जागतिक रेडिओ दिवस- वेणूताई चितळे : 1942 मधला बीबीसी मराठीचा पहिला आवाज

  • जान्हवी मुळे
  • बीबीसी मराठी
व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ : बीबीसी रेडिओवर मराठीतून पहिल्या बातम्या 1942 मध्ये प्रसारित झाल्या होत्या.

आज जागतिक रेडिओ दिवस. त्यानिमित्तानं 1942 मधील 'बीबीसी'तला पहिला मराठी आवाज ठरलेल्या वेणू चितळे यांची कहाणी.

कधी-कधी काळाचा पडदा थोडासा सरकतो, त्या आडून एखादा हसरा चेहरा डोकावतो, एक मधुर आवाज तुमच्या कानावर पडतो आणि थक्कच करून जातो...

वेणू चितळे हे असंच एक प्रभावी व्यक्तिमत्त्व. 1942 मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान बीबीसीनं मराठीतून प्रसारण सुरू केलं होतं. तेव्हा वेणू चितळे लंडनहून मराठीत आणि इंग्रजीतही बातम्या द्यायच्या.

सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीच्या काळात एका मराठी मध्यमवर्गीय मुलगी शिक्षणासाठी परदेशात जाते, बीबीसीसाठी वृत्तनिवेदन आणि वार्तांकन करू लागते, तेही युद्ध ऐन भरात असताना... हे सारंच आज रोमांचक वाटतं.

पण वेणूताईंचं आयुष्य अशा अशक्य वाटणाऱ्या गोष्टींनी भरलं होतं.

आईविना वाढलेली लेक

वेणूताईंचा जन्म सालचा. वेणू जेमतेम सहा वर्षांची असताना त्यांच्या आईचं निधन झालं. त्यानंतर मोठ्या भावंडांनीच त्यांचा सांभाळ केला.

आधी पुण्यात हुजूरपागा आणि मग मुंबईला सेंट कोलंबा शाळेत वेणूताईंचं शिक्षण झालं.

फोटो कॅप्शन,

मराठीचं बीबीसीशी नातं नवं नाही. पुण्याच्या वेणू चितळे यांच्या रूपानं बीबीसी आणि मराठीचा ऋणानुबंध जुळला होता.

वेणूताईंचं कुटुंब परंपरा जपणारं पण पुढारलेल्या विचारांचं होतं. कॉम्रेड विष्णू (भाई) चितळे आणि चितळे अॅग्रो प्रॉडक्ट्सची स्थापना करणारे श्रीकृष्ण चितळे हे त्यांचे बंधू.

साहजिकच त्या काळातही वेणूताईंच्या शिक्षणाला घरून प्रोत्साहनच मिळालं.

शिक्षणासाठी इंग्लंडला प्रस्थान

मुंबईच्या सेंट कोलंबा शाळेतच वेणूताईंना एक जीवाभावाची मैत्रीण मिळाली - जोहाना अॅड्रियाना क्विन्टा ड्यू प्री म्हणजेच क्विनी.

क्विनी खरं तर वेणूताईंची शिक्षिका, पण दोघींच्या वयांत फारसं अंतर नव्हतं.

क्विनीच्या सल्ल्यानंच वेणूताईंनी पुढे शिकण्याचं ठरवलं आणि विल्सन कॉलेजलाही अॅडमिशनही घेतली. पण याचदरम्यान वेणूताईंच्या घरी त्यांच्या लग्नाविषयी चर्चा होऊ लागली.

वेणूताईंच्या कन्या ज्योत्स्ना दामले आपल्या आईच्या आठवणी सांगतात, "एका ज्योतिषानं 'हिचं लग्न बहिणीसाठी त्रासाचं ठरेल' असं भाकित केलं. तेव्हा बहिणीवरच्या प्रेमापोटी तिनं लग्नच न करण्याचा निर्णय घेतला."

लग्न नाही करायचं, तर पुढे काय? असा प्रश्न उभा राहिला.

तेव्हा क्विनीनं तरुण वेणूला इंग्लंडला नेण्याची तयारी दाखवली. घरच्यांनीही विरोध केला नाही.

क्विनीनं वेणूताईंना पाश्चात्य संस्कृतीची ओळख करून दिली, पण त्यांची भारतीय मुळं जपण्याचाही सल्ला दिला.

इंग्लंडमध्ये प्रदीर्घ वास्तव्य

१९३४ साली वेणू इंग्लंडला रवाना झाल्या. तिथं त्यांनी आधी माँटेसरीचा कोर्स केला आणि मग लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्येही दाखल झाल्या.

पण याच सुमारास दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. मग भारतात परतण्याऐवजी वेणूताईंनी इंग्लंडमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला.

फोटो स्रोत, NANDINI APTE

फोटो कॅप्शन,

बीबीसीच्या ईस्टर्न सर्व्हिसनं भारतीय भाषांत प्रसारण सुरू केलं. त्यात वेणू चितळे या मराठी विभागासाठी काम करीत असत.

वेणूताईंवर दीर्घ अभ्यास आणि लेखन करणाऱ्या डॉ. विजया देव यांनी त्याविषयी अधिक माहिती दिली.

"त्यांच्या या निर्णयामागचं कारण काही पत्रांतून स्पष्ट होतं. ज्या देशानं आपल्याला नवी दिशा दिली, त्या लोकांचं आपण काही देणं लागतो, या भावनेतून वेणूताईंनी स्वयंसेवक म्हणून काम करण्याचं ठरवलं. तेही साडी, गमबूट आणि वर जड हेल्मेट अशा अवतारात."

"त्या काळात वेणूताई अधूनमधून भाषांतराचं कामही करत असत. त्यांचा एक लेख पाहून माहिती मंत्रालयातील अधिकाऱ्यानं वेणूताईंना बीबीसीमध्ये धाडलं."

१९४० साली वेणूताई बीबीसीमध्ये दाखल झाल्या. आवाज, बोलण्याची आणि लिहिण्याची शैली पाहून वेणूताईंना लगेचच प्रसारणाचं काम देण्यात आलं

१९४२-४३ दरम्यान बीबीसीच्या ईस्टर्न सर्व्हिसनं अनेक भारतीय भाषांत प्रसारण सुरू केलं. त्यात मराठीचाही समावेश होता. वेणूताई प्रामुख्यानं याच विभागासाठी काम करत असत.

जॉर्ज ऑरवेलकडून कौतुक

प्रख्यात लेखक जॉर्ज ऑरवेल या विभागाचे प्रमुख होते. वेणूताईंचं वृत्तनिवेदन, इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व याचं त्यांनीही कौतुक केलं आहे.

ऑरवेलसह टी. एस. इलियट, मुल्कराज आनंद, बलराज सहानी, प्रिन्सेस इंदिरा कापुरथळा, झेड. ए. बुखारी अशा मातब्बरांसोबत काम करण्याची संधी वेणूताईंना मिळाली.

बीबीसीवरून प्रसारित होणाऱ्या 'रेडिओ झंकार' या मराठी कार्यक्रमाची आखणी, लेखन, निवेदन, अशी कामं वेणूताई करत असत.

फोटो कॅप्शन,

दुसऱ्या महायुद्धादरम्यान बीबीसीसाठी वेणू चितळे लंडनहून मराठीत आणि इंग्रजीतही बातम्या देत असत.

वेणूताई मराठीतून युद्धाच्या बातम्या देत असत आणि इंग्रजीतूनही वृत्तनिवेदन करत असत. 'इंडियन रेसिपीज', 'किचन फ्रंट' सीरीजद्वारे त्यांनी ब्रिटिशांना भारतीय खाद्यपदार्थांची ओळखही करून दिली.

त्या एक मन लावून काम करणारी, बुद्धिमान, सौम्य मुलगी म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांच्यात एक घरगुतीपणा होता. सर्वांशी त्या खेळीमेळीनं वागत.

राजकीय विचारांच्या बाबतीत त्यांची मतं कोणत्याही एका विचारसरणीकडे झुकलेली नव्हती, असं मुल्कराज आनंद यांनी 'सखे सोयरे' पुस्तकासाठी लेखिका विजया देव यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

इंग्लंडमध्ये असतानाही वेणूताईंना मायदेशातल्या परिस्थितीचीही जाणीव होती. त्यामुळंच वेणूताई इंडिया लीगसाठी काम करू लागल्या.

मातृभूमीची ओढ

व्ही. के. कृष्ण मेनन यांची ही संघटना ब्रिटनच्या नागरिकांमध्ये आणि परदेशातील भारतीयांमध्ये भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रसार करत असे.

त्याशिवाय वेणूताई 'ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्स'मध्येही सहभागी झाल्या. या परिषदेतच वेणूताईंची विजयालक्ष्मी पंडित यांच्याशीही मैत्री जुळली.

फोटो स्रोत, NANDINI APTE

फोटो कॅप्शन,

जोहाना अॅड्रियाना क्विन्टा (क्विनी) ड्यू प्री.‫ म्हणजे क्विनी ही वेणूताईंची शिक्षिका त्यांना लंडनला घेऊन गेली.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर वेणू चितळे मायदेशी परतल्या, त्या कायमच्याच. त्यानंतर वेणूताईंनी दिल्लीत विजयालक्ष्मी पंडित यांची मदतनीस/सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली.

दिल्लीतल्या वास्तव्यादरम्यान वेणूताई फाळणीनंतर पंजाबातून आलेल्या निर्वासित स्त्रिया आणि मुलांच्या छावणीतही काम करत असत.

कादंबरी लेखन

वेणू चितळे यांची पहिली कादंबरी 'इन ट्रान्झिट' ही १९५० साली प्रकाशित झाली. त्या काळात एखाद्या मराठी लेखिकेनं इंग्रजीत लिखाण करणं हेही अप्रूपच होतं.

त्याच वर्षी, ३९ वर्षांची असताना वेणूताईंनी गणेश खरे यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि वेणू चितळेची सौ. लीला गणेश खरे झाली.

गणेश यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यांच्या मुलांनाही वेणूताईंनी आपलंसं केलं.

फोटो कॅप्शन,

१९५० मध्ये वेणू चितळे यांची 'इन ट्रान्झिट' ही कादंबरी प्रसिद्ध झाली.

लग्नानंतरही वेणूताईंनी 'इनकॉग्निटो' ही आणखी एक कादंबरी लिहिली. नवशक्तीसारखी विविध वृत्तपत्रं आणि मासिकांत त्या स्तंभ, लेख लिहित असत. ऑल इंडिया रेडियोवरूनही त्यांच्या काही श्रुतिका प्रसारित झाल्या.

पण बराच काळ घरापासून दूर राहिलेल्या वेणूताईंनी मग घरालाच आपलं विश्व बनवलं आणि संसाराला जास्त प्राधान्य दिलं.

इंग्लंडमधल्या, खास करून बीबीसीमधल्या दिवसांचा मात्र वेणूताईंना कधीच विसर पडला नाही. वेणूताईंची लेक नंदिनी आपटे यांना त्या इंग्लंडमधल्या आठवणी सांगत असत. आईनं सांगितलेल्या आठवणींची उजळणी करताना नंदिनी आपटे म्हणाल्या,

"ऐन युद्धाच्या धामधुमीत इंग्लंडमधलं जीवन सोपं नव्हतं. कधी कधी खंदकात राहून काम करावं लागे, हे ती आम्हाला सांगायची. तिला मोठ्ठ्या आवाजाचा खूप त्रास व्हायचा. दिवाळीतले फटाकेही चालत नसत. कारण ते तिला युद्धाची आठवण करून द्यायचे."

संघर्ष पाहिलेली विदुषी

आयुष्यभर संघर्ष आणि युद्ध पाहिलेल्या वेणूताईंच्या लिखाणात आणि बोलण्यात त्या संघर्षानंच एक वेगळी संवेदनशीलताही आणली.

डॉ. विजया देव यांनी वेणूताईंच्या आयुष्याचं नेमक्या शब्दांत असं वर्णन करून ठेवलं आहे.

"वेणूताईंचा स्वभाव मुद्दाम काही वेगळं करून दाखवायचं असा नव्हता. पण आयुष्याला सामोरं कसं जायचं याचं शहाणपण त्यांच्याकडे होतं. जे वाट्याला आलं, त्याला त्या अतिशय सकारात्मकरित्या सामोऱ्या गेल्या."

"मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. हे असं जगता आलं पाहिजे." डॉ. विजया देव यांनी वेणुताईंबद्दल लिहिलं आहे.

हेही वाचा :

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)