राज ठाकरे यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या 15 घटना

mumbai
फोटो कॅप्शन,

मुंबईत आज संताप मोर्चा

राज ठाकरे यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. सध्या ते ईडी कार्यालयाकडे निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर पाहू त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वपूर्ण घटना.

1. 1985 : संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचा मुलगा असूनही काका बाळ ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवत राज ठाकरे राजकारणात आले. बाळ ठाकरेंनी त्यांच्याकडे भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवली. विद्यार्थी सेना राज्यभर पसरवण्यात राज यांचा मोठा वाटा होता.

2. काकांसारखं व्यक्तिमत्त्व, बोलण्याची ढब, आक्रमकता यामुळे राज हेच बाळ ठाकरेंचे राजकीय वारसदार मानले गेले. शिवसेनेची नाशिक जिल्ह्यातली सूत्रं राज यांच्याकडे आली.

3. रमेश किणी हत्या प्रकरणात राज यांची चौकशी झाली. त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा आढळला नाही. या प्रकरणातून ते निर्दोष सुटले पण यामुळे शिवसेनेची या काळात मोठीच कोंडी झाली होती.

4. 30 जानेवारी 2003 : राज ठाकरेंच्या राजकीय आयुष्याला कलाटणी दिली ती शिवसेनेच्या महाबळेश्वर इथं झालेल्या अधिवेशनानं. याच अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. यामुळे उद्धव हेच बाळ ठाकरे आणि पर्यायानं शिवसेनेचे वारसदार आहेत यावर शिक्कामोर्तब झालं. राज ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांना हा मोठा धक्का होता. पण गंमत म्हणजे उद्धव ठाकरेंचं नाव सूचक म्हणून राज यांनीच पुढे केलं होतं. अर्थात, त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नव्हता असं राज यांनी पुढे सांगितलं.

5. 27 नोव्हेंबर 2005 : राज यांनी शिवसेना सोडली. त्यापूर्वी छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे यांनीही सेना सोडलेली होतीच. मात्र, राज यांच्या जाण्यानं शिवसेनेतून पहिल्यांदा एक 'ठाकरे' बाहेर पडले. राज यांच्या पुढील स्वतंत्र राजकीय वाटचालीची ही सुरुवात होती.

6. 9 मार्च 2006 : राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यानिमित्त दादरच्या शिवाजी पार्कमध्ये 'मनसे'ची पहिली सभा झाली. सभेला लाखापेक्षा जास्त लोकांनी गर्दी केली. महाराष्ट्रात एका नव्या राजकीय नेतृत्वाचा उदय झाला. कडव्या मराठीपणाचा मुद्दा हाच 'मनसे'चा अजेंडा असेल, असं राज यांनी जाहीर केलं.

7. 3 फेब्रुवारी 2008 : मनसेने उत्तर भारतीयांविरोधात आंदोलन छेडलं. मुंबई आणि काही प्रमाणात महाराष्ट्रात हिंदी भाषिकांना मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या संपत्तीचं नुकसान करण्यात आलं. त्याच वर्षी रेल्वे भरतीच्या आधी, म्हणजेच 19 ऑक्टोबरच्या रात्री मुख्यतः बिहारहून आलेल्या उमेदवारांना मनसैनिकांनी मारहाण केली.

फोटो कॅप्शन,

राज ठाकरे

8. 2009 : पहिल्यांदाच लढवलेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले. या दोन्ही निवडणुकीत मनसेमुळे शिवसेना आणि भाजपला हादरे बसले. शिवसेनेनं मनसेला काँग्रेसची 'बी' टीम म्हणून हिणवलं आणि मराठी मतांमध्ये फूट पाडल्याचाही आरोप केला.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

9. 4 ऑगस्ट 2011 : गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणानंतर राज यांनी गुजरात दौरा केला. मोदी यांच्या रूपाने राज यांना पहिला राजकीय मित्र मिळाला असं त्यावेळी म्हटलं जात होतं पण 2019 मध्ये त्यांनी मोदींच्या विरोधात प्रचार केला.

10. 2012 : नाशिकमध्ये मनसेचा महापौर बनला तर पुण्यात विरोधी पक्षनेतेपदापर्यंत मनसेनं मजल मारली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला 27 जागांसह मोठं यश मिळालं.

फोटो कॅप्शन,

मोर्चासाठी रेल्वे स्टेशनमध्येही गर्दी

11. 11 ऑगस्ट 2012 रोजी म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांवरच्या अत्याचाराविरोधात मुंबईत आझाद मैदान परिसरात रझा अकादमीचं मोठं आंदोलन झालं. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्याचा निषेध म्हणून राज यांनी मोर्चा काढला. मनसे व पर्यायानं राज यांचा तो सौम्य हिंदुत्वाचा आविष्कार होता, असं मत दिव्य मराठीचे राज्य संपादक प्रशांत दीक्षित यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

12. 2014 : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांत मनसेला सार्वत्रिक पिछेहाटीचा सामना करावा लागला. राज्यातल्या जनतेसाठी कळीचा बनलेला टोलचा मुद्दा राज यांनी उचलला खरा, पण त्यांनी तो मध्येच सोडल्याची त्यांच्यावर टीका झाली. विधानसभा निवडणुकीत मनसेला फक्त एकच जागा जिंकता आली.

13. पक्षाची दारुण अवस्था पाहता राज यांनी शिवसेनेकडे 'टाळी' मागितली पाठवला. मात्र, सेनेनं त्याला दाद दिली नाही. या घटनेमुळे राज-उद्धव यांच्या एकत्र येण्याचे आतापर्यंतचे अंदाज चुकीचे ठरले.

14. 2017 : मनपा निवडणुकांच्या निकालांमुळे मनसेच्या अस्तित्वावरच उपस्थित झालं. नाशिकमधली सत्ता गेली तर मुंबई आणि पुण्यात पक्षाची मोठी पडझड झाली. निवडणुकांच्या आधीपासूनच वसंत गीते, प्रवीण दरेकर असे पक्षाचे अनेक नेते-कार्यकर्ते राज यांना सोडून गेले होते. यानंतरच्या काळात राज ठाकरे राजकीय दृष्ट्या एकटे पडत गेले, असं मत लोकसत्ताचे राजकीय संपादक संतोष प्रधान यांनी व्यक्त केलं.

15. 2019 मध्ये राज ठाकरेंच्या पक्षाने लोकसभा निवडणूक लढवली नाही पण मोदी-शाह या जोडीच्या विरोधात त्यांनी दंड थोपटलं. त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेऊन सत्ताधारी भाजपविरोधात प्रचार केला होता.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)