जेव्हा भारतीय सैनिकाने 30 वर्षांनंतर अनुभवलं श्रीलंकेतलं युद्ध

निवृत्त मेजर जनरल शौनान सिगं पलाली येथील शांतीसेना स्मृतीस्थळानजीक.
प्रतिमा मथळा चिंतन आणि स्मरण करण्याची वेळ

1987 साली भारताने श्रीलंकेत तामिळ बंडखोरांसोबतच्या शस्त्रसंधीवर लक्ष ठेवण्यासाठी एक शांतीसेना पाठवली होती. पण याची परिणिती भयानक युद्धात झाली. मानवी हक्कांच्या पायमल्लीचे गंभीर आरोपही शांतीसेनेवर झाले. 30 वर्षांनंतर 'बीबीसी हिंदी'चे प्रतिनिधी विनीत खरे यांनी या युद्धात सहभागी झालेले निवृत्त मेजर जनरल शौनान सिंग यांच्यासोबत या लष्करी मोहिमेचा मागोवा घेतला.

"मी पुन्हा इथं येईन असं कधीच वाटलं नव्हतं," शौनान सिंग सांगतात.

सिंग यांची धावती नजर जाफनातील पल्लई लष्करी विमानतळावरील हिरवळीकडे गेली. श्रीलंकेचे लष्करी कर्मचारी आमच्याकडे लांबून पाहतच होते.

"हा परिसर आता बदलेला दिसतो. नवं गेट, कुंपण आणि बांधकामं ही झाली आहेत," ते म्हणाले.

जुलै 1987ला जिथं लष्करी विमानानं त्यांना आणि शेकडो इतर सैनिकांना सोडलं होतं, त्या जागेकडे त्यांनी कुंपणातून पाहिलं.

लिबरेशन टायगर ऑफ तामिळ ईलमला (LTTE) निःशस्त्र करून श्रीलंकेत शांती प्रस्थापित करण्याची जबाबदारी भारताच्या द इंडियन पीसकीपिंग फोर्स (IPKF) या शांतीसेनेवर होती.

पण भारतीय सेना LTTEसोबतच युद्धात ओढली गेली. 1200 भारतीय सैनिक यात मारले गेले.

Image copyright Surender Sangwan
प्रतिमा मथळा 1987 ला जेव्हा श्रीलंकेत पाठवण्यातं आलं तेव्हा शौनान सिंग लष्करात मेजर होते.

या एअरबेसवर या मृत सैनिकांचं स्मारक उभारलं आहे. त्या अस्थिर 32 महिन्यांत सिंग यांनी इथं कर्तव्य बजावलं होतं.

"जेव्हा आम्ही इथं उतरलो तेव्हा श्रीलंकेच्या फौजांनी त्यांची शस्त्रं खाली ठेवली. त्यांना असं वाटलं की आम्ही हल्ला करण्यासाठीच आलो आहोत," सिंग म्हणाले.

"पण आम्ही त्यांना सांगितलं आम्ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी आलो आहोत," सिंग यांनी त्यांची आठवण सांगितली.

पण पुढे असलेले धोके, नकाशे, आवश्यक गोपनीय माहिती, यातील काहीच भारतीय लष्कराला देण्यात आलं नव्हतं.

शांतीसेना 'तारणहार'

1987मध्ये एन. परमेश्वरन विद्यापीठात विद्यार्थी होते. त्यांनी सांगितलं, "जेव्हा शांतीसेना आली, तेव्हा श्रीलंकेतील तामिळांना वाटलं की हे आपले तारणहार आहेत, जे श्रीलंकेच्या सैन्यापासून आपल्याला मुक्त करण्यासाठी आले आहेत."

उत्तरी श्रीलंकेतील तामिळ भाषिकांमध्ये त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना होती.

प्रतिमा मथळा तामिळ नागरिकांना सुरुवातीला असं वाटलं की भारतीय सेना त्यांच्या मदतीसाठी आली आहे.

श्रीलंका सरकारनं सिंहाला हीच अधिकृत भाषा असल्याचा कायदा केला होता. त्यामुळं सरकारी सेवेतील तामिळ भाषिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता.

याशिवाय तामिळ भाषिकांविरुद्ध हिंसेच्या घटनाही घडल्या होत्या. 1983 च्या दंगलीत श्रीलंकेत 3000 तमिळ भाषिकांना प्राण गमवावे लागले होते.

या नागरी युद्धाचे पडसाद भारतातही उमटू लागले होते.

भारतातील बऱ्याच तामिळ भाषकांनी LTTEच्या 'तामिळ ईलम'च्या स्वप्नाला समर्थन दिलं होतं.

भारतीय शांतीसैन्य श्रीलंकेत पाठवण्यासाठी तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी आणि श्रीलंकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जे. आर. जयवर्धने यांच्यात याच पार्श्वभूमीवर करार झाला होता.

Image copyright Surender Sangwan
प्रतिमा मथळा भारतीय सैनिकांनी मोठ्याप्रमाणावर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्याचं सांगितलं जात.

शेजारचा मोठा देश आपल्या देशाच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करतोय, असं विचार करून श्रीलंका सरकार तसंच देशातील जनता नाराज होती,

इथं आल्यावर शांतीसेना जसजसी विस्तारू लागली तसतशी उत्तरेत श्रीलंका सैन्याची जागा घेऊ लागली.

अनेक शांतीसैनिकांना तर वाटलं होतं ही मोहीम तामिळांना सहकार्य करण्यासाठीच आहे. युद्ध त्यांच्या मनातही नव्हतं.

इथं मिळणाऱ्या स्वस्त इलेक्ट्रॉनिक वस्तूंची, भारतीय सैनिक मोठ्याप्रमाणावर खरेदी करत असल्याच्या बातम्याही येत होत्या.

सिंग म्हणाले, "तोफखान्यांसह आमच्या कितीतरी युनिटकडे शस्त्रास्त्रसुद्धा नव्हती. कारण शांतता मोहिमेत याची गरज पडेल, असं वाटलं नव्हतं."

Image copyright Surender Sangwan
प्रतिमा मथळा भारतीस सैनिकांना वाटलं होतं, ते इथं शस्त्रसंधीसाठी आले आहेत.

सुरुवातील शांतीसेना आणि LTTE यांच्यातील संबंधही चांगले होते. भारताने LTTE बंडखोरांना अनेक वर्षं प्रशिक्षण दिलं होतं.

सिंग म्हणाले, "आमच्या एजन्सींनीच त्यांना प्रशिक्षण दिलं असल्यानं त्यांचे बरेच केडर आमच्या ओळखीचे होते. LTTEचे लोक आमच्या लष्करी तळांना भेट द्यायचे. त्यामुळं त्यांना आमच्या तळांची रचना माहीत झाली होती. आणि याचाच लाभ त्यांना आमच्यावर हल्ले करताना झाला."

LTTEच्या बंडखोरांकडे भारतीय सैन्यांच्या तुलनेत आधुनिक शस्त्रास्त्रं आणि संवादाची प्रगत साधनंही होती.

ते म्हणाले, "त्यांची शस्त्रास्त्र आमच्यापेक्षा फारच प्रगत होती. आमच्या शस्त्रांकडं पाहून कुणी हसू नये, म्हणून आम्ही आमची शस्त्रास्त्र लपवून ठेवायचो."

"आमच्या रेडियोची रेंज 10-15 किलोमीटर होती, तर त्यांच्या रेडिओची 40-45 किलोमीटर," असं सिंग म्हणाले.

युद्धाची सुरुवात

पण जेव्हा LTTEने शस्त्र सर्मपण करण्यास नकार दिला, तेव्हा मात्र परिस्थिती बदलू लागली. त्यानंतर शांतीसेना LTTE सोबत गनिमीकाव्याच्या युद्धात ओढली गेली.

पुढं ऑक्टोबर 1987 मधे शांतीसेनेनं 'LTTE'चा बालेकिल्ला असलेलं जाफना ताब्यात घेण्यासाठी मोहीम हाती घेतली.

जाफना विद्यापीठाच्या मैदानावरून हल्ला सुरू करायचा होता. शांतीसेनेच्या पल्लाली तळापासूनचं हे अंतर काही किलोमीटर होतं.

शौनानसिंग त्यावेळी मेजर होते. त्यांना आणि त्यांच्या सोबतच्या जवानांकडे मागून येणाऱ्या तुकडीसाठी वाट करून देण्याची जबाबदारी होती.

प्रतिमा मथळा ज्या जाफना विद्यापीठात अनेक सहकारी गमावले तिथं निवृत्त मेजर जनरल शौनान सिंग यांनी पुन्हा भेट दिली.

या मैदानावर आता हिरवाई असून काही क्रीडा सुविधा आहेत.

"30 वर्षांपूर्वी इथं फक्त जंगल होतं. आता येथील झाडझुडपं काढण्यात आली आहेत," आजूबाजूला पाहत सिंग म्हणाले.

LTTEला या हल्ल्याची पूर्वसूचना मिळाली होती. त्यांनी शांतीसेनेवर 3 बाजूंनी हल्ला चढवला.

"आमच्यावर त्या इमारतीवरील पाण्याच्या टाकीवरून हल्ला केला जात होता," दूरवरच्या इमारतीकडे दाखवत ते म्हणाले.

भारतीय सैन्याची जसजशी संख्या वाढत गेली तसतशी LTTEच्या हल्ल्याची तीव्रता वाढत गेली.

मेजर सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये जागा घेतल्या. तिथल्या घरांमध्ये घसून तिथल्या लोकांना खोल्यांमध्ये बंद करून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली.

Image copyright Surender Sangwan
प्रतिमा मथळा आपली पिछेहाट झाल्याचं शांतीसेनेला लक्षात आलं.

ही लढाई 24 तास चालली. शांतीसेनेनं 36 जवान गमावले.

"मारला गेलेला पहिला जवान होता लक्ष्मी चंद. श्रीलंकेचे लष्कर हेलिकॉप्टरमधून हल्ले करत आमची मदत करत होते," ते म्हणाले.

"पण एक बाँब आम्ही जागा घेतलेल्या घरावर पडला. त्यात उमेश पांडे मारला गेला," मेजर सिंग यांनी या घटनेच्या जागा दाखवत ही आठवण सांगितली.

"गंगारामला पाय गमवावा लागला. नंतर रक्तस्त्रावानेच त्याचा मृत्यू झाला."

इथल्या एका घराच्या फाटकावर गोळीच्या खुणा आजही या लढाईची साक्ष देतात.

जाफनातून फिरत असताना सिंग यांच्या तीक्ष्ण स्मृतीची प्रचिती येत होती. या प्रदेशाचा भूगोल, शस्त्रसज्ज इतर तामिळ गटांतील लोकांची नावं, LTTEच्या नेत्यांशी झालेला संवाद, अशा कितीतरी बाबी आजही त्यांच्या स्मृतीत ताज्या आहेत.

इथला आत्ताचा विकास पाहून ते सुखावले होते. आपल्या इतर सहकाऱ्यांना दाखवण्यासाठी ते इथले फोटो आणि व्हीडिओ घेत होते.

"30 वर्षांपूर्वी आपण यावर लक्ष द्यायला हवं होत," असं ते म्हणाले.

मानवी हक्कांची पायमल्ली

शांतीसेनेच्या इथल्या उपस्थितीला काळी बाजूही आहे. भारतीय सैन्यांवर हत्या, बलात्कार, छळांचे आरोप झाले होते.

यातील सर्वांत भयावह घटना होती ती 21 ऑक्टोबर 1987 रोजी जाफनाच्या मुख्य हॉस्पिटलमध्ये.

तामिळ हक्कांवर काम करणाऱ्या संघटनांच्या मते भारतीय सैन्यावर हॉस्पिटलच्या आतून LTTEच्या 4-5 लोकांनी गोळीबार केला. भारतीय सैन्यानं प्रत्युत्तर द्यावं, यासाठी LTTE असे डावपेच खेळायची.

प्रतिमा मथळा शांतीसेनेनं मानवी हक्कांची पायमल्ली केल्याचे आरोप झाले. या आरोपांत जाफनातील हॉस्पिटलवर हल्ला केला आणि त्यात अनेक मारले गेल्याच्या आरोपाचाही समावेश आहे.

पण या गोळीबारानंतर LTTEचे लोक सामान्य लोकांमध्ये मिसळून जायचे.

असा आरोप आहे की शांतीसेनेनं प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या जोरदार गोळीबारात 60 जण मरण पावले. यात हॉस्पिटलमधील नर्स, डॉक्टर, पेशंट यांचा समावेश होता.

त्या गोळीबारातील मृत कर्मचाऱ्यांचे फोटो हॉस्पिटलच्या भिंतीवर टांगण्यात आले आहेत.

त्या गोळीबाराच्या वेळी हॉस्पिटलमध्ये काम करत असलेल्या देवेंद्रमला आम्ही भेटलो.

"मी पळालो आणि त्या खोलीत स्वतःला कोंडून घेतलं," एका खोलीकडं बोट करत तो म्हणाला.

प्रतिमा मथळा देवेंद्रनं त्याच्या मृत सहकाऱ्यांच्या आठवणी सांगितल्या. तसेच शांतीसेनेपासून बचावासाठी कसं लपून बसलो ते सांगितलं.

"मला गोळ्यांचा आवाज येत होता. कर्मचारी पाण्यासाठी ओरडत होते आणि त्यांना गोळ्या घालण्यात येत होत्या."

"मी त्यांना पाहिलं. त्यांनी पगडी घातली होती. ते भारतीय सैन्याच्या पोशाखात होते. ते शीख होते," तो म्हणाला.

मारल्या गेलेल्या एका सोबतीची आठवण सांगताना त्याला रडू कोसळलं.

मृतदेहांखाली लपून राहिले डॉक्टर

या घटनेनंतर तीन दिवसांनंतर भूलतज्ज्ञ डॉ. गणेशमूर्थी हॉस्पिटलमध्ये गेले होते.

"जेव्हा मी आत गेलो तेव्हा रक्तांची दुर्गंधी सर्वत्र पसरली होती. गोळीबारातून बचावलेल्यांपैकी काहींनी सांगितलं की जीव वाचवण्यासाठी काही डॉक्टर मृतदेहांखाली लपले होते," ते म्हणाले.

आम्ही जर हलचाल केली असती तर आम्हालाही गोळ्या घातल्या असत्या, असं त्या डॉक्टरांनी त्यांना नंतर सांगितलं.

"लोकांना मदत करू इच्छीत असलेल्या एका बालरोगतज्ज्ञाला गोळ्या घातल्या," असं गणेशमूर्थी म्हणाले.

प्रतिमा मथळा घटनेनंतर हॉस्पिटलमधून रक्ताचा वास येत होता अशी आठवण डॉ. गणेशमूर्थी यांनी सांगितली.

"दुसऱ्या दिवशी शांतीसेनेसोबत आलेल्या एका महिला डॉक्टरनं तामिळ भाषेत लपून बसलेल्यांना बाहेर येण्याचं आवाहन केलं होतं," अशी आठवण त्यांनी सांगितली.

सिंग हे सर्व शांतपणे ऐकत होते.

"मी घटनेबद्दल अनभिज्ञ होतो. या घटनेची माहिती दाबण्यात आली आणि अधिकारी पदावरील लोकांना हे माहीत नव्हतं, असं दिसतं," असं ते म्हणाले.

सिंग मृत पुरुष आणि स्त्रीयांच्या फोटोसमोर उभे होते.

ते म्हणाले, "मी इतकंच सांगू शकतो की जे घडलं ते वाईट घडलं. जेव्हा शांतीसेनेवर गोळ्या झाडल्या तेव्हा त्यांनी आपण कुणावर गोळ्या झाडत आहोत, याची काळजी केली नाही."

"दुर्दैवानं जिथं लष्करी कारवाया होतात, तिथं अशा घटना घडतात."

लाजिरवाणी माघार

शांतीसेनेनं इथं आणखी 29 महिने घालवले. पण नुकसान वाढत चालल्याने शांतीसेना घरी परतली.

स्थानिकांत शांतीसेनेची प्रतिमा पूर्ण डागाळली होती.

"त्यांच्या वर्तवणुकीमुळे सर्वांनाच वाईट वाटत होतं. त्यांनी आम्हाला शिकवलं की लष्कर हे लष्करच असतं. त्यात काहीही बदल होत नाही," जाफना येथील तामिळ वृत्तपत्रं 'उथयनते' संपादक टी. प्रेमनाथ म्हणाले.

प्रतिमा मथळा आशा आणि चांगल्या भविष्यासाठी जखमा भरून येणं आवश्यक आहे.

"या मोहिमेसमोर कोणतीही विचारपूर्वक ठरवलेलं राजकीय किंवा लष्करी उद्दिष्ट नव्हतं," अशी प्रतिक्रिया सिंग यांनी दिली.

यातूनच LTTEने 1991ला राजीव गांधी यांची हत्या केली.

30 वर्षांनंतर निवृत्त मेजर जनरल शौनान सिंग यांना जाफनात शांतता पाहून आनंद होतो आहे.

"युद्धाच्या जखमा भरून काढण्यासाठी कोलंबो सरकारने अधिक पावलं उचलली पाहिजेत," असं ते म्हणाले.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)