प्रेस रिव्ह्यू - मोबाईल इंटरकनेक्ट रेट्समध्ये ५७ टक्क्यांची घट

मोबाईलवर बोलणारा माणूस Image copyright INDRANIL MUKHERJEE/GETTY

मराठी, हिंदी आणि इंग्रजी प्रसारमाध्यमांमध्ये बुधवारी प्रसिद्ध झालेल्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

इंटरकनेक्ट रेट्समध्ये ५७ टक्क्यांची घट झाल्यानं मोबाईल बील कमी येणार आहे. मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या एकमेकांचे फोन कॉल जोडण्यासाठी एकमेकांना ठराविक दर आकारतात.

या दरांमध्ये ५७ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय टेलिकॉम रेग्युलेटर 'ट्राय'नं घेतला आहे.

त्यामुळे मोबाईल ग्राहकांच्या बिलातही मोठ्या प्रमाणात कपात होणार आहे. असं वृत्त टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रानं दिलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा लष्कर-ए-तयब्बाचा काश्मीर प्रमुख होण्यास जहालवादी तयार नाहीत

लष्कर-ए-तय्यबाला म्होरक्या नाही

लष्कर-ए-तय्यबा काश्मीर प्रमुख होण्यास एकही जहालवादी तयार नाही. टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, काश्मीर पोलिसांकडून गेल्या आठवड्यात पाकिस्तानी जहालवादी अबू इस्माईल मारला गेला.

त्याच्या मृत्यूनंतर लष्कर-ए-तय्यबाच्या काश्मीर विभागाचा प्रमुख होण्यास कोणी तयार नाही.असं काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वेद यांनी सोमवारी जाहीर केलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सर्जिकल स्ट्राइकनंतर भारतीय लष्कर प्रत्युत्तरासाठी सज्ज होतं.

...तर भारतीय लष्कर तयार होतं

सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकच्या प्रत्युत्तरासाठी भारतीय लष्कर सज्ज होतं. गेल्या वर्षी भारतीय लष्करानं पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केला होता.

या हल्ल्यानंतर पाकिस्ताननं जोरदार प्रत्युत्तर दिलं असतं तर त्यासाठी भारतीय लष्कर सज्ज होतं. असा खुलासा तेव्हाच्या सर्जिकल स्ट्राइकच्या मोहिमेचे प्रमुख लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

सर्जिकल स्ट्राइक करताना एकाच वेळी अनेक आघाड्यांवर भारतीय जवान लक्ष ठेऊन होते असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा समझोता एक्स्प्रेस बॉम्ब हल्ल्यात हिंदू जहालवाद्यांचा निश्चित सहभाग होता.

'समझोता स्फोटामागे हिंदू जहालवादीच'

समझोता एक्स्प्रेस बॉम्ब हल्ल्यात हिंदू जहालवाद्यांचा निश्चित सहभाग होता. असा गौप्यस्फोट २००७ ते २०१० या काळात समझोता एक्स्प्रेस बॉम्ब हल्ल्याचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाचे तत्कालिन प्रमुख विकास नरेन राय यांनी केला.

इंदौरमधील काही जहालवाद्यांचा यात सहभाग होता असंही ते म्हणाले. टाइम्स ऑफ इंडियानं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पुणेकर सर्वाधिक लठ्ठ

पुणेकर सर्वात लठ्ठ

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात लठ्ठपणामध्ये राज्यात पुणेकरांनी पहिला क्रमांक 'पटकावला' आहे. पुणेकरांपाठोपाठ मुंबईकरांनी दुसरे स्थान मिळवले आहे.

वाढते ताणतणाव, वेळीअवेळी जेवणे, बैठं काम अशा जीवनशैलीचा फटका पुणेकरांना बसला आहे. महाराष्ट्र टाइम्सनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

पुरुषांसमवेत महिलांमध्येही लठ्ठपणाचं प्रमाण अधिक असल्याचं या पाहणीत समोर आलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मुंबईतील 22 हजारांवर शेतक-यांनी भरला कर्जमाफीचा अर्ज

मुंबईत शेतकरी किती?

मुंबईतील 22 हजारांवर शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा अर्ज भरला आहे. राज्य सरकारनं शेतकऱ्यांची ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जूनमध्ये जाहीर केली.

कर्जमाफीसाठी आतापर्यंत ५३ लाख ३९ हजार ७ अर्ज प्राप्त झाले आहेत. मुंबईत अधिकृत १६९४ शेतकरी असताना तब्बल २२,९९६ अर्ज आले आहेत. असं वृत्त दिव्य मराठीनं दिलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)