प्रेस रिव्ह्यू : अमेरिका-मेक्सिको सीमेवरील भिंतीच्या तयारीला वेग

पानाचा ठेला Image copyright Getty Images/sanjay kanojia

तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या सर्व दुकानांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करावी असा असा प्रस्ताव केंद्र सरकारने राज्य सरकार समोर ठेवला आहे.

यामुळं पानाच्या दुकानात कोल्ड्रिंक, बिस्किट्स किंवा चॉकलेट इत्यादी गोष्टी विकण्यावर बंदी येऊ शकते.

पानाच्या दुकानात कोल्ड्रिंक किंवा बिस्किट असे पदार्थ ठेवल्यास ज्या लोकांना व्यसन नाही ते लोक देखील तंबाखूजन्य पदार्थांकडे आकर्षित होऊ शकतात.

त्यामुळं तंबाखूजन्य पदार्थांव्यतिरिक्त इतर पदार्थ ठेवण्यावर बंदी व्हावी असा विचार सरकारनं केला आहे. असं आरोग्य मंत्रालयातील अधिकारी अरुण झा यांनी म्हटलं आहे. असं वृत्त हिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे.

नाडेलांकडून आधारचं कौतुक

मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी भारताच्या आधार उपक्रमाचे कौतुक केलं आहे.

आधारची योजनेच्या प्रगतीची तुलना त्यांनी मायक्रोसॉफ्ट, फेसबुक आणि अॅंड्रॉइडशी केली आहे.

'हिट रिफ्रेश' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिमा बदलत आहे असं ते म्हणाले, असं वृत्त बिजनेस टुडेनं दिलं आहे.

Image copyright jitendra tripathi

बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू वादाच्या भोवऱ्यात

विद्यापीठामध्ये मुलींवर लाठीमार झाल्यानंतर सर्व देशाचे लक्ष बनारस हिंदू विद्यापीठाकडे आहे.

या विद्यापीठाचे कुलगुरू गिरीश चंद्र त्रिपाठी यांनी लैंगिक छळ प्रकरणात शिक्षा भोगलेल्या व्यक्तीची वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड करावी अशी शिफारस केल्याचं उघड झालं आहे. यामुळं नवीन वाद निर्माण झाला आहे.

फिजी येथे असताना डॉ. ओ. पी. उपाध्याय यांना मॅजिस्ट्रेट कोर्टाने लैंगिक छळ प्रकरणी शिक्षा ठोठावली होती.

उपाध्याय यांची निवड विद्यापीठ परिसरात असलेल्या रुग्णालयावर वैद्यकीय अधिकारी म्हणून करावी अशी शिफारस त्रिपाठी यांनी केली, असं वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.

Image copyright Getty Images

अमेरिका-मेक्सिको भिंतीच्या कामाचा श्रीगणेशा

बेकायदा निर्वासितांचा लोंढा थांबावा म्हणून मेक्सिकोच्या सीमेवर एक मोठी भिंत बांधू असं आश्वासन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वी दिलं आहे.

ही भिंत बांधण्याच्या कामास सुरुवात झाल्याची घोषणा अमेरिकेनं केली आहे. अमेरिकेच्या कस्टम्स अॅंड बॉर्डर प्रोटेक्शन या कार्यालयान सांगितलं आहे की भिंतीची प्रतिकृतीचं काम आहे सुरू केलं आहे. त्याच आधारावर भिंतीची निर्मिती केली जाणार आहे.

गृहखातं माझ्याकडंच ठेवलं असतं तर बरं झालं असतं

Image copyright INDRANIL MUKHERJEE/getty images

गृहखातं माझ्याकडंच ठेवलं असतं तर गुणात्मक फरक पडला असता असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं असल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

मी देखील देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे गृहखातं माझ्या जवळचं ठेवायला हवं होतं अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)