वर्धा जिल्ह्यात फक्त एका मुलीसाठी शाळा सुरू आहे

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
वर्ध्यामधील 'त्या' शाळेची विद्यार्थी संख्या फक्त एक

तनूला शाळेत कोणीही मित्र-मैत्रिणी नाहीत. ती एकटीच डबा खाते. एकटीच घरी येते.

तिसरीत शिकणारी तनू जेव्हा शाळेत पोहोचते तेव्हा शाळा रोज रिकामीच असते.

असं नाही की तिचं कुणाशी पटत नाही. ते असं आहे... तिच्या शाळेत ती एकटीच शिकते!

वर्ध्याच्या कोपरा गावातली प्राथमिक जिल्हा परिषदेची ही शाळा. पहिली ते पाचवीच्या या शाळेत तनू मडावी ही एकमेव विद्यार्थिनी आहे.

शाळा फक्त 'ती'च्यासाठी

वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील कोपरा गावात ही शाळा आहे. गेल्यावर्षी पहिली ते पाचवीच्या या शाळेत दोनच विद्यार्थी होते.

त्यातला एक विद्यार्थी पाचवी पास झाला आणि यंदाच्या शैक्षणिक वर्षांत फक्त तनू मडावी ही एकटीच विद्यार्थिनी शिल्लक राहिली.

प्रतिमा मथळा शाळेची इमारत धोकादायक झाल्यानं तनूची शाळा शेजारील किचनशेडमध्ये भरते.

या एका विद्यार्थिनीला शिकवण्यासाठी अरुण सातपुते रोज शाळेत येतात. तिच्यासाठीच रोज प्रत्येक विषयाचे तास होतात.

सोयी नाही, पण शाळा आहे

कोपरा गावात धड रस्ते नाहीत, पायाभूत सुविधा नाहीत. एकच विद्यार्थिनी असल्याने ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती.

शाळा बंद पडली तर तनुचं शिक्षण बंद होईल. तिला कदाचित आईसोबत शेतामजुरीलाही जावं लागेल.

म्हणूनच वर्धा जिल्हा परिषदेनं या एका विद्यार्थिनीसाठी दरमाही ६० ते ७० हजार रुपये खर्च करून ही शाळा सुरू ठेवली आहे.

किचन शेडमध्ये भरते शाळा

कोपरा गावातील या शाळेची इमारत धोकादायक आहे. संपूर्ण इमारतीला भेगा पडल्याने शाळा शेजारच्या किचन शेडमध्ये भरते.

शाळेत वीजही नसते. पण अशा प्रतिकूल परिस्थितीतही शाळा सुरू आहेच.

हिंगणघाट तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी ललितकुमार बारसागडे यांनी सांगितलं की, "धोकादायक इमारत असल्यास तिथे विद्यार्थ्यांना बसवू नये असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत."

प्रतिमा मथळा कोपरा गावातील प्राथमिक शाळेत तनू मडावी ही एकमेव विद्यार्थिनी आहे.

"विद्यार्थी संख्या कमी असल्यानं शाळेची नवीन इमारत उभी राहू शकत नाही. परंतू, तनूची गैरसोय होऊ नये म्हणून शाळेशेजारील किचन शेडमध्ये तिच्या शिक्षणाची सोय केली आहे."

तनुला डॉक्टर व्हायचं आहे...

शाळेची परिस्थिती प्रतिकूल असली तरी तनू मात्र आनंदी आहे. तनूशी गप्पा मारल्या असता तिच्यात शिकण्याची दुर्दम्य इच्छा असल्याचं दिसून येत होतं.

उत्साहात तनुने मराठी कविता म्हणून दाखवल्या. आणि विचारल्यावर तिने सांगितलं, "मला मोठं होऊन डॉक्टर व्हायचं आहे."

"शाळेत मी आणि सर दोघंच असतो," असं तिने पुढे सांगितलं. आणि यातूनच वर्गात मित्र-मैत्रिणी नसल्याची हलकीशी खंतही तिच्या बोलण्यातून जाणवली.

नियमांमुळे दिलासा

या गावातले काही विद्यार्थी दुसऱ्या गावी गेल्याने इथे आता दखलपात्र विद्यार्थी शिल्लकच नाहीत. एखाद्या गावात विद्यार्थी संख्या पुरेशी नसल्यास जे थोडेबहुत विद्यार्थी असतात, त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे दुसऱ्या गावातील शाळेत पाठवलं जातं.

मात्र तनुच्या बाबतीत ते शक्य नव्हतं.

याबाबत गटशिक्षणाधिकारी बारसागडे म्हणाले, "एखाद्या गावात कमी विद्यार्थी संख्या असली तर आम्ही त्यांना शासनाच्या नियमानुसार जिल्हा परिषदेच्या अन्य शाळेत वर्ग करतो."

"मात्र या गावापासून तीन किलोमीटरपर्यंत कोणतीही शाळा नाही. तसंच शाळेत येण्यासाठी रस्ते चांगले नाहीत. या गावात जेमतेम १४ घरं आहेत. त्यामुळे दाखलपात्र विद्यार्थ्यांची संख्या कमीच आहे."

पण तनुच्या शिकण्याच्या इच्छेला मात्र तिच्या पालकांनी बळ दिलं आहे, हे उल्लेखनीय.

प्रतिमा मथळा कोपरा गावातील रस्ते खराब असल्यानं वर्षातील चार महिने शाळेत पायीच यावं लागतं.

''ती शिकते याचं पालक म्हणून मला समाधान वाटतं," असं तिचे वडील राजू मडावी यांनी सांगितलं.

"शाळेत विद्यार्थी नसल्याने ती एकटीच असते. वर्गात मैत्रिणीही नाहीत. तरीही तिने शिकून मोठं व्हावं, असंच आम्हांला वाटतं," त्यांनी पुढे सांगितलं.

एक शाळा, एक शिक्षक

या शाळेचे एकमेव शिक्षक अरुण सातपुते गेल्या सहा वर्षांपासून या शाळेत शिकवत आहेत. शनिवारी सकाळची शाळा असल्याने ते शुक्रवारी रात्री याच गावात मुक्काम करतात.

त्यांनाही तनुसारखंच शाळेत खडतर मार्गानं पोहोचावं लागतं. चार महिन्यांच्या पावसाळ्यामध्ये तर ते पायीच शाळा गाठतात.

"या गावात रस्ते नाहीत. पावसाळ्यात पायी यावं लागतं. एक मुलगी असली तरी शिकवावं लागतं," ते सांगत होते.

प्रतिमा मथळा तनूला शिकवणारे शिक्षक सातपुते यांना आठवड्यातून एकदा गावातच रहावे लागते.

कोपरा गावातील जिल्हा परिषदेची ही शाळा पाचवीपर्यंत आहे. कोपरा गावाचं पुनर्वसन झाल्याने नागरिक दुसऱ्या गावी गेले आहेत. सध्या या गावाची लोकसंख्या फक्त 64 आहे. त्यामुळे मुलांची संख्या वाढेल, याची चिन्हं काही दिसत नाहीत.

त्यामुळे कदाचित पाचवीपर्यंत तनूला या शाळेत एकटीनेच जावं लागेल, असं सध्यातरी चित्र दिसत आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)