प्रेस रिव्ह्यू : 'कसाबच्या फाशीची गुप्तता पाळणं हे आव्हान होतं'

अण्णा हजारे Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अण्णा हजारे

लोकपाल विधेयकासाठी पुन्हा आंदोलन करणार अण्णा हजारे; दसऱ्यानिमित्त कोण कुठे काय बोललं; बुलेट ट्रेनवरून महाराष्ट्रात राजकारण तापलंय, अशा ठळक बातम्यांचा आढावा या वृत्तात.

अण्णा हजारेंचं पुन्हा लोकपालसाठी आंदोलन

''लोकपाल विधेयकाची अंमलबजावणी करण्याऐवजी लोकपाल कायदा कमकुवत करण्याचे प्रयत्न मोदी सरकारकडून होत आहे,'' असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला.

लोकपाल कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या मागणीसाठी २ ऑक्टोबरला दिल्ली येथे राजघाटावर आंदोलन करणार असल्याचं हजारे यांनी शनिवारी जाहीर केलं.

लोकसत्ताच्या वृत्तानुसार, अहमदनगरच्या राळेगणसिद्धीमध्ये एका नवरात्रोत्सव कार्यक्रमात हजारे यांनी पंचक्रोशीतील नागरीकांशी संवाद साधला.

''लोकपाल कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी आपण गेल्या तीन वर्षांपासून पंतप्रधानांकडे सातत्याने करीत आहोत,'' असं ते म्हणाले.

'देशभक्ती आम्हाला शिकवू नका'

दसरा मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर कडाडले.

Image copyright INDRANIL MUKHERJEE/GETTY IMAGES

''आम्हाला देशभक्ती शिकवू नका. आम्हाला देशभक्ती शिकवण्याची वेळ अजून आलेली नाही,'' असा हल्ला त्यांनी केला. ''जे नोटाबंदीच्याविरोधात आहे ते देशद्रोही आणि जे बाजूनं आहेत ते देशभक्त असं वातावरण तयार केलं गेलं.''

''तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या काय? गायींबद्दल भाजपची भूमिका काय?'' असे प्रश्न उपस्थित करताना ठाकरे यांनी ''गायीला जपायचे आणि ताईला मारायचे असले हिंदुत्व आम्हाला नको,'' असंही ते यावेळी म्हणाले.

राजकीय प्लॅटफॉर्मवर आली बुलेट ट्रेन

''मुंबईकरांचे रेल्वेसंदर्भातील सर्व प्रश्न सुटल्याशिवाय मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही,'' असा इशारा देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

५ ऑक्टोबरला चर्चगेट रेल्वे मुख्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणाही त्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

Image copyright Getty Images

महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ''भाजप सरकार बुलेट ट्रेन केल्याशिवाय राहणार नाही. राज ठाकरेंना काय करायचंय, ते त्यांनी ठरवावं.'' याविषयीचं वृत्त दिव्य मराठीमध्ये प्रसिध्द झालं आहे.

दरम्यान, मुंबईत शुक्रवारी झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनीही दसरा मेळाव्यातील भाषणात ''बुलेट ट्रेन कोणाला हवी आहे? विनाकारण आमच्या खांद्यावर मोदी यांचं ओझं लादू नका,'' अशी टीका केली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मीरा बोरवणकर

'कसाबला फाशी देणं हे आव्हान होतं'

''अजमल कसाब प्रकरणात गुप्तता पाळणं हे सर्वांत मोठं आव्हान होतं. तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा तो आग्रह होता,'' असं महाराष्ट्र पोलीस खात्याच्या संशोधन आणि विकास विभागाच्या महासंचालक मीरा बोरवणकर यांनी सांगितलं.

शनिवारी सेवानिवृत्त झाल्यावर द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या अजमल कसाब आणि याकूब मेमन यांच्या फाशीविषयी बोलत होत्या.

''मुंबईतील आर्थर रोड जेल इथून पुण्यातील येरवडा जेलमध्ये त्याला हलवणं आणि फाशीची प्रक्रिया राबविणं यात विविध यंत्रणा कार्यान्वीत होत्या.''

''याउलट याकूब मेमन प्रकरणात साऱ्या देशाचं लक्ष आमच्यावर होतं. या तणावाखालीच आम्हाला काम करावं लागलं,'' असं बोरवणकर यांनी सांगितलं.

भारत-पाक सीमेवर सापडलं भुयार

जम्मू काश्मीर मधील अर्निया सेक्टरमध्ये सीमेजवळील शून्य रेषेवर १४ फूट लांब भुयार सापडले.

सुमारे १२ सशस्त्र व्यक्तींच्या संशयास्पद हालचालींचा मागोवा घेत असताना ही बाब समोर आली. भुयार खणण्याचं काम सुरू होते आणि ते पूर्ण होण्याआधीच बीएसएफने हा प्रकार शनिवारी उघडकीस आणला.

तीन फूट उंचीचे, अडीच फूट रुंदीचे हे भुयार या भागातील धमला नाला येथे खणण्यात आले होते. या भुयारात शस्त्रास्त्रेही सापडली. हिंदुस्थान टाईम्सनं याबाबत वृत्त दिलं आहे.

इजितमध्ये समलैंगिकतेचा प्रचार करणाऱ्यांना अटक

इजिप्टमध्ये सोशल मीडियावर "अनैसर्गिक लैंगिक वर्तन" आणि "अय्याशी"चा प्रसारासाठी अटक करण्यात आलेल्या सहा पुरुषांची 1 ऑक्टोबरच्या सुनावणीआधी शारीरिक तपासणी होणार आहे, असं अमेनिस्टी इंटरनॅशनलने शनिवारी सांगितलं आहे.

Image copyright Michele Tantussi/GETTY IMAGE
प्रतिमा मथळा इजिप्तसह अनेक देशांमध्ये समलैंगिक संबंध गुन्हा मानला जातो.

इजिप्तमध्ये समलैंगिकतेचं समर्थन करणाऱ्या चळवळीविरोधातील ही व्यापक कारवाई असल्याचं मानलं जात आहे.

हिदुंस्थान टाईम्समध्ये रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत 11 लोकांना अटक करण्यात आली आहे. एकाला सहा वर्षांची कैद झाली आहे, असं अमेनिस्टनं म्हटलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)