गुजरातमध्ये दलित तरुणाची ठेचून हत्या

दलित, गुजरात, दलित, अॅट्रॉसिटी
प्रतिमा मथळा गुजरातमध्ये नवरात्र उत्सवात या तरुणाने जीव गमावला.

गुजरातमध्ये नवरात्र उत्सवा दरम्यान दलित तरुणाची हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.

गुजरातमधील आणंद जिल्ह्यात पारंपरिक नवरात्र उत्सवादरम्यान एका दलित युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

मृतांच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी बीबीसीला सांगितलं आहे.

आणंद जिल्ह्यातील भडारनिया गावात रविवारी पहाटे चार वाजता ही घटना घडली.

जयेश सोळंकी असं या तरुणाचं नाव आहे. तो 21 वर्षांचा होता. दसऱ्याच्या निमित्तानं जयेश, भाऊ प्रकाश आणि इतर तिघांसह गरबा पाहायला गेला होता.

प्रतिमा मथळा युवकाच्या मृत्यूनंतर शोकाकूल नातेवाईक

"देवळाजवळच्या पायऱ्यांवर आम्ही बसलो होतो. संजय पटेल नावाच्या माणसानं तुम्ही इथं काय करता आहात अशी विचारणा केली. आमच्या बहिणी आणि मुली गरबा खेळायला आल्या आहेत. त्यांना खेळताना पाहण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत." असं जयेशचा भाऊ प्रकाशनं सांगितलं

त्यानं पुढे सांगितलं, "संजयनं आम्हाला शिवीगाळ करायला सुरुवात केली. आम्हाला उद्देशून जातीवाचक शेरेबाजी केली. तुम्ही इथं यायचं धाडस केलंच कसं असा प्रश्न त्याने विचारला."

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार दोन गटांमध्ये वाद झाला. या वादाचं पर्यावसान एकाचा मृत्यू होण्यात झालं.

या प्रकरणी खूनासह अॅट्रॉसिटी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृताच्या नातेवाईकांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे असं पोलीस उपअधीक्षक ए.एम. देसाई यांनी सांगितलं आहे.

जयेश त्याच्या पालकांचा एकमेव मुलगा होता. त्याला एक बहीण आहे. त्याची घरची स्थिती बेताची असून वडील शेतमजूर आहेत.

गेल्याच आठवड्यात गांधीनगर जवळच्या लिंबोडरा गावात मिशी ठेवल्याप्रकरणी दलित तरुणांना कथित मारहाण करण्यात आली होती.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics