श्रीनगरच्या BSF कँपवर हल्ला, दोन जवान जखमी

बीएसएफ जवान Image copyright Danish ismail/reuters
प्रतिमा मथळा जवानांनी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले.

श्रीनगर विमानतळाजवळ सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) कँपवर घुसखोरांनी पहाटे आत्मघातकी हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे.

या हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत एक हल्लेखोर ठार झाल्याचं समजतं.

जैश-ए-मोहम्मद या बंडखोर गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

बीबीसी उर्दूचे प्रतिनिधी रियाज मसरूर यांनी दिलेल्या माहितीनुसार "या हल्ल्यानंतर श्रीनगर विमानतळाकडं जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे."

"विमानतळाकडं जाणारे कर्मचारी, प्रवासी अथवा वाहनं थांबवण्यात येत आहे. सर्व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत विमान उड्डाणे थांबवण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे," असं त्यांनी सांगितलं.

श्रीनगरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी स्थानिक पत्रकार माजिद जहांगीर यांना सांगितलं की, "आज सकाळी पहाटे पाचला हा हल्ला झाला. बीएसफच्या कॅंपमध्ये पहाटे तीन घुसखोर शिरले आणि त्यांनी हल्ला केला. जवानांनी त्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं."

"त्यात एक हल्लेखोर ठार झाला आहे. तर दोन अद्यापही कॅंपमध्ये आहेत. या हल्ल्यात दोन भारतीय जवान जखमी झाले आहेत. कारवाई अद्याप सुरू आहे", अशी माहिती मुनीर खान यांनी दिली.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)