विकलांग आणि बायसेक्शुअल चार्लीच्या प्रेमाच्या शोधाची गोष्ट

महिला Image copyright CHANNEL 4
प्रतिमा मथळा शरीराने विकलांग आणि लैंगिकदृष्ट्या उभयलिंगी असलेली चार्ली पायपर आजही खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे.

आईच्या पोटी एकाच वेळी जन्मलेल्या चार बाळांपैकी एक आणि सेरेब्रल पाल्सीनं आलेली विकलांगता हीच आयुष्यभरासाठी ओळख असलेली चार्ली पायपर बायसेक्शुअल आहे.

'पण माझी ही ओळख प्रेमाच्या आड का यावी?' असा तिचा सवाल आहे. 'अनडेटेबल्स' या टीव्ही शोमध्ये ती सहभागी झाली होती. तिने सांगितलेली आत्मकथा तिच्याच शब्दांत....

'अनडेटेबल्स' हा 'यूके'च्या 'बीबीसी चॅनेल फोर' वरील प्रसिद्ध कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात विशेषतः विकलांग अथवा एखाद्या दुर्मिळ शारीरिक व्याधीनं ग्रस्त लोक सहभागी होतात.

ऐन विशीतील चार्ली पायपर त्या वयात सहाजिकच प्रेमाच्या शोधात आहे. आत्तापर्यंतच आयुष्य तिनं विकलांगतेने आलेल्या न्यूनगंडात घालवलं.

आपण अपंग आहोत, बायसेक्शुअल आहोत, म्हणून आपल्याला प्रेमाचा अधिकार नाही का? याच विचारातून तिनं या टीव्ही डेटिंग शो 'अनडेटेबल्स'मध्ये भाग घेण्यासाठी अर्ज केला.

अनडेटेबल्स हा 'डेटिंग रिअॅलिटी शो' असल्यानं अशा विशेष व्यक्तिमत्त्वांना प्रेमात पडण्याची संधी मिळते. आयुष्यभर मिळालेल्या वेगळेपणाच्या भावनेमुळं दूर राहिलेलं प्रेम त्यांना या कार्यक्रमातून मिळवता येऊ शकतं.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या चार्ली पायपरची ही कथा...

'मी सगळ्यांचा तिरस्कार करायचे'

मला माझ्या आजच्या ओळखीसाठीचा अभिमान नाही खरं तर माझ्यात साधा आत्मविश्वासही नव्हता. पौगंडावस्थेत असताना तर मी माझ्या या ओळखीचा तिरस्कारच करायचे.

Image copyright CHARLEY PIPER
प्रतिमा मथळा त्या वेळी माझ्या बहिणींना बॉयफ्रेंड होते. मात्र बॉयफ्रेंड नसल्याचं दुःख होतं.

सेरेब्रल पाल्सी म्हणजे आयुष्यभर मी व्हीलचेअरवरच राहणार. त्यामुळे त्या उमलत्या वयात मी जगाचा आणि जगातल्या साऱ्यांचाच तिरस्कार करायचे.

माझ्या आईला एकाच वेळी झालेल्या चार बाळांपैकी मी एक. तीन मुली आणि एक मुलगा. माझा भाऊ 10 महिन्यांचा असतानाच वारला, पण आमची ओळख मात्र तशीच राहिली.

बॉयफ्रेंड नसल्याचं दुःख

सर्वसाधारण शाळेत माझ्या दोन्ही बहिणींना मित्रपरिवार होता. अगदी त्यांचे बॉयफ्रेंड्सही होते. मी फक्त त्यांचा समवेत फिरणारी एक आगंतुक असायचे.

मी स्वतःबद्दल जरा जास्तच कॉन्शस असल्यानं दोन सख्ख्या समवयस्क बहिणींच्या फार जवळ नव्हते. माझ्या मित्रांची संख्याही कमीचं होती आणि ज्यांच्याकडे मी रहायला जाऊ शकेन, अशा मित्रांची संख्या तर नगण्यच.

पण जेव्हा मी 17 वर्षांचे झाले, तेव्हा मात्र परिस्थिती बदलू लागली. मी स्वतःला सर्वांपासून अलग केलं होतं.

घरापासून 3 तास अंतरावरील हेरवर्ड कॉलेज या अपंगासाठीच्या संस्थेत मी प्रायोगिक कला शिकण्यासाठी प्रवेश घेतला.

खरं सांगायचं, तर मी तिथे अगदीच नवखी आणि माझ्या अस्तित्वाला काहीच महत्त्व नव्हतं.

Image copyright CHANNEL 4
प्रतिमा मथळा दिव्यांग असल्याचा शिक्का आयुष्यावर कोरला असल्यानं त्या काळी उभयलिंगी असल्याचा शिक्का नकोसा झाला होता.

मी आणि माझ्या बहिणी समवयस्क आहोत. पण समाजात वावरायच्या आत्मविश्वासाच्या बाबतीत मी त्यांच्यापेक्षा कैक वर्षं मागे होते. त्या आणि माझ्या आजूबाजूचे सगळे धडधाकट लोक मला सामावून घ्यायचे, समजून घ्यायचे पण मी नेहमीच स्वतःला त्यांच्यापेक्षा वेगळं मानलं.

माझ्यातील सामान्यपण शोधण्यासाठी मला बरीच वर्षं लागली. मी जेव्हा कॉलेजमध्ये आले तेव्हा मला मी पण नॉर्मल माणूस आहे, हे पटलं. मी किती सहजपणे आणि लवकर स्थिरावले, याचं आता मलाच आश्चर्य वाटते.

कॉलेजच्या पहिल्या वर्षी इतर विद्यार्थ्यांसारखी कॉलेजनजीक माझी एक रूम होती. दुसऱ्या वर्षी मला एक ट्रेनिंग फ्लॅट देण्यात आला. यात मला माझं किचन, बेडरूम आणि लाऊंज यांचा बोनस मिळाला होता.

मला आवश्यक असलेलं स्वातंत्र्य या फ्लॅटमध्ये मिळालं. मी या स्वातंत्र्यावर प्रेम करत होते.

मला माझा आत्मविश्वास नव्यानं गवसला होता. माझे खास म्हणता येतील असे मित्र आणि अगदी बॉयफ्रेंडही होता.

या वयातल्या इतर मुलांसारखं माझं 3-4 वेळा ब्रेकअप झालं तेव्हा मला फक्त आत्मविश्वासच नाही तर इतरही बरंच काही मिळालं होतं.

स्वतःशी नव्यानं ओळख झाली

मला नवे मित्र मिळाले, तशा मैत्रिणीही. खास मैत्रिणी. ज्या मुलींचा शाळेत मी हेवा करत होते, अशा त्या मुली होत्या.

मला याबाबत कोणी प्रश्न विचारले, तर मी हसून सोडून द्यायला लागले.

शाळेत असताना इतर मुली मला जास्त सुंदर वाटायच्या. या मुली स्वतःच्या पायावर उभ्या होत्या. माझ्यासारख्या किशोरवयीन विकलांग मुलीला त्यांचा हेवा वाटला नसता तरच नवल!

मी बायसेक्शुअल आहे, याची जाणीव त्यानंतर झाली. पण या लैंगिकतेच्या लेबलशी लढणं मात्र फारच त्रासदायक होतं.

मला माहीत असलेल्या आणि मी प्रेम करत असलेल्या कुणालाच, याची तशी काळजी नव्हती. माझ्यासाठी मात्र हे नवं संकटच होतं.

आयुष्यभरासाठी मी आता कुठे स्वीकारलं होतं. आणखी एक लेबल माझ्यासाठी जास्तच जड जाणारं होतं. मला माझ्या कपाळावर आणखी एक शिक्का नको होता. थँक यू, पण एकच फार जास्त होता.

थोडीशी बंडखोरी

घरापासून दूर रहायला मिळाल्यानं मला स्वतः काही प्रयोग करून बघण्याची संधी मिळाली. या प्रयोगाचे थोडेफार पडसाद उमटलेही असते किंवा नसतेही.

कॉलेजमध्ये काही हाऊस पार्टीज व्हायच्या, तिथे दारूही असायची. षोडश वयातील बंडखोरी म्हणा हवं तर. मी मला हवं ते सगळं करून बघितलं.

कॉलेजच्या त्या दोन वर्षांत मला माझ्या कल्पनेपेक्षा जास्त अनुभव मिळाले. या विशेष कॉलेजनं मला आयुष्याबद्दल बरंच काही शिकवलं.

मला बहिणींच्या समाजात वावरण्याच्या आत्मविश्वासाच्या थोडं जवळ पोहचल्याचं वाटत होतं. पण त्यांची कौशल्यं येण्यासाठी माझी कौशल्यं सोडण्याची गरज नव्हती.

निवासी कॉलेजनं माझ्यात काही चांगल्यासाठी बदल घडवले. मी माझं नवखेपण टाकून दिलं होतो.

विकलांग, बायसेक्शुअल तरीही आत्मविश्वास असलेली मुलगी ही नवी ओळख मी जवळ केली.

मी आणि माझ्या बहिणी आता मोठे झाले आहोत. आम्ही आमचं आयुष्य स्वतः घडवत आहोत.

बायसेक्शुअल असल्याची जाणीव

माझी बहीण जॉर्जिया स्ट्रेट आहे, तर फ्रॅंकी गे आहे. आमचं 15 वर्षांच्या असताना फ्रँकी बायसेक्शुअल असल्याची तिला जाणीव झाली आणि तिनं तसं जगजाहीर केलं. तेव्हा मी माझ्या लैंगिकतेबद्दल स्वतःला प्रश्न विचारत होते.

फ्रँकी आता आता पूर्णपणे लेस्बियन आहे. मला त्या वेळी माझ्या लैंगिकतेची जाणीव झाली होती, तरी फ्रँकीची कॉपी करायची नाही म्हणून मी शांत राहिले.

तब्बल 11 वर्षांनंतर जेव्हा माझं वय 26 होतं तेव्हा मी माझ्या कुटुंबियांना मी बायसेक्शुअल असल्याबद्दल सांगितलं.

Image copyright CHARLEY PIPER

माझ्या बहिणी त्यांच्या रिलेशनशिपमध्ये आनंदी आहेत आणि ते किती सुंदर आहे. आता इतक्या वर्षांनंतर मी इथे आहे, जगाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले आहे.

तरीही गेली 4 वर्षं मी सिंगल आहे. डेटिंग किंवा संभाव्य जोडीदार शोधण्याच्या विचाराची सुरुवात करणं माझ्यासाठी तसं सोपं नव्हतं. तसं करणं म्हणजे जगाला विचारावं लागणार. मग मी विचार केला - हे टेलिव्हाईज का करू नये?

म्हणून मी चॅनल 4 च्या 'अनडेटेबल्स'साठी अर्ज केला. हे सगळं अनिश्चित आहे, पण माझ्याकडे गमावण्यासारखं आता काही नाही. जे काही आहे ते मिळवण्यासारखंच आहे.

या कार्यक्रमात सहभागी स्पर्धकांनी मला हवा असलेला आत्मविश्वास दिला आहे. हा आत्मविश्वास फक्त रोमॅंटिकदृष्ट्याच नाही तर इतर दृष्टीनेही उपयुक्त आहे.

प्रेमाच्या माझ्या अनुभावावर आधारलेलं एक पुस्तक मी लिहित आहे आणि त्यासाठी प्रकाशक शोधते आहे.

समाज जुन्या पद्धतीच्या प्रेमाला फारच गृहित धरतो. पण माझ्यासाठी मी आहे तशीच परफेक्ट आहे. जाता जाता एक सांगते - लाल केसांच्या व्यक्ती मला जास्त भावतात. तो मिस्टर राईट असो किंवा मिस राईट!

(प्रोड्युसर :बेथ रोज )

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्ट्रागाम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)