प्रेस रिव्ह्यू : गुगल पिक्सलतर्फे पिक्सल दोन चे नवीन फोन

गुगलचे नवीन पिक्सल स्मार्टफोन Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा गुगलचे नवीन पिक्सल स्मार्टफोन

गुगल पिक्सलची नवीन फोन सिरीज बाजारात; 2018 मध्ये एकत्र निवडणुका घेता येणं शक्य; महाराष्ट्रात पाच ते सहा तास भारनियमन; आणि जीडीपीच्या आकड्यांवर काय बोलले पंतप्रधान, या बातम्यांचा आढावा आजच्या या वृत्तात.

नवीन गुगल पिक्सल आला

सॅन फ्रान्सिस्कोमध्ये गुगलने त्यांच्या पिक्स्ल फोनची नवीन सिरीज सादर केली. यावेळी पिक्सल 2 आणि पिक्सल 2 XL हे दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले.

हे दोन्ही नवीन फोन सुरूवातीला भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनाडा, अमेरिका आणि युरोपच्या काही देशांमध्ये लॉन्च होतील.

आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पिक्सल 2 (64 जीबी) ची किंमत 649 डॉलर पासून सुरू (जवळपास 42 हजार रुपये) होईल. पिक्सल 2 XL चा 64 जीबी स्टोरेज असलेला फोन 849 डॉलरला (साधारणतः 55,256 रुपये) येईल.

गुगल पिक्सल 2 XL मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रगन 835 प्रोसेसरसह 4 जीबी रॅम देण्यात आल आहे, असं हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तात म्हटलं आहे.

'2018 मध्ये दोन्ही निवडणूका शक्य'

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा निवडणुकींसाठी अतिरिक्त मतदान यंत्रांची तयारीही करावी लागेल.

सप्टेंबर 2018 मध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या एकत्रित निवडणूका आम्ही घेऊ शकतो, असं भारतीय निवडणूक आयोगाने सरकारला कळविले असल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

"लोकसभेसोबतच राज्यांच्याही निवडणूका एकत्र घेऊ शकता का, अशी सरकारने आमच्याकडे विचारणा केली होती. निवडणुका घेण्याची आमची तयारी असल्याचं आम्ही त्यांना सांगीतलं. पण हे आता सरकारवर अवलंबून आहे. त्यांना निर्णय घ्यायचा असून त्यासाठीच्या कायदेशीर तरतुदी करायच्या आहेत," असं निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी भोपाळमध्ये सांगितलं.

राज्यात सहा तासापर्यंत भारनियमन

राज्यात कोळशाचा तुटवडा जाणवत असल्यामुळं बुधवारी आकस्मिक भारनियमन करावे लागलं. काही ठिकाणी चार ते सव्वासहा तासांपर्यंत भारनियमन करण्याची वेळ महावितरणवर आली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा राज्यात भारनियमन

लोकमतच्या वृत्तानुसार राज्यात 17, 470 मेगावॅट विजेची मागणी आहे. महावितरणकडून 15,073 मेगावॅट वीज पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे 2,397 मेगावॅटचा तुटवडा निर्माण झाला आहे.

'जीडीपी पहिल्यांदाच खाली गेला का?'

विकास दर ५.७ टक्क्यांवर आला म्हणून होत असलेल्या टीकेवर बोलताना पंतप्रधान मोदींनी भारतीय अर्थव्यवस्था भक्कम असल्याचा दावा केला. विविध वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर याबाबत वृत्त आलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नरेंद्र मोदी

"जीडीपी काही पहिल्यांदा ५.७ टक्क्यांवर आलेला नाही. मागच्या सरकारच्या कार्यकाळात सहा वर्षांत आठ वेळा विकास दर ५.७ टक्क्यांहून खाली आला होता," याकडे मोदी यांनी लक्ष वेधलं.

काही लोकांना निराशा पसरवण्याची सवय असते, अशा लोकांना लगेच ओळखणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.

नवी दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या (आयसीएसआय) सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या आर्थिकव्यवस्थेवर भाष्य केलं.

दरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा तीन दिवसीय अमेठी दौरा सुरू झाला आहे.

काँग्रेस राजवटीत राबवलेल्या योजनांची नावं बदलून त्या नव्याने राबवण्याचा धडाका चालवल्याचा आरोप गांधी यांनी केला. मोदी सरकारकडे स्वत:च्या अशा काहीच योजना नाहीत, असे ते म्हणाले.

झिम्बाब्वे मध्ये पत्रकाराला अटक

झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांच्या पत्नी ग्रेस मुगाबे यांनी वापरलेली अंतर्वस्त्रं दान केली, ही बातमी केल्यावरून झिम्बाब्वे सरकारने एका पत्रकाराला अटक केली आहे.

हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांच्या पत्नी ग्रेस यांनी वापरलेले अंतर्वस्त्र समर्थकांना दान केले, असे वृत्त एका खासगी वृत्तपत्राने दिलं. नंतर ते वृत्त लिहिणाऱ्या पकत्रकाराला अटक करण्यात आली, असं AFP वृत्तसंस्थेने कळवलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)