी समजून घेतलं, असतं तर हे खूप पूर्वीच थांबलं असतं."

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
मुंबईतल्या सेक्स वर्कर महिलांच्या मुलींची यशोगाथा

मागच्या काही वर्षांपासून लैंगिक शिक्षणाविषयी अभियान चालवणाऱ्या लोकांनी आता हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. इंग्लंडची काही नेते मंडळीसुद्धा याविषयी बोलत आहेत, आणि युवकांसाठी लैंगिक शिक्षण सोपं करण्यावर भर द्यावा, अशीही चर्चा सुरू आहे.

सध्या राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या अंतर्गत इंग्लंडमधील सरकारी शाळांमध्ये लैंगिक शिक्षण देणे अनिवार्य आहे. पण प्रश्न केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांविषयी आहे.

या शाळा राष्ट्रीय अभ्यासक्रमाशी बांधील नाहीत आणि म्हणूनच लैंगिक शिक्षण देणं त्यांना अनिवार्य नाही. खरं तर बहुसंख्य शाळा आणि मोफत शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये लैंगिक शिक्षण दिल्या जात नाही.

Image copyright Thinkstock
प्रतिमा मथळा केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांना लैंगिक शिक्षण देणे अनिवार्य नाही.

लैंगिक आरोग्याबद्दलचा टाइम बॉम्ब

LGA सामुदायिक सुख बोर्डाचे प्रमुख इज्जी सेकोम्बे यांच्या मते, "लैंगिक शिक्षण सार्वजनिक आरोग्याशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा आहे. शाळेत सेक्स आणि शारीरिक संबंधाबद्दलच्या शिक्षणाचा अभाव समोर चालून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रश्न निर्माण करतात. खरं तर जी मुलं आत्ता शाळेतून बाहेर पडली, त्यांच्याकडे पाहिल्यास हे आम्हाला प्रकर्षानं जाणवलं की लैंगिक शिक्षणाचा अभाव एखाद्या टाइम बॉम्बसारखा आहे, ज्याची टिक टिक आता ऐकायला येत आहे."

सेक्स एज्युकेशन फोरमच्या लिसा हॉलगार्टेन यांच्या मते, "तरूण मुलं आम्हाला नेहमी सांगतात की लैंगिक शिक्षणाबद्दल त्यांना शाळेत मिळणारे धडे अपुरे आहेत. यात त्यांना लैंगिक संबंधांबद्दल पुरेशी माहिती मिळत नाही."

ब्रिटनच्या संसदेतील कनिष्ठ सभागृहात सध्या याविषयी कायदा बनवण्याच्या चर्चा सुरू आहे. मंत्र्यांनुसार ते अशा पर्यायाच्या शोधात आहेत, ज्याद्वारे मुलांना लैंगिक शिक्षण देणे सोपे जाईल.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)