अन्यायकारक कराचा निषेध म्हणून नांगेलीनं कापले स्वतःचे स्तन

मुरलीचे चित्र Image copyright Murali T

स्तनांवर लावलेल्या अन्यायकाराक कराविरूद्ध बंड करणाऱ्या एका दलित महिलेची ही कहाणी कदाचित जगाला कधीच कळाली नसती जर या कलाकारानं त्या कहाणीला चित्ररूप दिलं नसतं.

नांगेलीची कथा योगायोगानेच समोर आली. चार वर्षांपूर्वी कलाकार मुरली टी एका स्थानिक बॅंकेचं मासिक सहज चाळत होते. तेव्हा त्यांना केरळमधल्या चेरथला गावातल्या एकानं त्या दलित स्त्रीसंदर्भात लिहिलेला एक छोटा लेख दिसला.

त्या लेखाने त्यांचं कुतूहल चाळवलं. त्यांनी छोट्याशा आणि निवांत अशा चेरथला गावाला जायचं ठरवलं.

"मी तिथे स्थानिकांबरोबर खूप वेळ घालवला. मला ती जागाही सापडली जिथे नांगेली शंभर वर्षांपूर्वी राहात होती असं म्हणतात", मुरली यांनी 'बीबीसी'शी बोलताना सांगितलं.

"नांगेली राहायची त्या गावाला मुलाच्छीपुरम किंवा स्तन असणाऱ्या स्त्रियांचा प्रदेश असं नाव दिलं आहे. स्तनांवर लादलेल्या कराविरुद्ध नांगेलीने आवाज उठवला आणि जे बलिदान दिलं त्याची आठवण म्हणून हे नाव दिलं आहे," मुरली सांगतात.

ही ती लोककथा आहे जिचा भारताच्या इतिहासात कागदोपत्री कुठेही उल्लेख नाही. पण मुलाच्छीपुरमच्या गावकऱ्यांना मात्र नांगेलीचा अभिमान आहे. मुरलींची इच्छा आहे की, या कथेचा ऐतिहासिक दस्तावेजात समावेश व्हावा आणि केरळ सरकारने या घटनेचा राज्याच्या इतिहासात समावेश करावा.

प्रतिमा मथळा नांगेलीच्या गावाला मुलाच्छीपुरम किंवा स्तन असणाऱ्या स्त्रियांचा प्रदेश असं नाव दिलं आहे.

ब्रिटिशकालीन त्रावणकोर संस्थानाच्या तत्कालीन राजानं 'स्तनांवर' कर लादला होता. दलित महिलांना त्यावेळी आपले स्तन झाकायची परवानगी नव्हती. जर त्यांना स्तन झाकायचेच असतील, तर त्यांना मोठ्या प्रमाणावर कर भरावा लागे.

का होता स्तनांवर कर?

केरळच्या श्री शंकराचार्य संस्कृत विद्यापीठात लिंगव्यवस्था आणि दलित विषयांचे अभ्यासक असणारे डॉ. शीबा के एम सांगतात, "स्तनांवरच्या कराचा मुख्य उद्देश जातीव्यवस्थेचा वरचष्मा कायम ठेवणं हा होता." त्या वेळेच्या चालीरीती जातीव्यवस्थेला धरून असायच्या. माणसाच्या कपड्यांवरून त्याची जात ओळखण्याचा तो काळ होता.

नांगेली एझावा जातीची होती. तिच्या जातीतल्या महिलांनादेखील थिया, नाडर आणि इतर दलित स्त्रियांप्रमाणे स्तनांवरचा कर भरावा लागे. गावातले लोक सांगतात की, तिने या कराविरूद्ध बंड केलं आणि कर न भरताच आपले स्तन झाकायचं ठरवलं.

आमचा रिक्षावाला, मनमोहन नारायणने आम्हाला नांगेली राहायची त्या भागात नेलं. "जेव्हा कर जमा करणाऱ्या सरकारी माणसाला कळलं की, तिने कर न भरताच आपले स्तन झाकायला सुरुवात केली आहे, तेव्हा त्याने तिच्याकडे कराची मागणी केली. त्यानं नांगेलीला सांगितलं की, कर भरलेला नाही म्हणजे ती कायदा मोडते आहे. तेव्हा या कराचा निषेध करण्यासाठी तिने आपले स्तनच कापून टाकले," असं मनमोहन नारायणननं आम्हाला सांगितलं.

गावकऱ्यांच्या मते, अतिरिक्त रक्तस्रावाने नांगेलीचा मृत्यू झाला. हा धक्का पचवणं तिच्या नवऱ्यासाठी फार कठीण झालं आणि त्यानेदेखील तिच्या चितेत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांना कोणी मूलबाळ नव्हतं. तिच्या नातेवाईकांनी मुलाच्छीपुरम सोडलं आणि ते आसपासच्या गावांमध्ये स्थायिक झाले.

बलिदान व्यर्थ नाही

नांगेलीच्या बलिदानाविषयी फारसं कोणाला माहिती नाही याचं तिच्या वंशजांना वाईट वाटतं. मणियन वेलुला - नांगेलीच्या चुलत भावाचा पणतू - म्हणाला, "नांगेलीने त्रावणकोरच्या महिलांसाठी बलिदान दिलं. तिच्या बलिदानानं राजाला हा अन्यायकारक कर मागे घेण्यास भाग पाडलं."

Image copyright Murali T
प्रतिमा मथळा नांगेलीच्या कहाणीला लोकांसमोर आणण्यासाठी एक चित्रकार प्रयत्न करत आहे.

आज म्हाताऱ्या मणियन यांच्याकडे स्वतःची जमीन नाही. त्यांची मुलं शेतमजूर म्हणून काम करतात. पण त्यांना दयेची भीक नको आहे. काय घडलं याची दखल घेतली जावी एवढीच त्यांची अपेक्षा आहे.

"नांगेलीच्या परिवाराचा आम्ही एक भाग आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जास्तीत जास्त लोकांना तिच्या बलिदानाविषयी कळावं इतकीच आमची अपेक्षा आहे. तिचं नाव इतिहासात असायला हवं", मणियन म्हणतात.

नांगेली इतिहासात यायला हवी

मुरली टी हे घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नांगेलीच्या कहाणीने ते इतके हेलावले की, त्यांनी तिची कथा चित्ररूपात मांडायच ठरवलं.

"मला कुठलीही रक्तरंजित गोष्ट चितारायची नव्हती. उलट तिच्या बलिदानाचं उदात्तीकरणं करणं हा माझा उद्देश होता, ज्यामुळे सगळ्यांना प्रेरणा मिळेल", मुरली म्हणाले.

त्यांनी काढलेली नांगेलीची चित्रं त्यांच्या 'Amana - The Hidden Picture of History' या पुस्तकात प्रकाशित झाली आहेत. त्यांनी या चित्रांची 15 प्रदर्शनंही आजवर केरळमधे आयोजित केली आहेत आणि चेरथलात अजून एक सार्वजनिक प्रदर्शन आयोजित करण्याचा त्यांचा विचार आहे.

"मी जर या विषयाकडे लोकांचं लक्ष वेधू शकलो तर कदाचित सरकारही या कथेला अधिकृत इतिहासात समाविष्ट करण्याचा विचार करेल," मुरली यांना आशा आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)