केवळ मुस्लीमच नव्हे, रोहिंग्या हिंदूंचंही म्यानमारमधून स्थलांतर

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
म्यानमारच्या राखाइन प्रांतातून पलायन केलेल्या रोहिंग्या हिंदूपैकी अनिता एक आहे.

फक्त रोहिंग्या मुस्लीमच नाहीत तर रोहिंग्या हिंदूंनासुद्धा म्यानमारमधून पलायन करावं लागत आहे. राखिन प्रांतात त्यांच्यावरसुद्धा अत्याचार होत असल्याचं त्याचं म्हणणं आहे.

संध्याकाळची वेळ आहे आणि बांगलादेश-म्यानमार सीमेवरच्या एका गावातली लोकं जेवणाच्या हंडीवर लक्ष ठेवून आहेत. मुलांच्या चेहऱ्यावर जास्त उत्साह दिसून येत आहे. कारण त्यांना सर्वांत आधी जेवण मिळणार आहे.

शेजारीच असलेल्या हातपंपावर पाणी भरण्यासाठी लोक रांगेत उभे आहेत. पण, रांगेपासून थोड्याशा अंतरावर एक गरोदर महिला धीरगंभीर मुद्रेत बसून आहे.

अनिता धर हिचं वय फक्त 15 वर्षं आहे. पण, तिच्याकडे पाहून असं वाटतं आहे की, या 15 वर्षांत तिनं आयुष्यात सगळं काही पाहिलं आहे. तिच्याबरोबर झालेल्या बोलण्यातून तिनं भोगलेल्या यातनांचा अंदाज येतो.

कापऱ्या आवाजात अनिता सांगते, ''काही लोकं आमच्या घरात आले. त्यांनी चेहऱ्याला काळे रूमाल बांधलेले होते. त्यांनी घराची नासधूस केली आणि माझ्या नवऱ्याला उचलून घेऊन गेले."

"दुसऱ्या दिवशी शेजारच्या जंगलात त्याचा मृतदेह मिळाला. त्याचं शीर आणि हात कापलेले होते. पोटात असलेल्या बाळाचा विचार न करता मी तिथून धावत सुटले. तीन दिवस जंगलात उपाशीपोटी फिरत-फिरत शेवटी इथं पोहोचले.''

अनिताचे पती व्यवसायानं न्हावी होते. 2016 मध्ये त्यांचं लग्न झालं होतं.

प्रतिमा मथळा म्यानमारमधून 550 हिंदू लोक पळून आलेत.

अनिता प्रमाणे इतर 160 रोहिंग्या हिंदू कुटुंब म्यानमार सोडून बांगलादेशातल्या कॉक्स बाजारच्या कुतुपालोंग परिसरात पोहोचले आहेत.

मुस्लिमांप्रमाणे हिंदूंचेही हाल

म्यानमारच्या राखिन प्रांतात रोहिंग्या मुस्लीमांप्रमाणे हिंदू लोकंही राहतात. साडे चार लाख रोहिंग्या मुस्लिमांप्रमाणेच दीड महिन्यांपूर्वी हिंदूसुद्धा बांगलादेशात पळून आले आहेत.

रोहिंग्या मुस्लिमांप्रमाणेच अल्पसंख्याक असलेल्या हिंदूकडे सुद्धा म्यानमारचं नागरिकत्व नाही.

शोभा रूद्रची कहाणी

प्रतिमा मथळा शोभा रूद्र, रोहिंग्या हिंदू

550 हिंदू लोकांपैकी बहुतेकांचं म्हणणं आहे की त्यांनी वांशिक हिंसाचारामुळेच पलायन केलं आहे.

शोभा रूद्र सुद्धा या शरणार्थींपैकीच एक आहेत. पण, त्यांच्या चेहऱ्यावर थोडसं समाधान आहे. कारण त्यांच्यासोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब पळून येण्यात यशस्वी झालं आहे.

त्या सांगतात,"सुखी कुटुंब होतं आमचं. माझ्या काकांच्या घरावर हल्ला झाला आणि त्यांना गोळी मारण्यात आली. बलात्कार करून माझ्या चुलत बहिणीला मारून टाकण्यात आलं."

"त्यांनतर आम्हाला पळून यावं लागलं. ते सर्व इतकं भयंकर होतं की, आता आम्ही कधीच तिथं परत जाणार नाही. इथं निदान आम्हाला शांततेनं जगता तरी येत आहे. इथं कुणी आमच्यावर तुटून पडत नाही."

हिंदूंनी दिला हिंदूंना आश्रय

प्रतिमा मथळा स्थानिक अल्पसंख्याक हिंदू

बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमावर्ती भागात बांगलादेशच्या हद्दीत 25 हिंदू कुटुंब राहतात. त्यांनी या शरणार्थींना आश्रय दिला आहे.

पण, या स्थानिक अल्पसंख्याक हिंदूंची परिस्थिती फार काही चांगली नाही. काही संस्थांच्या मदतीनं गावातल्या 'मुर्गी फार्म'वर त्यांनी शरणार्थींसाठी एक कॅम्प उभारला आहे.

सकाळ-संध्याकाळ इथं जेवण बनवलं जातं आणि शरणार्थींना वाढलं जातं. कॅम्पच्या चारही बाजूला असलेल्या घरांमध्ये महिला आणि मुलांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

बाबुल यांचा मोठेपणा

प्रतिमा मथळा बाबुल यांनी पाच शरणार्थींना त्यांच्या घरात आश्रय दिला आहे.

याच गावात जन्मलेल्या बाबुल यांच्या कुटुंबात चार जण आहेत. तरीसुद्धा त्यांनी पाच शरणार्थींना त्यांच्या घरात आश्रय दिला आहे.

त्यांनी सांगितलं, "ही लोकं बेघर आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. माझ्याकडे स्वत:ची जमीन नाही. त्यामुळे मी त्यांना घर बनण्यासाठी जागा देऊ शकत नाही. म्हणून मग मी त्यांना माझ्या घरातच आश्रय दिला."

शरणार्थींना इथं पोहचायला बरेच दिवस लागले आहेत. आपलं घर सोडल्यापासून ते पोरके झाले आहेत.

पण, आता एका अनोळखी देशात त्यांना आश्रय मिळाला आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)