ऊनातील दलितांची एक वर्षानंतर काय स्थिती आहे?

गुजरातमधील ऊनात गोरक्षकांनी दलितांना मारहणा केल्यांनंतर त्याचे पडसाद देशभर उमटले होते. Image copyright SAM PANTHAKY/AFP/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा गुजरातमधील ऊनात गोरक्षकांनी दलितांना मारहणा केल्यांनंतर त्याचे पडसाद देशभर उमटले होते.

गुजरातमधील ऊना आठवतं का? ऊना तालुक्यातील मोटा समधियाला गावात गोरक्षकांच्या गटानं चार दलितांना बेदम मारहाण केली होती.

या घटनेनं दलितांमध्ये संतापाची लाट उसळली. अनेकांनी गाईचं कातडं काढण्याचं काम सोडलं आणि दुसर काम पत्करलं.

सुरेंद्रनगरमध्ये दलितांचं सर्वात मोठ आंदोलन झालं होतं. त्यात दलितांनी मृत गाई न उचलण्याची घोषणा केली होती.

बीबीसीच्या टीमनं सुरेंद्रनगरमधील वढवान तालुक्याला भेट दिली आणि सध्याची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

ज्या दलितांनी गाईंच्या कातड्याच्या व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, त्यांच्याशी आमच्या टीमनं चर्चा केली.

Image copyright SAM PANTHAKY/AFP/Getty Images
प्रतिमा मथळा 'गुजरातमध्ये गोहत्या पाप आहे, पण दलित हत्या माफ आहे', अशा घोषणांनी ऊनातील घटनेविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत होता.

काही दलितांना या निश्चयावर ठाम राहणं शक्य झालं नाही.

तर काही दलितांनी मात्र या निर्णयावर ठाम राहत वेळप्रसंगी गावसुद्धा सोडलं आहे.

कुणी कामच दिल नाही

30 वर्षांचा मुन्ना राठोड वढवान तालुक्यातील डेडादारा गावचा रहिवाशी आहेत. ऊनाच्या घटनेनंतर गाईचं कातडं न काढण्याच्या निर्णय त्यानं घेतला.

पण 45 दिवस त्याला दुसर कामच न मिळाल्यानं त्याला पुन्हा तेच काम करावं लागलं.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
'मी कामासाठी अर्ज केला होता, पण माझ्या जातीमुळं तो फेटाळला'

मुन्ना 9वी पास असून तो चर्मकार समाजातील आहे. राठोडला अनेक खासगी कंपन्यांनी नोकरी नाकारली आहे.

तो म्हणाला, "अहमदाबाद आणि साणंद येथील अनेक कंपन्यांत मी नोकरीसाठी जाऊन आलो. मी माझी कागदपत्रं देत होतो तेव्हा सहाजिकच त्यातून माझी जात समजायची."

"एक महिना प्रयत्न केल्यानंतर मी पुन्हा मृत गाई उचलण्याचं काम पत्करलं." तो म्हणाला.

राठोडचा दावा आहे की त्याला ना कोणत्या संघटनेनं मदत केली, ना कोणत्या खासगी कंपनीनं काम दिलं.

राठोडसारखी अनेक दलित युवक आहेत, ज्यांना नवी सुरुवात करायची आहे.

लेखक आणि राजकीय विश्लेषक विद्युत ठाकर यांच्या मते सरकार मदत करत नाही असं म्हणणं योग्य ठरणार नाही.

ते म्हणाले, "जे शक्य आहे ते सरकार करत आहे. पण सध्याची परिस्थिती फक्त सरकार बदलू शकणार नाही. ही जबाबदारी सरकार, समाज, धार्मिक संस्था या सर्वांचीच आहे."

"या सर्वांनी एकत्र येऊन दलितांची परिस्थिती बदलली पाहिजे," असं त्यांच मत आहे.

मी गावावरच बहिष्कार टाकला

पण या संकटांसमोर निग्रहानं उभे असलेले दलित सुद्धा आहेत ज्यांना गाईचं कातडी काढण्याचं काम सोडून देण्यासाठी प्रसंगी गावही सोडलं आहे.

अशांतील एक नाव आहे कनू चावडा.

प्रतिमा मथळा ऊनातील घटनेनंतर कनू चावडा यांनी मृत जानावरं उचण्याचं काम बंद केलं आहे.

त्यांनी 20 वर्षांचा मुलगा आणि बायकोसह त्यांचं बलोभल (ता. वढवान) हे गाव सोडलं आहे. ते अहमदाबादला आले आहेत.

"जर मी मृत गाई नाही उचलल्या तर बहिष्कार टाकण्याची धमकी देण्यात आली होती. पण मीच गावावर बहिष्कार टाकला आणि अहमदाबादला आलो," ते म्हणाले.

चावडा चर्मकार आहेत. थोडे जादा पैसे मिळत म्हणून ते मृत जनावर उचलण्याचं काम करत होते.

पण हे काम थांबवण्याचा निश्चय त्यांनी केला.

मृत जनावरं उचलून न्या, असं सांगणारे फोन कॉल आले तर त्यांना ते उत्तर देत नाहीत.

बगोदरा-अदमदाबाद महामार्गावर ते चप्पल पॉलिश करण्याचं काम करतात. तर त्यांचा मुलगा अहमदाबादमधल्या कापडाच्या फॅक्टरीत काम करतो. बायको कुंभाराकडे काम करते.

चावडा म्हणतात, "आम्हाला त्या गलिच्छ कामातून बाहेर पडायचं आहे, म्हणून आम्ही सर्वजण कष्ट करत आहोत. त्या कामामुळं आमच्यावर कलंक लागला आहे."

ऊनातील घटना

मृत गाय घेऊन जाणाऱ्या 4 दलितांना गोरक्षकांच्या एका गटानं चाबकांनी बेदम मारहाण केली होती. जुलै 2016मध्ये ऊनामधील भर रस्त्यावर हा प्रकार घडला होता.

या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे देशभर पडसाद उमटले.

या घटनेतील पीडितांना नंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तर आरोपींना अटक करण्यात आली.

पीडितांची भेट घेणाऱ्या नेत्यांमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, बसपच्या नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती, गुजरातच्या तत्कालिन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचाही समावेश होता.

या घटनेच्या निषेधार्थ गुजरात आणि देशभरातही आंदोलनं झाली होती.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)