विकलांग व्यक्तीनं गायलेलं 'कभी कभी....' ऐकलंय कधी?

इलस्ट्रेशन

"कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है…', साहिल लुधियानवीची ही गजल तुम्ही ऐकलीच असेल नक्की. ती पुन्हा पुन्हा ऐकताना तुमच्या डोळ्यापुढे कोणत्या तरी खास व्यक्तीचा चेहरा हमखास येत असणार.. हो ना?

आता ही गजल पुन्हा गुणगुणून बघा. कल्पना करा की, व्हीलचेअरवर बसलेला एक पुरुष एका अंध स्त्रीचा हात पकडून तिला 'के ये बदन ये निगाहें मेरी अमानत हैं' ऐकवतो आहे.

किंवा असा विचार करा की, एका पुरुषाला हातच नाहीत आणि एका मूक स्त्रीसाठी तो 'ये गेसुओं की घनी छाँव हैं मेरी ख़ातिर, ये होंठ और ये बाहें मेरी अमानत हैं...' गातो आहे.

'ये गेसुओं की घनी छाँव हैं मेरी ख़ातिर ये होंठ और ये बाहें मेरी अमानत हैं...' हे शब्द आणि ते चित्र एकत्र पचवायला कठीण वाटतं आहे ना?

विकलांग लोकांचा मुळात आपण विचारच इतका संकुचित वृत्तीनं करतो की, त्यात या कविकल्पनांना जागाच नसते. त्यांना आपल्या नॉर्मल विश्वात जागाच देत नाही आपण.

विकलांग स्त्री-पुरुषांचं प्रेम, शारीरिक आकर्षण किंवा लग्न याचं चित्र आपल्या मनात येतच नाही कधी. विकलांग म्हटल्यावर डोळ्यासमोर येतं ते फक्त कणव, सहानुभूतीचं चित्र. त्यांचं थोडं वेगळं चित्र... कसं असेल हे चित्र?

पुढच्या काही दिवसांत माझ्या लेखांतून आपण विकलांगांच्या याच वेगळ्या विश्वात डोकावण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मी एका कॉलेजमध्ये जाणाऱ्या अंध मुलीला भेटले. तिचे लांबसडक केस, भुवया आणि अशा अनेक गोष्टींनी माझ्या मनाचा ठाव घेतला.

अभ्यास आणि खेळातले तिचे अनुभव माझ्या मैत्रिणींच्या अनुभवांशी मिळतेजुळते होते.

पहिल्या प्रेमाचा अनुभव तिनेपण घेतला होता. एका मुलाशी जवळीक साधण्याची तिचीसुद्धा इच्छा होती.

विश्वासघाताची भीती आणि नातं असफल झालं तर येणाऱ्या एकटेपणाची भीती तिच्या मनातसुद्धा होती.

पण हे सगळं अनुभवण्याची तिची पद्धत वेगळी होती.

अशाच आणखी एका मुलीची गोष्ट मला कळली. तिच्या एका मित्रानं आणि शेजारच्या मुलानं तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

एका अपंग मुलीबरोबर असं काही होऊ शकतं यावरच आधी कोणाचा विश्वास बसत नाही.

तिचे शेजारी, पोलीस, इतकंच काय कुटुंबातले सदस्यसुद्धा यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. विकलांग मुलीवर बलात्कार करून कोणाला काय मिळणार? असा प्रश्न ते विचारतात.

असे प्रश्न तिला बलात्कारापेक्षासुद्धा जास्त त्रास देतात.

पण या प्रकाराने ती मोडून पडलेली नाही. तिला पुढे जायचं आहे. तिला पुन्हा प्रेमात पडायचं आहे.

ज्याला कुणाला आपलं हे दु:ख कळेल त्या व्यक्तीच्याच प्रेमात पडलो तर?... पण मग सहानुभूती निर्माण होईल, त्याचा फायदा उचलला जाईल.

एखाद्याबरोबर लग्न करताना किंवा कोणतंही नवं नातं निर्माण करतांना विकलांग व्यक्तीला हे सगळे विचार करावे लागतात.

एखाद्या नॉर्मल व्यक्तीनं विकलांग व्यक्तीशी लग्न करणं म्हणजे अशक्यप्राय गोष्ट वाटते आपल्याला. आपण गृहित धरतो की, नेहमी दोन विकलांग व्यक्ती एकमेकांशी लग्न करतात.

हेसुद्धा खूप कमी प्रमाणात बघायला मिळतं. कारण त्यांचे कुटुंबीय विकलांग व्यक्तींच्या लग्नाला फार कमी महत्त्व देतात. हा सगळा जबाबदारी वाढवण्याचा प्रकार आहे, असं त्यांना वाटतं.

विकलांग व्यक्तीशी लग्न करायला प्रोत्साहन म्हणून अनेक राज्यांमध्ये काही निधी दिला जातो. विकलांग व्यक्तीशी लग्न केल्यावर सरकारकडून ही पैशाची मदत मिळते.

बिहारमध्ये एका विकलांग दांपत्याला भेटून मी समजून घ्यायचा प्रयत्न केला. अशा पैशाच्या मदतीवर उभं राहिलेलं नातंही किती मूल्यवान असतं त्यांच्यासाठी?

मी असे अनेक प्रेमाचे, विरहाचे, दुःखाचे अनुभव ऐकले आहेत, पाहिले आहेत. मी ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे.

तुम्ही माझ्याबरोबर या वेगळ्या विश्वात याल तेव्हा मला तुमच्याकडून एक वचन हवं आहे मात्र - 'कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है…' हे गाणं तुम्ही पुन्हा एकदा गुणगुणायचं... नितळ मनानं!

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)