विजय माल्ल्या कसा बनला 'किंग ऑफ बॅड टाइम्स'

विजय माल्ल्या Image copyright Reuters
प्रतिमा मथळा बँकांचं कर्ज बुडवल्यानंतर विजय माल्ल्या लंडनमध्ये निघून गेला.

विजय माल्ल्याला मंगळवारी दुपारी अटक झाल्यानंतर लगेचच जामीनही मंजूर झाला आहे. भारतानं त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी ब्रिटीश सरकारकडे केली आहे.

भारताच्या या मागणीवर 4 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी माल्ल्याला लंडनमधील वेस्टमिनस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर रहावं लागणार आहे.

मद्य व्यवसायाला भारतीय बाजारपेठेत नवं स्थान मिळवून देणारा विजय माल्ल्या बँकांचं कर्ज बुडवल्यानंतर चर्चेत आला.

माल्ल्याला 'किंग ऑफ गुड टाइम्स' म्हणून ओळखलं जायचं. पण आजचं वास्तव या पेक्षा फार वेगळं आहे.

आयुष्यभर माल्ल्यानं मद्य उद्योगाव्यतिरिक्त इतरही उद्योगांमध्ये गुंतवणूक करत ते आपल्या पंखाखाली आणले. कारण त्याला आपली 'मद्यसम्राट' ही ओळख बदलून मोठा उद्योगपती ही ओळख निर्माण करायची होती.

मद्य व्यवसाय हा माल्ल्याचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या देशातल्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमधून बाहेर पडलेल्यांना त्यानं त्याच्या कंपनीत स्थान देत व्यवसायाला कॉर्पोरेट लूक दिला.

मात्र, एका झटक्यात नवी कंपनी खरेदी करण्याची त्याला सवय लागली. तसंच, असे व्यवहार करताना लेखी नोंदी न करण्याचे निर्णयही त्यानं घेतले. यामुळेच त्याची ही अवस्था झाली.

Image copyright AFP Getty

के. गिरीप्रकाश यांनी विजय माल्ल्यावर 'द विजय माल्ल्या स्टोरी' हे पुस्तक लिहिलं आहे.

गिरीप्रकाश यांनी बीबीसीशी याबाबत बोलताना सांगितलं की, "भारतात मद्य व्यवसायाकडे चांगल्या नजरेतून पाहिलं जात नाही. आपल्याकडे लोकांनी मद्य व्यावसायिक म्हणून नव्हे तर एक मोठा उद्योगपती म्हणून पहावं अशी त्याची इच्छा होती."

गिरीप्रकाश पुढे म्हणाले, "मद्य व्यवसायिकाच्या ओळखीपासून त्यांना दूर जायचं होतं. म्हणून त्यांनी इंजिनिअरिंग, टेलिव्हिजन आणि चार्टर विमान सेवा अशा विविध क्षेत्रात गुंतवणूक केली."

मद्य व्यवसायात 40 ते 45 टक्के नफा होतो. म्हणून माल्ल्यानं किंगफिशर एअरलाईन्स ही विमान सेवा पुरवणारी कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या व्यवसायात पैसे कमवणं अवघड बाब आहे.

यात जरी फायदा झाला तरी तो केवळ एक किंवा दोन टक्केच होतो.

प्रतिमा मथळा एखाद्या प्रवाशाचं विमान चुकल्यास माल्ल्या त्याला इच्छित स्थळी दुसऱ्या विमान कंपनीनं पाठवत असत.

गिरीप्रकाश यांनी माल्ल्याच्या विमान कंपनीबद्दल बोलताना सांगितलं की, "माल्ल्यांची विमान कंपनी सुरू झाल्यावर त्यांनी पैशाची अक्षरशः उधळपट्टी करण्यास सुरुवात केली."

"एखाद्या प्रवाशाचं विमान चुकल्यास माल्ल्या त्याला इच्छित स्थळी दुसऱ्या विमान कंपनीनं पाठवत असत. माल्ल्यांना वाटत होतं की लोक त्यांच्या विमान कंपनीचे भक्त होतील."

"प्रवाशांसाठी त्यांनी परदेशातील मोठी मासिकं मागवली. पण, ती गोदामात धूळ खातच पडली होती. अशा व्यवहारांमुळे कंपनीच्या नफ्यावर त्याचा मोठा परिणाम झाला.''

किंगफिशर विमान कंपनी ही एसबीआय कॅपिटल मार्केट आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपनीच्या सल्ल्यानंतर स्थापन केली होती. हे स्पष्टीकरण माल्ल्या नेहमी देत असत.

माल्ल्यानं एकदा सांगितलं की, ''मी स्वतःसाठी कोणतंही कर्ज घेतलेलं नाही. त्यामुळे मी डिफॉल्टर नाही''

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा एफ वन ड्रायव्हर सर्गिया पेरेजसह विजय माल्ल्या

बेंगळूरुच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडीजचे प्राध्यापक नरेंद्र पाणी यांनी याविषयी माहिती देताना सांगितलं की, ''बहुतेक सारी कर्ज ही कंपनीला डोळ्यासमोर ठेऊन घेतली जातात."

"कंपन्या कर्ज फेडण्यात जरी अयशस्वी ठरल्या तरी मालकांची स्थिती ही चांगली राहते. पण याचा फटका संपूर्ण व्यवस्थेला बसतो.''

पाणी पुढे सांगतात, "सध्याच्या व्यवस्थेत दोन प्रकारच्या लोकांमध्ये फरक करता येत नाही. पहिले जे की पैसे घेऊन पळून जातात आणि दुसरा ज्याचा व्यवसाय नफा कमवू शकला नाही. विजय माल्ल्या या समस्येचं प्रतिक बनला आहे."

किंगफिशर एअरलाईन कंपनीला आंतरराष्ट्रीय कंपनी म्हणून मान्यता मिळण्यासाठी माल्ल्यानं कॅप्टन गोपीनाथ यांची एअर डेक्कन कंपनी विकत घेतली होती.

Image copyright OTHER
प्रतिमा मथळा एअर डेक्कनचे कॅप्टन गोपीनाथ

गिरिप्रकाशनी यावर एक मजेशीर किस्सा सांगितला, "आपल्या यॉटवरून माल्ल्या यांनी गोपनीथ यांना फोन केला की मला एअर डेक्कन कंपनी विकत घ्यायची आहे. गोपीनाथ यांनी सांगितल की या व्यवहाराचे एक हजार कोटी रूपये होतील."

"माल्ल्यांनी एअर डेक्कनची बॅलंस शीट न पाहता त्यांना तत्काळ डिमांड ड्राफ्ट पाठवून दिला."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)