गेल्या काही वर्षांत पावसाचा लहरीपणा खरंच वाढला आहे का?

  • अभिजित घोरपडे
  • पर्यावरण तज्ज्ञ
पाऊस, मुंबई
फोटो कॅप्शन,

सप्टेंबर- ऑक्टोबरमधला अचानक आलेला धुवांधार पावसानं मुंबई ठप्प केली.

मुंबईत गेल्या महिन्यात पावसानं कहर केला. मराठवाड्यात एका रात्रीत नदीला पूर आला. तरी काही भागांत दुष्काळी परिस्थिती आहेच. या लहरी वादळी पावसाचा कहर नेमकं काय सांगतो?

'पाऊस पहिल्यासारखा राहिला नाही रे बाबा...' महाराष्ट्रात कुठंही जा, हे वाक्य कानी पडतंच. पावसाचं प्रमाण कमी झालं आहे, पाऊस लहरी झाला आहे, पाऊस बदलला आहे, हे दरवर्षी सगळ्यांना वाटतं.

कधी पावसाच्या आगमनाबाबत, ऐन पावसाळ्यात पडणारी उघडीप, पावसाची तीव्रता, तर कधी आणखी कशासाठी. मुद्दा काहीही असो, पण पाऊस बदलला आहे यावर आमचं एकमत असतं.

आतापर्यंत पाऊस 'लहरी' होता, आता त्याच्या पुढे जाऊन तो पहिल्यासारखाही उरला नाही. त्याचं वागणं बिघडलं आहे. हे तक्रारीच्या आणि काळजीच्या स्वरूपात बोललं जातं आहे. तशी उदाहरणंही दिली जातात.

आताचंच पाहा ना-गणपतीत मुंबईकरांनी '२६ जुलै'च्या महाप्रलयाचा ट्रेलर अनुभवला. झाडून सगळ्या वर्तमानपत्रात, वृत्तवाहिन्यांमध्ये 'मुंबई बुडालेली'असताना, तिकडं विदर्भ-मराठवाडा पावसाची वाट पाहात होता.

गुजरातेत धुवांधार पावसानं धुमाकूळ घातला होता. पुण्यामुंबईचा पट्टा, कोकण, सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवर धो धो कोसळत होता, पण पर्जन्यछायेच्या बऱ्याचशा पट्ट्यात, वाहून जाणाऱ्या ढगांशिवाय दुसरं काहीच नव्हतं. अनेक भागात नेहमीसारखे ओढे वाहिले नाहीत..

सांगा, आता याला काय म्हणायचं? म्हणून काहीतरी बिनसलं आहे, बदललं आहे हीच आमची तक्रार.

फोटो स्रोत, Abhijeet Ghorpade

फोटो कॅप्शन,

कधी बराच काळ उघडीप तर कधी एका रात्रींत नदीला पूर, ही परिस्थिती महाराष्ट्रात सगळीकडे दिसली.

खरी परिस्थिती काय आहे?

तक्रार वगैरे ठीक आहे. पण परिस्थिती खरंच तशी आहे का? पूर्वी सगळं छान छान होतं आणि आताच सारं बिघडलंय का?

पूर्वी रूळ पाण्याखाली जाऊन मुंबई ठप्प व्हायची तेव्हा म्हसवड, आटपाडी, जतच्या माणदेशातही चांगला पाऊस पडायचा का?

तसं असतं तर त्या दुष्काळी पट्ट्यात 'हाकंव पेंडी आन् बोंबंव खंडी' (हाकेचा आवाज जाईल तितक्या क्षेत्रावर अंतरावर पेंडीभर पीक येणार आणि बोंब मारल्यावर आवाज जाईल तितक्या क्षेत्रावर वीसेक पेंड्या पिकणार!) अशा म्हणी तयार झाल्या असल्या का?

मग आताच सारं कसं काय बदललं आहे? त्यात पडायला नको, कारण युक्तिवाद करायचाच म्हटलं तर दोन्ही बाजूंनी करता येतो.

तुम्ही कोणत्या बाजूला आहात ती बाजू लावून धरता येते, अगदी न्यूज चॅनेल्सवरच्या चर्चांप्रमाणं!

मग उत्तर कसं शोधायचं? त्यासाठी काही आकडे पाहू. आकड्यांचं उत्तर म्हणाल तर तेही- कभी हाँ, कभी ना! पाऊस बदललाय हेही खरं आणि बदलला नाही, हेही खोटं नाही.

कारण पुन्हा तेच- आपण आकडे कसे मांडतो त्यावर आपलं उत्तर.

सव्वाशे वर्षांचा पावसाचा पॅटर्न सारखा

पावसाचं एकूण प्रमाण पहाल तर गेल्या शे-सव्वाशे वर्षांत ते बदललं नाही. थोडाफार बदल झाला आहे, पण तो हवामानात होणाऱ्या नैसर्गिक चढ-उतारांवर टाकावा लागेल किंवा पावसाच्या नोंदी घेण्यातील त्रुटींवर.

त्यामुळे मुंबईचं वार्षिक पर्जन्यमान सरासरी २३०० -२४०० मिलिमीटरच्याच आसपास आहे.महाबळेश्वर साडेपाच-सहा हजारांच्या आसपास आहे आणि माणदेश चारशे-साडेचारशे मिलिमीटरच्याच टप्प्यात आहे.मराठवाडा घ्या, विदर्भ घ्या... कोणताही भाग घ्या.

गेल्या शे-सव्वाशे वर्षांत तिथं पावसाचे प्रमाण विशेष बदललं नाही. यावर भरपूर अभ्यास झाला आहे, आकडेमोड झाली आहे, गणितं मांडलीत. त्यामुळे तुम्हाला का वाटतं याला इथे अर्थ नाही.

पण म्हणून तुमचं म्हणणं अगदीच गैरलागू ठरत नाही. कारण एका बाजूने तुमचं वाटणं खोटं ठरत असलं, तरी पावसाची आकडेवारी वेगळ्या पद्धतीनं मांडली की तुमची बाजू एकदम बरोबर ठरते.

पावसाचं चार महिन्यातलं वितरण कसं आहे? हे पाहिलं की तुमचा मुद्दा पटतो. कारण अलीकडं पावसाचं वितरण असमान झालं आहे. म्हणजे जास्त काळ पडण्यापेक्षा तो थोड्याच वेळात जास्त पडतो,सरासरी भरून काढतो.

त्यामुळे कागदावर आकडेवारी बरोबर दिसते, पण प्रत्यक्षात त्याचे परिणाम भोगावे लागतात- कधी पाण्याअभावी पिकं जळाल्यामुळं, तर कधी पावसानं झोडपल्यामुळं.

फोटो स्रोत, Abhijeet Ghorpade

फोटो कॅप्शन,

पावसाच्या पॅटर्नमध्ये बदल झाल्याबद्दल तज्ज्ञांची वेगवेगळी मतं आहेत.

तज्ज्ञ काय म्हणतात?

पावसाकडं वस्तुनिष्ठपणे पाहिलं तर बदल निश्चित झालेत.

भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम),भारतीय हवामान विभाग (आयएमडी) यांच्या अभ्यासांचा संदर्भ घेतला तर अलीकडं मान्सूनची सुरुवात तर वेळेवर होते, पण त्यानंतर पावसात मोठे खंड पडू लागलेत.

आपण गेल्या सात-दहा वर्षांत ते अनुभवलंसुद्धा. दुसरं म्हणजे त्याचं उशीरपर्यंत रेंगाळणं.

महाराष्ट्रात २०१३ साली तर तो ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत रेंगाळला. त्यानंतर २०१४ च्या फेब्रुवारी-मार्चमध्येच तुफानी गारपीट सुरू झाली आणि त्याचं वेगळंच वागणं दृष्टीस पडलं.

शिवाय याबाबतीत केवळ आकड्यांवर विसंबून चालत नाही,लोकांना काय वाटतं हेही काही प्रमाणात विचारात घ्यावं लागतं. कारण हे त्यांच्याच नजरेतून पाहायचं आहे.

हे सर्व लक्षात घेतलं तरी हवामानाचा विचार मांडताना एक मर्यादा लक्षात घ्यावी लागते-ती आहे कालखंडाची किवा 'टाईम स्केल'ची.

आपण विचार करतो- माणसाच्या कालखंडाचा, ह्यूमन टाईमस्केलचा. त्यामुळेच दहा-वीस वर्षांत काय बदल झालं यावर आपली गणितं ठरतात, पण हवामानाचं टाईम स्केल किमान काही शतकांचं आहे. तिथं आपला वीस-पन्नास वर्षांचा तुकडा गैरलागू होतो.

म्हणूनच हवामानाच्या बाबतीत लगेच आपण 'ठोस बातमी' काढायला गेलो तर तोंडावर आपटायचीच शक्यता जास्त असते. हवामानबदल नाकारता येत नाही, पण म्हणून लगेच होणारे सर्वच बदल त्याच्या माथी मारता येत नाहीत.. विशेष म्हणजे या लहानमोठ्या बदलांची कारणं लगेच तरी देता येत नाहीत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)