बलुचिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ल्यात 18 ठार, 27 जखमी

बलुचिस्तानमधील आत्मघाती हल्ल्यात 13 जण मृत्युमुखी पडले आहेत. Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा बलुचिस्तानमधील आत्मघातकी हल्ल्यात 13 जण मृत्युमुखी पडले आहेत.

पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातल्या एका सुफी दर्ग्यावर झालेल्या आत्मघातकी हल्लात 18 जण मृत्युमुखी पडले आणि 27 जण गंभीर जखमी झाले.

क्वेट्टाजवळ असलेल्या झल मग्सी या जिल्ह्यातील दर्ग्यामध्ये हा हल्ला झाला आहे.

स्थानिक अधिकारी असद ककर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सुफी संत सय्यद चासल शाह यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक दर्ग्यात आले होते. त्याचवेळी ही घटना घडली."

"पोलिसांनी दर्ग्याच्या प्रवेशद्वारावर हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला, पण या हल्लेखोरानं स्वतःला बाँबनं उडवून दिलं", असंही त्यांनी सांगितलं.

पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनुसार सुरक्षा रक्षकांनी इमारतीला सील केलं आहे.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा हल्ल्यानंतर जखमींना सुरक्षित ठिकाणी नेताना भाविक.

हा हल्ला कोणत्या संघटनेनं घडवून आणला हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण, गेल्या काही वर्षांपासून मुस्लीम बंडखोर संघटनांकडून सुफी दर्ग्यांना लक्ष्य करण्यात येत आहे.

गेल्या फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानच्या सिंध प्रांतातल्या सहवान इथल्या मशिदीवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 80 पेक्षा जास्त लोक ठार झाले होते.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)