थायलंड तांदूळ घोटाळा : माजी पंतप्रधान यिंगलक शिनावात्रा यांना कारावास

Yingluck Shinawatra Image copyright AFP

थायलंडच्या माजी पंतप्रधान यिंगलक शिनावात्रा यांच्यावर तांदूळ अनुदान योजनेचा ठपका ठेवत त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

थायलंडच्या सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी निर्णय देताना शिनावात्रा यांना अक्षम्य निष्काळजीपणाबद्दल दोषी ठरवलं.

गुन्हेगारी स्वरूपाच्या निष्काळजीपणाबद्दल पाच वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा त्यांच्या गैरहजेरीत सुनावण्यात आली.

8 अब्ज डॉलरचा फटका

तांदूळ अनुदान योजनेतल्या या गैरव्यवहाराप्रकरणामुळे थायलंडला 8 अब्ज डॉलरचा फटका बसला.

2014 साली थायलंडमध्ये झालेल्या लष्करी उठावानंतर तत्कालीन पंतप्रधान यिंगलक शिनावात्रा यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल झाला. यिंगलक शिनावात्रा यांनी आरोपांचा इन्कार केला आहे आणि निकाल लागण्यापूर्वीच त्या दुबईला फरार झाल्या असं सांगण्यात येतं.

यिंगलक यांच्याबद्दल जनमत विभागलं गेलं आहे. ग्रामीण आणि गरीबांमध्ये त्या अजूनही लोकप्रिय आहेत.

सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की, यिंगलिक यांना हा सगळा प्रकार माहिती असूनही त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं.

"सरकारनं स्वतःलाच तांदूळ पुरवठ्याचं कंत्राट देणं बेकायदेशीर असल्याची आरोपीला जाणीव होती. पण हे थांबवण्यासाठी त्यांनी काहीही केलं नाही," असं कोर्टानं म्हटलं आहे.

कर्तव्यात कसूर

हा बेकायदेशीर मार्गाने फायदा करून घेण्याचा प्रकार आहे. हे कर्तव्यात कसूर करण्यासारखं आहे, असंही कोर्टानं म्हटलं आहे.

खटल्यादरम्यान, आपली बाजू मांडताना यिंगलक यांनी या योजनेच्या दैनंदिन अंमलबजावणीची जबाबदारी आपली नसल्याचा दावा केला होता आणि आपण एका राजकीय षड्यंत्राचा बळी ठरत असल्याचं म्हटलं होतं.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा यिंगलिक यांना गरिबांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा होता.

बॅंकॉकमधील बीबीसीचे प्रतिनिधी जोनाथन हेड म्हणाले, "ही योजना पंतप्रधानांच्या निवडणूक जाहीरनाम्याचा एक भाग होता. जाहीरनाम्यातल्या एखाद्या योजनेबद्दल पंतप्रधानांना दोषी ठरवणाऱ्या या निर्णयामुळे एक विचित्र पायंडा पडला आहे."

यिंगलक यांचा गैरव्यवहारात थेट सहभाग असल्याचं कोणतंही चिन्हं दिसत नाही, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

तांदूळ योजना काय होती?

यिंगलक यांनी 2011 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रं हातात घेतल्यावर ही योजना त्यांनी सुरू केली होती. त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात त्यांनी या योजनेला विशेष महत्त्व दिलं होतं.

ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलनासाठी सरकारने शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा दुप्पट रक्क्म दिली होती.

निर्यातीवर परिणाम

या योजनेमुळे थायलंडच्या तांदूळ निर्यातीवर परिणाम झाला आणि लष्करी राजवटीच्या मते, कमीत कमी 8 अब्ज डॉलरचा फटका बसल्याचं सांगण्यात येतं.

यिंगलक यांची ही योजना ग्रामीण भागात प्रचंड लोकप्रिय असली तरीही ती अत्यंत महागडी होती. तसंच त्या योजनेत भ्रष्टाचार होण्याची पुरेपूर शक्यता होता, असं विरोधकांचं म्हणणं आहे.

आता यिंगलिक कुठे आहेत ?

यिंगलक त्यांचा मोठा भाऊ माजी पंतप्रधान ठकसिन शिनवात्रा यांच्याकडे असल्याचं सांगण्यात येतं. त्यांचा हा मोठा भाऊ 2008 सालच्या एका भ्रष्टाचार प्रकरणापासून पळ काढण्यासाठी भूमिगत झाला असल्याचं बोललं जातं.

भाऊ भ्रष्टाचार प्रकरणात अडकल्यानंतर यिंगलक यांनी राजकारणात प्रवेश केला. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार यिंगलक त्यांच्या फरार भावाची सावली म्हणून वावरत होत्या.

ही दोन्ही भावंडं ग्रामीण भागात आणि गरीब लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. मात्र मध्यमवर्गीय आणि शहरी भागात ते तितकेसे लोकप्रिय नाहीत.

हा खटला सुमारे दोन वर्षं चालला. या खटल्याचा निर्णय ऑगस्ट महिन्याच्या शेवटी अपेक्षित होता. पण यिंगलक यांनी कोर्टात हजेरीच लावली नाही. त्यामुळे खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आणि त्यांच्याविरूद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलं.

घटनाक्रम

  • मे 2011- तांदूळ अनुदान योजना अस्तित्वात आल्यानंतर यिंगलक शिंवात्रा यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली.
  • जानेवारी 2014- थायलंडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी यिंगलक यांची चौकशी केली.
  • मे 2014- आणखी एका प्रकरणात दोषी आढळल्यानंतर थायलंडच्या कोर्टानं त्यांना पदावरून पायउतार होण्यास सांगितलं. त्यानंतर लष्कराने राजवटीचा ताबा घेतला.
  • जानेवारी 2015- लष्करी पाठिंबा असलेल्या संसदेने यिंगलक यांच्यावर महाभियोग चालवला. तांदूळ घोटाळाप्रकरणी त्यांना पदावरून दूर टाकण्यात आलं. त्यामुळे त्यांना राजकारणातून पाच वर्षाची बंदी घालण्यात आली. तसंच त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची सुरुवात केली.
  • ऑगस्ट 2017- यिंगलक यांनी कोर्टात हजर राहण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यांनी आजारी असल्याचं सांगितलं आणि त्या दुबईला निघून गेल्याचं नंतर समजलं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)