'महिला अर्ध्या डोक्याच्या असतात'? सौदीच्या धर्मगुरूंची मुक्ताफळं

सौदी अरेबियाच्या महिला अधिकाऱ्यांवर जानेवारीत एक गाणं व्हायरल झाल होतं Image copyright FAYEZ NURELDINE
प्रतिमा मथळा सौदी अरेबियाच्या महिला अधिकाऱ्यांवर जानेवारीत एक गाणं व्हायरल झाल होतं

"महिला गाडी चालवण्याच्या लायकीच्या नसतात कारण त्या अर्ध्या डोक्याच्या असतात," असं बोलून सौदी अरेबियाचे एक धर्मगुरू चांगलेच फसले आहेत.

शेख़ साद अल-हिजरी हे सौदी अरेबियाच्या असिर प्रांताचे फतवा प्रमुख आहेत. 'द इविल्स ऑफ वुमेन ड्रायविंग' या चर्चासत्रात बोलताना अल-हिजरी म्हणाले, "महिलांकडं फक्त अर्ध डोकं असतं, आणि त्यातही सारखी शॉपींग करून त्या अर्ध्याचंही अर्ध होतं."

त्यांच्या या वक्तव्याचा व्हीडियो सौदी अरेबियाच्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. तसेच त्यावर भरपूर चर्चाही झाली.

यानंतर मात्र त्यांच्या धार्मिक उपदेशांवर आणि अन्य धार्मिक घडामोडींवर ताबडतोब बंदी घालण्यात आली.

सौदी अरेबियात महिलांच्या गाडी चालवण्यावर बंदी आहे. यावरून तिथं मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शनंही झाली आहेत.

सोशल मीडियावर विरोध

सोशल मीडियावर धर्मगुरूंच्या वक्तव्याला चोख प्रत्युत्तरही मिळालं. 'महिलांकडं अर्ध डोकं असतं', असा अरेबिकमधून हॅशटॅग 24 तासांत तयार होऊन तब्बल 1.19 लाख ट्वीट झाले.

ट्विटरवर शिक या ट्विटरकरानं लिहीलं, "देवा शप्पथ सांगतो. खरंतर तुमचंच अर्ध डोकं आहे, म्हणूनचं तुमच्यासारखी लोकं असा कट्टर विचार माडतात. महिलाच पुरुषांना मोठं करतात आणि पुरुषांच्या यशामागंही त्याच असतात."

Image copyright 8IES
प्रतिमा मथळा सौदी अरेबियातल्या महिला.

साद यांच्यावर बंदी घालून काही फायदा होणार नाही असं एक ट्विटर युजर म्हणतो. "असे काळ्या दाढीवाले भरपूर आहेत. तेच असं बिनडोक फतवे काढतात."

दुसरीकडे सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्याचं समर्थनही दिसून आलं. "साद महिलांच्या बरोबरही नाहीत आणि विरोधातही नाहीत", असा अरेबिक हॅशटॅग 24 तासांत 20 हजार वेळा ट्वीट झाला.

Image copyright FAYEZ NURELDINE
प्रतिमा मथळा शेख़ साद अल-हिजरी

अब्दुल रहान अहमद असिरी यांच्या ट्वीट केलं - "शेख साद-अल हिजरी यांना आमच्या आई-बहिणींची काळजी आहे. त्याच्यावर बंदी घालण्यासारखं काहीही चुकीचं ते बोलले नाहीत. असिरचे गवर्नर, जरा देवाला घाबरा. धर्मनिरपेक्षतेचं पांघरून घेऊ नका," असं लिहीलं आहे.

असीर प्रांताच्या प्रवक्त्यानुसार साद यांच्यावरील भाषणबंदी ही केवळ व्यासपीठांवरून समाजात वाद निर्माण करणाऱ्या मुद्द्यांपुर्तीच मर्यादीत आहे, असं सांगण्यात आलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)