गांधी जयंती : जेव्हा महेंद्र सिंग धोणीला महात्मा गांधी भेटतात...

  • सुनंदन लेले
  • क्रीडा पत्रकार
व्हीडिओ कॅप्शन,

गांधीजींच्या विचारांबद्दल काय बोलतो महेंद्र सिंग धोणी

२ ऑक्टोबरच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोणीने बीबीसी मराठीला विशेष मुलाखत दिली. ज्येष्ठ पत्रकार सुनंदन लेले यांनी धोनीला महात्मा गांधीजींबद्दल बोलतं केलं.

गांधीजींच्या स्मृतीला अभिवादन करून अनेक जण गांधीजींनी दाखवलेल्या मार्गावर चालायचा निश्चय करतात. अनेकांना त्यात यश येतं तर काही भरकटतात.

गांधीजींचे विचार आपल्या खेळात आणि व्यक्तिमत्त्वात अंगीकारणारं अनोखं उदाहरण म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोणी. गांधी जयंतीच्या निमित्ताने धोणीने त्याच्या आयुष्यावरील गांधीजींचा प्रभाव उलगडून सांगितला.

माझ्यासाठी गांधी म्हणजे काय?

धोणीच्यामते त्याच्यासाठी महात्मा गांधी म्हणजे अहिंसा, प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी आणि लढत राहण्याची ताकद.

जर आपण आपल्या आयुष्यात एखादं ध्येय ठेवलं असेल तर त्याच्या सिद्धीसाठी जीवतोड मेहनत घेणं आणि ते पूर्ण होईपर्यंत प्रयत्न करत राहणं हे धोणी गांधीजींकडून शिकलाय.

महात्मा गांधी हे नाव ऐकल्यावर किंवा त्यांचा फोटो पाहिल्यावर धोणीच्या मनात आलेले हेच पहिले विचार. आपल्या क्रिकेट करिअरमध्ये आणि खासगी आयुष्यात आपणही याच विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतो असं धोनी सांगतो.

पण आजही महात्मा गांधींचे विचार समर्पक आहेत का?

वेळ आणि काळ जरी बदलला असला तरी महात्मा गांधींचे विचार मात्र आजही समर्पक असल्याचं धोणी सांगतो. त्याच्यासाठी गांधीजींची सर्वांत महत्त्वाची शिकवण म्हणजे 'वर्तमानात जगा'.

जे घडलंय त्यावर आपलं नियंत्रण नसतं आणि जे घडणार आहे त्यावरही नाही. पण वर्तमानावर, म्हणजे जे मी आत्ता करणार आहे त्यावर आपलं शंभर टक्के नियंत्रण असतं.

फोटो स्रोत, STR/getty images

फोटो कॅप्शन,

धोनीच्या जडण घडणीमध्ये गांधीजींच्या विचाराचा सिंहाचा वाटा आहे.

त्यामुळे भूतकाळात रमण्यापेक्षा किंवा भविष्याची अवाजवी चिंता करण्यापेक्षा, वर्तमानावर लक्ष केंद्रीत करावं. तसंच आपलं सर्वोत्तम देऊन भविष्य सुधारण्यावर आपला जोर असावा असं धोणी अगदी आवर्जून सांगतो.

आजचं जग हे खूप निकालदर्शी आहे. आपल्याला जर चांगले मार्क मिळाले किंवा एखाद्या गोष्टीचा निकाल चांगला लागला तरंच आपण ती व्यक्ती यशस्वी असल्याचं प्रमाण मानतो.

पण आपल्याला हे अजिबात पटत नसल्याचं धोणी सांगतो. 'पूर्ण समर्पण म्हणजेच पूर्ण यश' ही गांधीजींची शिकवण आपल्या आयुष्यात अत्यंत मोलाची असल्याचं धोणी सांगतो.

जर आपण आपल्याबाजून सर्व प्रयत्न केले असतील तर जो काही निकाल येईल तो आपण मान्य केला पाहिजे. इतकंच नाही तर निकालावरुन कोणाचीही पात्रता ठरवली जाऊ नये, असंही धोणी सांगतो.

विरोधातला आवाज ऐकणं आणि मान्य करणं...

महेंद्र सिंग धोणी भारतीय टीमचा सर्वांत यशस्वी कॅप्टन. टीमचं नेतृत्व करताना गांधीजींच्या याच विचारांनी धोनीला शक्ती आणि प्रेरणा दिली.

धोणीच्या आयुष्यात आणि त्याच्या विचारात बदल घडवला तो गांधीजींच्या आणखी एका तत्त्वानं - 'प्रामाणिक मतभिन्नता'.

सगळेच जण आपल्यासारखा विचार करतील किंवा त्यांनी करावा, अशी अपेक्षा करणं हाच मूर्खपणा ठरेल, असं धोणी सांगतो.

टीम सिलेक्शन असो किंवा मॅचमधल्या कॉम्बिनेशनची गोष्ट असो, मला जे वाटतं त्याच्याशी सर्वजण सहमत असतीलच असं नाही. आणि त्यामुळे प्रामाणिक मतभेद असणं आणि ते मान्य करणं, हे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचं तो म्हणतो.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)