बेटिंगला मान्यता : सौराष्ट्र वगळता सगळ्यांचं मौन

cricket Image copyright PUNIT PARANJPE/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा बेटींगला मान्यता द्यावी का?

बेटिंगला कायदेशीर मान्यता द्यावी का, याबद्दल विधी आयोगानं दोन महिन्यांपूर्वी पाठवलेल्या पत्राला सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन वगळता देशातील एकाही क्रिकेट असोसिएशननं उत्तरही पाठवलं नसल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.

सौराष्ट्रानं बेटिंगला मान्यता दिल्यास मॅच फिक्सिंगला प्रोत्साहन मिळेल. शिवाय, खेळात गुंड प्रवृत्तीचा शिरकाव होईल, अशी भीती या उत्तरात व्यक्त केली आहे.

लोढा समितीनं केलेल्या शिफारशीनुसार सुप्रीम कोर्टानं विधी आयोगाला बेटिंगविषयी अहवाल देण्यास सांगितलं आहे.

औषधशास्त्रातील नोबेल

Image copyright Scott Eisen/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा मायकेल रॉसबॅश यांच्यासह जेफ्री हॉल, मायकेल यंग यांना औषधशास्त्रातील नोबेल

शरीरातील जैविक घड्याळ्याच्या संशोधनाला औषधशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. जेफ्री हॉल, मायकेल रॉसबॅश, मायकेल यंग या तीन अमेरिकन संशोधकांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. ही बातमी बहुतेक वृत्तपत्रांनी केली आहे. लोकसत्तानं संशोधनाविषयी व्यवस्थित माहिती दिली आहे.

'सरकारशी लागेबंधे असणाऱ्यांनी नोटा बदलल्या'

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा शरद पवार यांची केंद्र सरकारवर टीका

नोटाबंदीवरून शरद पवार यांनी पुन्हा एकदा नोटाबंदीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. नाशिकमध्ये बोलताना 'सरकारशी लागेबांधे असलेल्यांनीच आधी नोटा बदलल्या', असं पवार यांनी म्हटलं आहे.

राज्यस्तरीय शेतकरी प्रतिनिधी अधिवेशनात पवार बोलत होते. याच अधिवेशनात सरसकट कर्जमाफीसाठी त्यांनी राज्य सरकारला पाच नोव्हेंबरचा इशारा दिल्याचं वृत्त सकाळनं दिलं आहे.

'ताज महाल' वादात

Image copyright DOMINIQUE FAGET/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा 'ताज महाल'वर वाद

उत्तर प्रदेश सरकारनं 'ताज महाल'ला पर्यटनस्थळांच्या यादीतून वगळलं, त्यावरुन सुरू झालेल्या वादाची दखल बहुतेक वृत्तपत्रांनी घेतली आहे.

ताजची प्रतिकृती भेट देण्याच्या प्रकारावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री नाराज होते, त्यात आता पर्यटनस्थळांची माहिती देणाऱ्या ताज्या पुस्तिकेत ताजला वगळल्यानं सगळीकडून वाद सुरू झाल्याचं लोकसत्तानं म्हटलं आहे.

जगमीत सिंग यांचा कॅनडाच्या राजकारणातील वाढता प्रभाव ही भारताला डोकेदुखी ठरू शकेल, असं वृत्त हिंदुस्थान टाइम्सनं दिलं आहे. कॅनडाच्या नव लोकशाही पक्षाचे जगमीत सिंग हे प्रमुख नेते आहेत. भारतानं त्यांना 2013मध्ये व्हिसा नाकारला होता.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)