100 बलात्काऱ्यांच्या मुलाखती घेणारी मधुमिता

विदेशी माध्यमांमध्ये सध्या मधुमिता पांडे हे नाव चर्चेत आहे. तिच्या पीएचडी प्रबंधासाठी ती भारतातील बलात्काराचा आरोप असलेल्या 100 जणांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
मूळची भारतीय असलेली 26 वर्षांची मधुमिता इंग्लंडमधील एंग्लिया रस्किन युनिव्हर्सिटीतील क्रिमिनॉलॉजी विभागात पीएचडी करत आहे.
जेव्हा मधुमिता 22 वर्षांची होती तेव्हा दिल्लीतील तिहार जेलमध्ये जाऊन तिनं बालात्कारातील आरोपींच्या मुलखती घेतल्या होत्या. गेल्या तीन वर्षात तिने अशा 100 आरोपींच्या मुलाखती घेतल्या आहेत.
मधुमितानं 2013 ला या मुलाखती घ्यायला सुरुवात केली. त्यापूर्वी काही महिने आधीच दिल्लीत निर्भया बलात्कार प्रकरण घडलं होतं.
बीबीसी एशियन नेटवर्कशी बोलताना मधुमिता म्हणाली, '12 डिसेंबर 2016 ला दिल्लीत एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता आणि या विरोधात लोक रस्त्यावर उतरले होते. या घटनेनंतर भारतात बलात्कारावर मोठी चर्चा झाली होती.'
मधुमिता म्हणते, ''माझा जन्म दिल्लीतीलच आहे. निर्भया बलात्कार प्रकरणानंतर झालेल्या आंदोलनात मी सहभागी होते. तेव्हा प्रत्येक जण विचारत होता की हे का होत आहे? बलात्कार करणाऱ्यांचं डोकं कसं काम करतं, हे सर्व प्रश्न माझ्या पीएचडीशी संबंधीत होते.''
'बलात्काराच्या आरोपात दोषी ठरलेल्यांसमोर तुला असुरक्षित वाटलं नाही का? तुला त्यांचा राग आला नाही का?' या प्रश्नाच्या उत्तरात ती म्हणाली, "खरंतर असं काहीच झालं नाही. त्यांनी जे केलं त्याबद्दल दुःख आणि वैषम्य वाटत होतं. मी तेच तपासतं होते की, त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चात्ताप वाटतो आहे का? ते हे कृत्य पुन्हा करतील का? पण मला जाणवलं की, खरंतर आपण जे केलं ते चूक होतं हे त्यांना समजणं आवश्यक आहे. त्यांना याचीच जाणीव नसते की, नेमकी चूक कुठे आहे."
काही दिवसांपूर्वी चंदीगडमध्ये 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला होता. सर्वोच्च न्यायालायानं या मुलीला गर्भपाताची परवानगी दिली नव्हती. मधुमिताच्या मनात हे सर्व विषय आहेत.
ती म्हणाली, "माझा उद्देश हा होता की या बलात्कारी पुरुषांची पीडितांबद्दलची मानसिकता कशी आहे? लैंगिक गुन्ह्यांबद्दलची त्यांची समज कशी आहे?"
मधुमितानं 'वॉशिंग्टन पोस्ट'मध्ये म्हटलं आहे की, "मला असं वाटत होतं की, ही माणसं राक्षस आहेत. पण जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली, त्यावेळी लक्षात आले की, हे आरोपी कुणी असाधारण पुरूष नाहीत. ते त्याच मानसिकतेत वाढलेले असतात. यातील अनेकांना हेच माहीत नसतं की, शारिरीक संबंधांसाठी सहमती आवश्यक असते."
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)