कीटकनाशकांमुळे आतापर्यंत 50 शेतकऱ्यांचा मृत्यू?

कापूस उत्पादक शेतकरी Image copyright Reuters
प्रतिमा मथळा किटकनाशकातून विषबाधा होण्याच्या सर्वाधिक घटना कापूस उत्पादक भागात घडल्या आहेत.

23 वर्षांच्या प्रवीण सोयामची प्रकृती ठणठणीत होती. पण अचानक त्याच्या छातीत दुखू लागलं. उलट्या आणि मळमळ सुरू झाली. त्यानंतर त्याची शुद्ध हरपली. पुढं 27 सप्टेंबरला सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांनं अखेरचा श्वास घेतला.

सोयामवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना संशय आहे की सोयामसुद्धा कीटकनाशकांमुळे झालेल्या विषबाधेचा बळी असावा.

दोन दिवसांपूर्वी कपाशीच्या शेतात कीटकनाशक फवारल्यानंतर तो आजारी पडला. दोन कीटकनाशकांच्या मिश्रणातून हे घातक कीटकनाशक बनवण्यातं आलं होतं.

जुलै महिन्यांपासून या किटकनाशकांच्या विषबाधेमुळं 50 शेतकऱ्यांनी जीव गमावला असल्याचं काही शासकीय अधिकारी आणि माध्यमांचं मत आहे. मृतांची संख्या वाढत असल्यानं राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.

यातील सर्वाधिक म्हणजे 19 मृत्यू यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. हा जिल्हा महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्हा आहे. शेतकरी आत्महत्यांमुळे हा जिल्हा नेहमी बातम्यांत असतो.

"या कालावधीत 800पेक्षा जास्त शेतकऱ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं," असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.

Image copyright JAIDEEP HARDIKER
प्रतिमा मथळा कीटकनाशकातून विषबाधा झाल्यानं प्रवीण सोयमचा (23) मृत्यू झाला.

कापूस, सोयाबीन आणि डाळी ही यवतमाळमधली महत्त्वाची पिकं आहेत.

इथल्या काही शेतकऱ्यांनी कीटकनाशकांचं घातक मिश्रण वापरत असल्याचं सांगितलं. हे मिश्रण बनवण्यासाठी पावडर आणि द्रव्य रूपातील कीटकनाशकांचा वापर केला जात असल्याचं काही शेतकऱ्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

GM बियाणांवरही कीड पडल्याची तक्रार

इथले शेतकरी जनुकीय बदल केलेलं (GM) कापसाचं बियाणं वापरतात. हे बियाणं बोंड अळीला प्रतिकारक असल्याचं सांगितलं जातं. पण अनेक शेतकऱ्यांची तक्रार आहे की या वर्षी त्यांच्या पिकांवर बोंड अळीनं हल्ला केला. म्हणून त्यांना कीटकनाशकांचा वापर वाढवावा लागला.

21 वर्षांचा निकेश काठणे सांगतो की या कीटकनाशकांची फवारणी करताना तो सलग सात दिवस शेतात कोसळत होता. निकेश एका स्थानिक हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.

Image copyright JAIDEEP HARDIKER
प्रतिमा मथळा 800हून जास्त शेतकऱ्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यातं आलं आहे.

तो म्हणाला, "माझं डोकं फार दुखत होतं आणि मला काहीही दिसत नव्हतं." निकेश सध्या संकटातून बाहेर आला आहे. हे कीटकनाशक पुन्हा कधीही वापरणार नाही, असं तो म्हणतो.

अनेक शेतकऱ्यांनी भीतीने कीटकनाशक वापरण बंद केलं असल्याचं सांगितलं.

इथल्या सरकारी हॉस्पिटलचे डीन डॉ. अशोक राठोड बीबीसीशी बोलताना म्हणाले, "या घटना आमच्यासाठीही नव्या आहेत." इथल्या डॉक्टरांकडे आलेले रुग्ण हे अनेकदा आत्महत्या करण्यासाठी विष पिऊन आलेले असतात.

विष प्यायलेल्या रुग्ण्याच्या पोटातून विष काढणं जितकं कठीण तितकंच श्वसनसंस्थेत गेलेले विशाचे अंश बाहेर काढणं कठीण.

जुलैपासून सुरू आहेत तक्रारी

या परिसरातल्या डॉक्टरांच्या मते जुलैच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना विषबाधेचा प्रकार पहिल्यांदा लक्षात आला.

उलट्या, श्वसनाच्या तक्रारी, दृष्टिदोष, चक्कर येणं अशा तक्रारी असलेल्या 41 पेशंटना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं हे डॉक्टर सांगतात. ही संख्या ऑगस्टमध्ये 111 आणि सप्टेंबरमध्ये 300 एवढी झाली.

Image copyright JAIDEEP HARDIKER
प्रतिमा मथळा कीटकनाशकाचं मिश्रण वापरलं जात असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

उपचारासाठी दाखल असलेल्या शेतकऱ्यांपैकी 10 शेतकरी व्हेंटिलेटरवर आहेत. तर 25 जणांना डोळ्यांचे आजार झाले आहेत.

सप्टेंबर महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी शेतीतील संशोधकांना फील्ड सर्व्हे करून या घटनांचा शोध घ्यायला सांगितलं.

ठपका शेतकऱ्यांवरच

या अहवालात शेतकऱ्यांनाच जबाबदार धरण्यातं आलं आहे. कीटकनाशकं फवारताना काळजी न घेतल्याचा ठपका यात ठेवण्यात आला होता. सुरक्षा किट, गॉगल आणि हातमोजे वापरले नसल्याचं यात म्हटलं आहे.

"माझ्या मुलाने सुरक्षेची काळजी घेतली नव्हती," अशी कबुली सोयामचे वडील भाऊराव यांनी दिली. पण यापूर्वीही त्यांनी कोणतीही काळजी न घेता अनेकदा फवारणी केली होती. मग याच वेळी असं का घडलं?

शेतकऱ्यांनी बनावट कीटकनाशक तर वापरलं नसेल? त्यांना माहीत नसलेल्या कीटकनाशकांचं मिश्रण ते वापरत होते का? त्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या होत्या का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

सोयामच्या घरात त्याचा भाऊ नामदेवने शेतात फवारलेल्या कीटकनाशकाचं पाकीट काढून दाखवलं. भावाच्या फोटोकडे पाहात तो म्हणाला, "त्याच्या जागी मीही तिथे असू शकलो असतो."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)