नारायण तातू राणे : वादळी नेत्याचं राजकारण, पक्षकारण आणि समीकरणं
- प्रसन्न जोशी
- बीबीसी मराठी प्रतिनिधी

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव गाजवलेली, वादांची वादळं पाहिलेली आणि झेललेली अनेक नावं विविध पक्षात आजवर आपल्यासमोर आली आहेत. शिवसेनेत अशी दोन मोठी नावं होती. एक म्हणजे छगन भुजबळ आणि दुसरे ते नारायण राणे.
भुजबळ तुरुंगात गेल्यानं त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नच आहे. राणेंचं मात्र तसं नाही. ते आजही राज्याच्या राजकारणाची गणितं बदलू शकत आहेत.
आज वयाच्या पासष्टीत असलेल्या राणेंना राजकीय कारकिर्दीतील असे चढ-उतार आणि अशी नाट्यमय वळणं नवी नाहीत. याची सुरुवात वयाच्या विशीत राणे शिवसेनेत दाखल झाल्यावर होते.
कोकणातल्या सिंधुदुर्गातला आणि मुंबईत रोजगार मिळवणाऱ्या असंख्य सामान्य तरुणांप्रमाणे नारायण तातू राणेही शिवसेनेत गेले.
शिवसेनेच्या त्या दिवसात बाळ ठाकरेंनीही राणेंच्या क्षमतेचा वापर शिवसेनेसाठी करून घेतला. राणेंनीही कोकणात, मुंबईत शिवसेना वाढवण्यासाठी कष्ट घेतले.
तोपर्यंत चेंबूरचे शाखाप्रमुख झालेल्या राणेंनी नंतर संघटनेत आणि राजकीय कारकिर्दीत मागे वळून पाहिलं नाही. आधी नगरसेवक, मग मुंबईची सार्वजनिक परिवहन सेवा 'बेस्ट'चे अध्यक्ष, अशी राणेंची राजकीय कमान चढती राहिली.
फोटो स्रोत, Narayan Rane/Twitter
नारायण राणेंची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली.
दरम्यान, 1991 साली भुजबळांनी सेना सोडली आणि विधिमंडळातल्या विरोधपक्ष नेतेपदाची संधी आमदार राणेंकडे चालून आली. यथावकाश महाराष्ट्रात झालेल्या ऐतिहासिक सत्तांतरात शिवसेना-भाजप युती सरकारात राणे महसूल मंत्री झाले.
युती सरकारच्या शेवटच्या टप्प्यात मनोहर जोशींना गैरव्यवहारांच्या आरोपांचा सामना करावा लागला. बाळ ठाकरेंनी जोशींचा राजीनामा घेतला आणि नारायण राणे मुख्यमंत्री झाले.
गंमत म्हणजे एक वर्षाच्या मुख्यमंत्रिपदापेक्षा राणे विरोधी पक्षनेतेपदासाठी अधिक ओळखले गेले. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला अधिवेशन काळात राणेंची धास्ती असायची.
मात्र, याच काळात बाळ ठाकरेंनी आपला उत्तराधिकारी म्हणून शिवसेना कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची निवड केली आणि सेनेतले दोन नेते दुखावले गेले - राज ठाकरे आणि नारायण राणे.
2005 मध्ये नारायण राणेंनी काही आमदारांसोबत शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसवासी झाले. राणेंचा शिवसेनेतला अध्याय संपला.
काँग्रेसवासी राणे
काँग्रेसमध्येही राणे स्वस्थ नव्हते. राणेंची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्रिपदाची होती. यातूनच ज्या विलासराव देशमुखांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणलं त्यांच्याचविरोधात राणेंनी आघाडी उघडली. ही बाब काँग्रेस पक्षश्रेष्ठी पाहत होतेच.
2009मध्ये पुन्हा काँग्रेस आघाडी सत्तेत आल्यावर राणेंना उद्योग खातं मिळालं. याच दरम्यान सोनिया गांधी, अहमद पटेल, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करून राणेंनी हायकमांडची खप्पामर्जी ओढावून घेतली.
2014नंतर फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि राणेंच्या त्यांच्यासोबत भेटी झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. सरकारच्या काही कार्यक्रमातही राणे दिसले. काँग्रेस पक्ष याची दखल घेत होताच.
मात्र, सिंधुदुर्गातल्या जिल्हा परिषदेत राणेंनी काँग्रेस सदस्यांचा स्वतंत्र गट बनवणं, ही उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरली, आणि काँग्रेसनं ही समितीच बरखास्त केली. अपेक्षेप्रमाणे, राणेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर आगपाखड केली.
यावेळी काँग्रेसही मागे हटणार नाही हे स्पष्ट झालं. राणे आता भाजपच्या जवळ गेले आहेत. ते त्यांच्या राजकीय कारकिर्दीतलं आणखी एक वळण ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याची नसली, तरी किमान कोकणातली राजकीय गणितं बदलू शकतील.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)